बेंजामिन आतां वृध्द झाला होता. त्याच्या वयास आतां ८४ वर्षे झालीं होती. सर्व स्थित्यंतरांतून बाहेर पडून तो यशस्वी झाला होता. दोन वर्षापूर्वी त्याला वाटूं लागेलें कीं आतां आपलें मरण जवळ आलें. एक दिवस बेंजामिन आपल्या मुलांस म्हणाला, ''माझा बिछाना नीट घाला म्हणजे मला नीट व्यवस्थित रीतीनें देहत्याग करतां येईल. ''त्याची मुलगी म्हणाली, ''बाबा, तुम्ही बरे व्हाव; आणि आणखीपण पुष्कळ दिवस जगाल.''''छे: आतां जगावयाची कसची आशा! ''असें बेंजामिन म्हणाला. ''बिछान्यांत जरा कुशीवर वळा म्हणजे तुम्हांस नीट श्वासोच्छवास करतां येईल. ''असें त्यास सांगण्यात आलें. त्या वेळेस बेंजामिन शांतपणें     म्हणाला. ''मरणोन्मुख माणसास नीट स्वस्थ रीतीनें कांहीं एक करतां येणार नाहीं. ''मरण्याचे आधीं त्याला फार वेदना झाल्या. बेंजामिन मोठमोठयानें कण्हत होता. ' मला हें दु:ख सहन केलें पाहिजें, परंतु मला सहन होत नाहीं; या जगांत कांहीं एक करावयास मी आतां लायक नाहीं; या जगांतून लौकर जाणें हेंच चांगलें असें तो म्हणाला.

एका धर्मोपदेशकास बोलावण्यांत आलें. फ्रँकलिन त्या धर्मोपदेशकास म्हणाला, ''माझें दु:ख पाहून दूर जाऊं नका. हीं दु:खें लौकरच दूर होतील. हीं दु:खें क्षणिक आहेत. परंतु आतां मला जीं सुखें मिळतील तीं मात्र चिरकाल टिकणारीं अशीं असतील. ''मृत्यूशय्येवर असतां ख्रिस्ताचें चित्र त्यानें आपल्या डोळयांसमोर ठेविलें होतें. त्या चित्रास पाहून बेंजामिन म्हणाला, ''एकमेकांवर प्रेम करा असें शिकविण्यास आलेल्या अवतारी पुरूषाचें हें चित्र आहे. ''मरतांना शेवटची दृष्टी त्या चित्राकडे लावून बेंजामिननें इहलोकयात्रा संपविली. आपली कांठी, चांदीच्या मुठीची कांठी - वॉशिंग्टन यास देण्यास त्यानें सांगितलें आणि म्हणाला If it were a Sceptre, he has merited it, and would become it - ही कांठी हा जर राजदंड असता, तर तो हातीं घेण्यास वॉशिंग्टन योग्यच होता; तो फार थोर पुरूष आहे. ''अशा रीतीनें सर्व निरवानिरव करून हा थोर पुरूष, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, उद्योगाचा भगीरथ, मुत्सद्यी, देशभक्त, समाजसेवक, वॉशिग्टनप्रमाणेंच ' राष्ट्रकार्यात पहिला, शांततेंत पहिला, देशबांधवांच्या अंत:करणांत पहिला, ' १७९० एप्रिलच्या १७ तारखेस दिवंगत झाला. सर्व राष्ट्र हळहळलें. अमेरिकेंत एक महिनाभर सर्व सरकारी काम वगैरे बंद राहिलें. एक महिना शोकाचा म्हणून पाळला गेला. फ्रान्समध्यें सुध्दां तीन दिवस सर्व व्यवहार बंद होता व सुट्टी होती. सर्व युरोप त्याच्या मरणानें दु:खी झालें. मग त्याची अमेरिका किती कष्टी झाली असेल ! सर्वास चटका लावून जाणारा पुरूष तोच धन्य होय !

बेंजामिन जो या महादपावर अधिष्ठित झाला तें पद त्यानें महापयासानें - मोठया कष्टानें मिळविलेलें होतें. एका मेणबत्तीविक्या बापाचा मुलगा, परंतु राजाचें वैभव त्यास प्रापत झालें. तो अंधकारांत चांचपडला, दारिद्रयात गारठला, संकटानीं कष्टला, कपटी लोकांनीं गांजला. परंतु या सर्व दिव्यांतून तो दिव्य यशाने जास्तच तेज:पुज होऊन बाहेर पडला.

बेंजामिन मध्यंतरीं जरा अधार्मिक झाला होता. शॅफ्ट्सबरी सारख्याचें ग्रंथ वाचून तो स्वतंत्रवादी झाला होता. नीति वगैरे गोष्टींस त्यानें जरा टाळा दिला होता. याची वागणूक थोडीशी ढिलाईची होऊं लागली होती. परंतु तो वेळीच सावध झाला, आपली वर्तणुक सुधारण्याचा त्यानें दृढ निश्चय केला. दृढनिश्चयास असाध्य काय आहे ? आपल्या खोलींत त्यानें एक काष्टक तयार केलें त्यामध्यें रोज खोटें किती वेळां बोललों, स्वार्थीपणाचें विचार मनांत किती आलें, किती वेळां भांडलों, रागावलों किती वेळां वगैरे तो लिही. मग दर आठवडयांत या गोष्टींची संख्या कमी झालीच पाहिजे असें तो ठरवी. बाहेरच्या परिस्थितीशीं ज्या करारीपणानें तो झगडला होता, त्याच नेटानें व निश्चयात्मिक बुध्दीनें तो या मानसिक स्थितीशीं झगडला. असें करतां करतां त्याचें मन शुध्द विचारानें व सात्विक प्रेमानें भरून येऊं लागलें. हा Sage - मुनि झाला - ऋषिसारखा मानला गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel