१८ वर्षाचें सुध्दां अद्याप वय नव्हतें. अजून ओंठावर तारुण्याची कृष्णवर्ण खूण दिसूं लागली नव्हती. लहान, असहाय, परक्या देशांत पैशाशिवाय, आधाराशिवाय हा तरूण पडला होता. त्याच्या मित्राची त्यास मदत होण्याऐवजी उलटी अधिकच काळजी व जबाबदारी बेंजामिन याला पडे. स्वस्थ बसणें हें तर शक्य नव्हतें. खिशांतील आणलेली पुजी संपत आली. पोटाचा प्रश्र डोळयांसमोर स्पष्टपणें उभा होता. बेंजामिन यास एका छापखान्यांत लौकरच नोकरी मिळाली. बेंजामिनची चलाखी व हुशारी पाहून मालकाचा त्याच्यावर लोभ बसला. परंतु त्याच्या मित्रास नोकरी मिळेना. त्या मित्रासाठीं पण बेंजामिन यासच पदरमोड करावी लागे. शेवटीं एका खेडेगावांत या मित्रासही एका शिक्षकाची जागा मिळाली व बेंजामिन एकपरी मोकळा झाला. गळयांतील एक घोरपड निघाली. बरें झालें !
या सुमारास एका गृहस्थानें एक पुस्तक प्रसिध्द केलें. बेंजामिन यानें तें पुस्तक वाचलें व त्यावर एक टीकात्मक सुंदर निबंध लिहिला व आपल्या धन्यास दाखविला. तो एवढया लहान मुलानें - बेंजामिननें लिहिलेला पाहून छापखान्याच्या मालकास फार आश्चर्य वाटलें. असा गंभीर निबंध कसालिहिला याचें त्यास गूढ पडलें. शहाणपण, हुशारी हीं एकंदर दयावर नसून ती ईश्वरदत्त व श्रमसाध्य आहेत हें त्याच्या मनांत आलें. मालकानें तो निबंध छापविला व त्या निबंधापी एक प्रत पुस्तककर्त्याकडे ज्या पुस्तकावर टीका होती त्या पुस्तककर्त्याकडे पाठवून दिली. तो ग्रंथकार कांहीं दिवसांनी बेंजामिन यास भेटण्यासाठीं आला व आपण आणखी एक नवीन ग्रंथ त्यास दाखवून म्हणाला ''या ग्रंथावरही आपलें काय म्हणणें आहे तें मला जरून कळवा. आपल्या विचारांचा मला फार फायदा झाला.
इंग्लंडमध्यें या छापखान्यांत राहून बेंजामिन यास पुष्कळ प्रकारचा फायदा मिळाला. नवीन नवीन पुस्तकें त्याच्या दृष्टीस पडत व तीं तो एखाद्या अधाशाप्रमाणें वाचून टाकी. परंतु कामांत मात्र त्यानें हयगय व कसूर केली नाहीं. कर्तव्य कर्म आधीं मग स्वत:च्या सुखसोयी हें त्याचें ब्रीद होतें. येथें त्यानें कित्येक तरूणांस पोहण्याची कला शिकविली. बेंजामिनच्या पोहण्यांतील कौशल्याची जो तो तारीफ करी. एक दिवस तर त्यानें पाण्यांत किती तरी निरनिराळया गंमती करून दाखविल्या. माशास पाणी म्हणजे जसें घर तसेच बेंजामिन हाही एक जलचर प्राणीच होय असें इतर कौतुकानें म्हणत. बेंजामिन याच्या जलतरण प्राविण्याची वार्ता मंत्रिमंडळातील एका वजनदार माणसाच्या कानीं गेली. त्यानें बेंजामिन यास बोलावून घेतलें. व सांगितले ' माझ्या मुलांस ही कला शिकवा. ' परंतु बेंजामिन यावेळीं पुनरपि अमेरिकेंत जाण्याच्या तयारीस लागला होता म्हणून त्यानें मोठया कष्टानें ही विनंति अमान्य केली.
बेंजामिन यास एक अमेरिकेन व्यापारी भेटला. या व्यापा-यास फिलाडेल्फिया येथं एक नवीन व्यापारी दुकान घालावयाचे होतें. बेंजामिन यास तो म्हणाला ''मित्रा, माझ्या कामांत जर मला तूं मदत दिलीस तर आपला व्यापारधंदा चांगला चालेल असें मला वाटतें. ''हा नवीन मार्ग आकमून पहावा असें बेंजामिन याच्या महत्वाकांक्षी मनास वाटूं लागलें. त्यानें विचार करून त्या व्यापा-यास होकार दिला. दोघांचें करारमदार सर्व कांही झाले व ठरलें एकदांचे.