मागील प्रकरणांत सांगितल्याप्रमाणें निरनिराळया लोकहिताच्या चळवळीं तो करीत होता. फ्रँकलिन यास आतां शास्त्राभ्यास करावा असें वाटूं लागलें. लहानपणापासून तो कल्पक होता. त्याची बुध्दि शोधक होती. लहानपणीं पोहण्यामध्यें पंतगाच्या दोरीच्या साहाय्यानें, वल्हीं लावून वगैरे तो आपला वेग कसा वाढवी हें मागें सांगितलेंच आहे. छापखान्यांतही त्यानें वेळोंवेळी सुधारणा केल्या होत्या. मध्यंतरीं त्यानें एक प्रकारच्या स्टोव्हचा शोध लावला. परंतु त्याचा मक्ता स्वत:कडे न घेतां, आपल्या एका गरीब मित्रास त्याचा मक्ता दिला - सर्व हक्क दिला व तो मित्र पुढें श्रीमंत झाला. शोध लाविला आहे, तो माझ्यासाठी नाहीं - तो सर्वांसाठीं आहे असें तो म्हणे. तो पैशाचा भुकेला नव्हता तर ज्ञानाचा भोक्ता होता.
छापखान्याच्या व दुकानाच्या भानगडींत बराच वेळ जाई - म्हणून या दगदगीपासून आतां मुक्त व्हावें असें बेंजामिननें ठरविलें. त्याच्या दुकानांत हॉल या नावाचा मनुष्य प्रमुख कारभारी होता, त्यास बोलावून आणून बेंजामिन म्हणाला, ''हें पहा, मला तुम्ही दरवर्षी १००० एक हजार पौंड असें १८ वर्षेपर्यत देत जा. अठरा वर्षानंतर सर्व कारखाना तुमच्या मालकीचा होईल. मला १ पौंड प्रतिवर्षी देऊन, तुम्हांसही जो पगार मिळतो त्याच्या ४/५ पट फायदा राहील. ''
बेंजामिनचें हें उदार म्हणणे हॉलनें आनंदानें मान्य केलें. बेंजामिन हा पोष्टमास्तरचें व आणखीहि काहीं कामें करी. त्यांचें त्याला वर्षास ५०० पौंड उत्पन्न होई. एकंदर १५00 पौंडाचें वार्षिक उत्पन्न होई व तें बेंजामिन यास पुष्कळ होई. त्या काळच्या मानानें म्हणजे बेंजामिन श्रीमंत समजला जाई. बेंजामिनची राहणी पण साधी व मितव्ययी होती; परंतु तो कंजूष व कृपण मात्र नव्हता. एकंदरींत सुखानें त्याचें कौटुंबिक जीवन चालेल अशी तयाची गृहस्थिती होती.
छापखाना, दुकान वगैरेची दगदग संपल्यावर बेंजामिननें आपलें लक्ष शास्त्रीय शोधांकडे लाविलें. त्या वेळीं विद्युच्छास्त्राची चर्चा चालूं होती. बेंजामिन यास असें सिध्द करावयाचें होतें कीं, मेघांत तळपणारी वीज व पृथ्वीवरील वीज या दोन्ही एकरूपच आहेत. परंतु यासाठी त्याला आकाशांतील वीज पृथ्वीवरआणण्याची जरूरी होती. यासाठीं त्यानें प्रयोग करण्याचें ठरविलें.
वादळाच्या दिवशीं तो एका टेंकडीवर गेला. आणि त्यानें आपला पतंग वर आकाशांत उडविला. पतंगाचा सर्व दोरा तागाचा होता व हातांतील दोरा फक्त रेशमी होता. वरती पतंगाला एक लोखंडी तार लाविलेली होती. ही तार विद्युत ओढून येईल असें फ्रँकलिन यास वाटत होतें. आकाशांतील विद्युत व भूमीवरील विद्युत एकजिनसी आहेत हें सिध्द करण्यासाठीं तो आतुर झाला होता. येतांना त्यानें एक ' लेडन बाटली ' आणली होती. या बाटलींत तो विद्युत्प्रवाह सांठविणार होता. या प्रवाहानें धक्का बसेल अशी त्याची अपेक्षा होती. पतंग वर उडत होता व बेंजामिनचें ह्दयही आशानिराशंनी खालींवर उडत होतें. त्यानें आपला ११ वर्षाचा मुलगा फक्त बरोबर आणला होता. आकाशांतील तोफखाना जोरानें धुडुम् धुडुम् करूं लागला. विजा लख्ख चमकूं लागल्या. दुस-याच क्षणी तागाच्या दोरीचे तंतु अंगावर शहारे यावे त्याप्रमाणें उभे राहिलें. विद्युतप्रवाह सुरू झाला. प्रयोग यशस्वी झाला. घनविद्युत व ही भूविद्युत एकच आहेत हें प्रसिध्द झालें. नंतर बेंजामिननें ठिणग्या पाडून पहिल्या तों खरेंच. मुलगा व बाप दोघांनींही त्या कुपींतील विद्युत्प्रवाहानें धक्के कसे बसतात याचा अनुभव घेतला.