एक दिवस बेंजामिन यास अकस्मात् एक पत्र आलें. तें पत्र बेंजामिनच्या बहिणीच्या नव-याचें होतें. बेंजामिनचाहा मेव्हाणा व्यापारी होता, व्यापाराच्या कांहीं कामानिमित्त तो न्यू यॉर्क येथें आला हाता. फिलाडेल्फिया येथील एका मनुष्याची व या बेंजामिनच्या आप्ताची न्यू यॉर्क येथें गांठ पडली. दोघांच्या गोष्टी चालल्या होत्या. बोलतां बोलतां ' फिलाडेल्फिया येथें एक तरूण हुशार मनुष्य आला आहे ' असें बेंजामिनच्या मेव्हण्यास या मनुष्यानें सांगितलें. ' त्याचें नांव काय ? ' असें विचारतांच तो फिलाडेल्फिया येथील मनुष्य म्हणाला त्या तरूणाचें नांव ''बेंजामिन फ्रॅकलिन ''. फ्रॅकलिन हें नांव ऐकतांच तो मेव्हणा चमकला आपला घराहून पळून गेलेला मेव्हाणा म्हणजेच बेंजामिन हें त्यानें ताबडतोब लक्षांत आणून बेंजामिन यास लौकर बोस्टन येथें परत जा असें पत्र लिहिलें.

बेंजामिनच्या थरची मंडळी त्याच्या अकस्मात् नाहींसा होण्यानें दु:खात चूर होऊन गेली होती. आई तर त्याचा ध्यासच घेऊन बसली होती. बेंजामिननें आपल्या मेव्हण्यास पत्र लिहिलें व त्यांत आपण कां आलों, जेम्स छळ कसा करी, वगैरे सर्व लिहून कळविलें. हें पत्र ज्यावेळेस मेव्हण्याचा हातांत पडलें, त्यावेळेस तें वाचून त्याला इतकें वाईट वाटलें कीं त्याला रडें कोसळलें. न्यू यॉर्कचा गव्हर्नर त्याच्या ओळखीचा होता; त्यास त्यानें हें पत्र वाचावयास दिलें. या गव्हर्नर साहेबांस बेंजामिनची सर्व इत्थंभूत हकीगत मेव्हण्यानें निवेदन केली. केवळ पंधरा वर्षाचा असतां ' करंट ' वर्तमान पत्र या मुलानें चांगल्या त-हेनें चालविलें हें ऐकून गव्हर्नर तर फारच संतुष्ट झाला. त्यानें बेंजामिनच्या गुणांचा गौरव केला. न्यूयॉर्कच्या या गव्हर्नरानें फिलाडेल्फिया येथील गव्हर्नरास बेंजामिनबद्दल कळविलें. ''या मुलाची मी भेट घेईन ''असें न्यूयॉर्कच्या गव्हर्नरास फिलाडेल्फिया येथील गव्हर्नरानें कबूल केलें.

'बेंजामिन फ्रँकलिन येथंच रहातो का ? 'गव्हर्नरानें छापखान्यांत येऊन विचारलें. गव्हर्नर साहेब स्वत: आपण होऊन घरीं चालून येतात व आपल्या एका नोकराची चोकशी करितात हें पाहून छापखान्याच्या मालकास फार आश्चर्य वाटलें. तो गव्हर्नरांस नम्रपणें सामोरा गेला व म्हणाला ' होय. महाराज, बेंजामिन येथेंच काम करावयास असतो. ''गव्हर्नर म्हणाला ' त्यास बोलावा बरें. ' बेंजामिन यास बोलावल्यावरुन तो तेथें आला, गव्हर्नर त्याच्या जवळ बोलत बोलत बाहेर आला व म्हणाला ' माझ्या घरीं जेवावयास ये.' गव्हर्नर नेहमीं बेंजामिनची वास्तपुस्त समाचार घेऊं लागले. थोडया दिवसांनंतर गव्हर्नर बेंजामिनला म्हणाला ''तूं स्वत: एखादा छापखाना कां काढीत नाहींस ? ''बेंजामिन म्हणाला ''मी अजून लहान आहें; आणि भांडवल तरी कोठून आणावयाचें ? ''गव्हर्नर म्हणाला ' तूं आपल्या घरीं जा; मी तुला एक चांगलें प्रशंसापत्र देतों; तें पत्र वडिलास दाखव, म्हणजे कदाचित् ते तुला मदत करितील व शक्य ते भांडवल पुरवतील. बेंजामिन यास हा दगड मारुन पहावा असें वाटलें. कुळ मिळालें तर ठीकच नाहींतर उमेदवारी व नोकरी आहेच. घरीं जाऊन आईस भेटण्यासही तो उत्सुक झालाच होता.

मालकास रजा विचारुन बोस्टनला जाणा-या गलबतांत बेंजामिन बसला. छापखान्याच्या मालकास बेंजामिन बद्दल मोठें कोडें पडें. मोठेमोठे गव्हर्नर या लहान पोराच्या मुलाखती घेतात, त्यास जेवावयास बोलावतात हें आहे तरी काय ! बेंजामिन ज्या वेळेस निघाला तेव्हां तयाचा मालक त्यास विचारतो ''आता बोस्टन येथील गव्हर्नरांस भेटावयास जातां कीं काय ? ''बेंजामिन फक्त हंसला मात्र - कांही बोलला नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel