बेंजामिनचें लहानसें डोकें अनेक विचारांनीं भरलेलें असे. बेंजामिन याच्या वाचनाची गोडी एका सद्गृहस्थाच्या कानांवर गेली. त्यानें बेंजामिन यास येऊन सांगितलें ''बाळ, माझ्या घरीं पुस्तकालय आहे, त्यांतील वाटेल तें पुस्तक तूं वाचावयास घेऊन येत जा ''बेंजामिन याचा आनंद त्रिभुवनांत मावेना. तो आतां आधाशासारखे भराभर ग्रंथ वाचूं लागला. शॅफ्टस्बरी व कॉलिन्स या दोन ग्रंथकारांचें ग्रंथ वाचून तो धार्मिक गोष्टींत स्वतंत्र विचार करूं लागला. जो मनुष्य स्वतंत्रपणें विचार करतो तो देवास आवडतो असें बेंजामिन याचें म्हणणं असे.
बेंजामिनचा भाऊ जेम्स हा बेंजामिनकडे नीट लक्ष देत नसे. भावाप्रमाणें त्यास प्रेमळपणानें तो वागवीत नसे. जेम्स याच्या मनांत यावेळीं एक वर्तमानपत्र काढावें असें आलें. चर्चा वगैरे करून बेत मुकर झाला. या वर्तमानपत्राचें नाव Current ''चालू काळ''असें ठेवण्यांत आलें. धर्म, राजकारण, न्यायखातें वगैरेंसंबंधी मनोरंजक व बोधप्रद माहिती जेम्स देई.
एक दिवस बेंजामिनच्या मनांत आलें कीं आपण या वृत्तपत्रांत लिहीत जावें. परंतु आपण जें लिहूं ते आपला भाऊ स्वीकारणार नाहीं, तो तें केराच्या टोपलींत टाकून देईल हें बेंजामिन यास माहीत होतें. तेव्हां त्यानें एक युक्ति योजिली. एक सुंदर लेख लिहून टोपण नांवानें त्यानें तो रात्रींच्या वेंळीं भावाच्या बैठकीच्या खिडकींतून आंत ठेविला. सकाळीं जेम्सला तो लेख खिडकींत मिळाला. त्यानें तो वाचून पाहिला व त्यास फार आवडला. त्याचे सल्लागार मित्र तेथें आले व लेखासंबंधी त्यांनीं पुष्कळ भवति न भवति केली. त्या लेखकासंबंधी त्यांनीं नाना नांवें सुचविलीं व तीं रद्द केलीं. शेवटीं लेखक कोण हें तर ठरेना परंतु लेख छापावयाचें मात्र ठरलें.
आज बेंजामिन स्वत:चा लेख छापीत होता. त्याचा चिमण्या ह्दयांत अत्यानंद झाला होता. परंतु त्याच्या ह्दयाशिवाय ही गोष्ट दुस-यास माहीत नव्हती. दु:ख व आनंद दोन्हीही अन्यसापेक्ष आहेत. ज्याप्रमाणें दु:ख दुस-याजवळ बोलून कमी होतें, त्याप्रमाणें आनंद दुस-यास सांगून दुणावतो. आपण परीक्षेंत उत्तीर्ण झालों, किंवा एखादें बक्षीस मिळविलें तर दुस-यांस सांगण्यास आपण किती अधीर असतों. एकटयालाच सुख व दु:ख भोगणें हें कठीण जातें.
बेंजामिन यानें असे अनेक लेख गुप्तपणें खिडकींतून ठेवावे व त्याच्या भावानें ते प्रसिध्द करावे असें चाललें. हा लेखक कोण याचें जेम्स व त्याचे मित्र यांस मोठें गूढ पडलें. शेवटीं एक दिवस बेंजामिन यानें ही यथार्थ गोष्ट जेम्सला सांगितली. जेम्सचा प्रथम विश्वासच बसेना, परंतु मागून त्याची खात्री पटली. जेम्सच्या मित्रांस जेव्हां हें कळलें, तेव्हां त्यांस अचंबा वाटला जो तो बेंजामिनची वाहवा करूं लागला.