हॉलजवळ करार करून ज्या वेळेस बेंजामिन सर्व इतर व्यवसायांपासून मोकळा झाला, त्या वेळेस तो आपल्या मित्रांजवळ म्हणाला, ''मी राजकारणांत कांही पडणार नाहीं. ''परंतु देवाची इच्छा निराळीच होती. शिक्षणाची कामगिरी करणारें, विद्येची आवड असणारे जे टिळक त्यांसही राजकारणांत पडावें लागलें. प्रसंगानुसार अनेक गोष्टी मनुष्याला स्वत:साठीं जरी नाहीं तरी इतरां सर्वाच्यासाठीं कराव्या लागतात. बेंजामिनचें टिळकांप्रमाणेंच झालें. देशाची सेवा करण्यासाठीं त्यास पुढें यावें लागलें. आतांपर्यत तो आपल्या शहरातर्फे कौन्सिलचा सभासद होता; जनरल असेंब्लीचा सभासद होता, अनेक प्रसंगी त्यानें चौकशीचीं वगैरे कामें केलीं होतीं, परंतु हीं कामें सोडून तो विद्याभ्यासाकडे, शास्त्रसंशोधनाकडे वळला होता. परंतु पांच वर्षात राजकारणाचा रंग बदलला व निराळेच महत्वाचे प्रश्र उपस्थित झाले फ्रेंच व इंग्रज यांच्यामध्यें सप्तवार्षिक युध्द १७५६ पासून १७६३ पर्यत सुरू होतें. युरोपप्रमाणें अमेरिकेंतही फ्रेंच व इंग्रज एकमेकांशीं लढूं लागलें. १७६४ मध्यें लढाई सुरूं होण्यापूर्व दोन वर्षे बेंजामिननें सर्व अमेरिकन इंग्रज वसाहतीचें एकीकरण करण्याचा प्रयत्न केला त्यानें आल्बनी येथं सभा बोलावली. त्यानें मांडलेली ऐक्याची योजना पसंत पडून विलायतेंत पार्लमेंटमध्यें मंजूर होण्यासाठी पाठविण्यात आलीं. परंतु मध्यंतरीं हें सप्तवार्षिक युध्द सुरू झालें. त्यामुळें हा ऐक्याचा प्रश्र दिरंगाईवर पडला.

१७५७ ते ६२ पर्यत पांच वर्षे तो पेनसिल्हवॅनिया व इतर वसाहती यांचा इंग्लंडमधील एजंट होता. पुनरपि १७६४ मध्यें तो इंग्लंडमध्यें गेला. यावेळेस Minister to England - इंग्लंडमधील वसाहतींचा वकील अशा पदवीनें त्यास पाठविण्यांत आलें. १७६४ ते १७७४ या दहा वर्षाच्या कारकीर्दीत तो इंग्लंडमध्यें होता, हीं १० वर्षे वसाहतींच्या इतिहासांत अत्यंत महत्वाची आहेत. याच १० वर्षात पूढील स्वातंत्र्य युध्दाचीं कारण पेरलीं गेलीं. निरनिराळे कर व जकाती याच वेळेस वसाहतीवर लादण्यात आल्या. बेंजामिननें या वेळेस वसाहतींची सेवा फार चांगल्या प्रकारें केली. नवीन स्टँप ऍक्ट हा कर वसाहतींवर लादण्यांत आला. पुढें हें भांडण विकोपास गेलें. बोस्टन बंदर सरकारनें बंद केले. या सुमारास बेंजामिन मायभूमीस परत आला. बेंजामिन यास लांचलुचपत देऊन ब्रिटिश मंत्रिमंडळ त्यास कर्तव्यभ्रष्ट करूं पहात होतें. परंतु बेंजामिननें त्यांच्या तोंडास पानें पुसलीं व त्यांस तो म्हणाला, ''यापेक्षां मला कारागृहांत पाठविलें तरी चालेल, ''१७६६ मध्यें पार्लमेंटमध्यें जीं प्रश्रोत्तरें वसाहतींसंबंधीं झालीं, त्यांत निर्भीडपणें त्यानें उत्तरें दिली. इंग्लंडमध्यें असतांनाच बेंजामिननें या आपल्या पूर्वदेशाला बजावून ठेविलें कीं, ''लौकरच अमेरिकेची भरभराट होईल; आणि सर्व पारतंत्र्यशृंखला अमेरिका झुगारून देईल ! ''

१७ ७ ४ पासून स्वातंत्र्याच्या युध्दास सुरवात झाली. वसाहत वाल्यांच्यासभा भरून स्वहक्कांची घोषणा करण्यांत आली. या सभांमधून बेंजामिन हा प्रमुख असें. १७ ७ ६ मध्यें वसाहतीनीं आपलें स्वातंत्र्य जगजाहीर केलें. फ्रान्सची सहानुभुति मिळविण्यासाठी बेंजामिन फ्रान्समध्यें गेला. फ्रान्सला इंग्लिशांचा सूड उगवावयाचा होताच. कारण सप्तवार्षिक युध्दांत फ्रेंचाच्या उत्तर अमेरिकेंतील सर्व वसाहती इंग्लिशांनीं जिंकिल्या होत्या. यामुळें अमेरिकन वसाहती ब्रिटिश साम्राज्यापासून जर स्वतंत्र झाल्या तर ब्रिटनची तेवढी सत्ता कमी झाली. या हेतूनें फ्रान्स अमेरिकेस मदत देण्यास तयार झालें. १७७८ मध्यें फ्रान्स व अमेरिकन वसाहती यांच्यांत तह झाला. स्वातंत्र्यच्या या युध्दांत यश येणें कठीण होतं. यॉर्क टाउन येथें कॉर्नवालीस याच्या सैन्यांचा फ्रेंच आरमारानें अकस्मात कोंडमारा केला व यामुळें कॉर्नवालीसला वसाहतवाल्यांस शरण जावें लागलें. यामुळें हें स्वातंत्र्ययुध्द पुढें लौकरच समाप्त झालें. १७८३ मध्यें इंग्लंड व वसाहती यांच्यामध्यें तह झाला. या तहाच्या वाटाघाटींत बेंजामिनच जबाबदार पुढारी होता. पुढें तह झाल्यानंतर जी नवीन अमेरिकन घटना करण्यांत आली, जे नवीन कायदे करण्यांत आले, त्यांत बेंजामिनच प्रामुख्याने काम करीत होता. एकंदरींत हया स्वातंत्रयुध्दांत व तत्पूर्वी १० वर्षे बेंजामिन यानें आपल्या राष्ट्राची एकनिष्ठपणें, मानापमानांस, द्रव्यधनांस दूर लोटून सेवा केली. याबद्दल सर्व अमेरिका त्याची सदैव ऋणी आहे. असली पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel