बेंजामिनच्या मनांत आतां एक वर्तमानपत्र काढावें असें आलें. त्याचा जुना मालक जो होता, त्याच्याही मनांत वर्तमानपत्र काढण्याचें येत होतें. याच सुमारास इंग्लंडमधून वृत्तपत्राचें काम शिकून आलेला एक ओळखीचा मनुष्य बेंजामिनकडे आला. बेंजामिन त्यास म्हणाला ''तुमची आम्हांस जरूरी आहे; परंतु कांही दिवस थांबा, आम्ही वर्तमानपत्र काढणार आहोत. परंतु ही गोष्ट कोणास कळवूं मात्र नका. ''या गृहस्थानें बेंजामिनचा विश्वासघात केला. त्यानें ती हकीगत बेंजामिनच्या जुन्या छापखानेवाल्यास कळविली. तेव्हां त्या छापखानेवाल्यानें या मनुष्यास ताबडताब कामावर घेतलें. आणि ' गॅझेट ' या नांवाचें वर्तमानपत्र सुरु केलें.
बेंजामिन हा यामुळें खचून गेला नाहीं. या गॅझेटमधील पोरकट लेखांची टर उडविण्याचा त्यानें निश्चय केला. Mercury मर्क्युरी म्हणून दुसरें एक वृत्तपत्र होतें, यापत्रांत बेंजामिन यानें Busy Body ' कामसू ' या नांवाखाली टीकात्मक लेख लिहिले. व्यक्तिविषयक टीका न लिहितां, केवळ दोषाविष्करण करणें, व्यंगें दाखविणें, यांत बेंजामिन कसलेला होता. त्याची भाषा सोपी, सुटसुटीत, जोरदार, खोंचदार, विनोदपूर्ण, थोडक्यांत बव्हर्थ आणणारी, व्यवहारज्ञास रूचेल अशी हाती. गॅझेटची बेंजामिनच्या टीकेमुळें सर्वत्र छी: थू: होऊं लागली. कारण त्यांतील लेखांत विचाराच्या नांवानें आंवळयाएवढे पूज्य; भाषा नाहीं, विनोद नाहीं, कांही नाहीं. बेंजामिनच्या लेखांनीं या गॅझेटची गाळण उडविली, नुसती राळ उडविली. फक्त ९0 वर्गणीदार गॅझेट यास मिळाले. व तेही कमी कमी होऊं लागले. तेव्हां हा आंतबट्टयाचा व्यपार बंद करावा असें या छापखानेवाल्यांनीं ठरविलें. एक दिवस बेंजामिनकडे ते आले व म्हणाले ''हें पहा, गॅझेट पत्र आम्हांस नीट चालवितां येत नाहीं, तें मी विकून टाकूं इच्छितों, वृत्तपत्र चालविण्यासाठी निराळयाच गुणांचीं माणसें लागतात. हा माझा अनुभव आहे. आपल्या ठिकाणीं हें गुणव आहेत, तरी हें वृत्तपत्र तुम्हीं विकत घेतां कां ?
बेंजामिन यानें हें वृत्तपत्र विकत घेतलें व तें लोकप्रिय करण्याचा त्यानें शक्य तो प्रयत्न केला, त्याचे प्रयत्न यशस्वी झाले. त्याची बहिश्रुतता, विद्वता, अनुभवानें मिळविलेलें ज्ञान सुंदर व समर्पक भाषा, विनोद, कोटिक्रम यांमुळें हें वृत्तपत्र वजनदार व लोकप्रिय झालें. भराभरा वर्गणीदार वाढलें. बेंजामिनचें नाव सर्वतोमुखीं झालें.
बेंजामिनचा जुना मालक बेंजामिनच्या छापखान्याशीं मोठी टक्कर देऊं इच्छित होता. परंतु बेंजामिनच्या शहाणपणाच्या कारभारामुळें त्या कांहीं एक करतां येईना; त्या जुन्या मालकाची डाळ शिजेना. एक दिवस हा जुना मालक कांहीं कामानिमित्त बेंजामिनकडे आला होता. तेव्हां बेंजामिननें त्यास आंतील एका खोलींत नेलें व तेथें असलेला एक भाकरीचा तुकडा व पेलाभर पाणी यांकडे बोट दाखवून म्हटलें, ''हें पहा, जोपर्यंत आद्याच्याहून माझा खर्च जादा होत नाहीं, जोंपर्यत आमच्या गरजा थोडया आहेत व आम्हीं मिव्ययीपणानें वागत आहोंत, तोंपर्यत आमचें दिवाळें निघण्याची आम्हांस भीती नाहीं, ''बेंजामिनचें म्हणणें खरें होतें. आपें अंथरूण पाहून पाय पसरणारावर विपत्ति येऊं शकत नाहीं. उधळपट्टी व आलस्य यांचें व विपत्तीचें नीट जमतें.
बेंजामिनच्या या प्रतिसर्पध्याकडे सरकारी काम छापण्यासाठीं जात असें. परंतु एकदां गव्हर्नरच्या भाषणाचा जो सारांश प्रसिध्द केला तो नीट नव्हता. याच्या उलट बेंजामिननें जो सारांश लिहिला तो समर्पक व योग्य होता. तेव्हांपासून सरकारी कामही सर्व बेंजामिनकडेच येऊं लागलें. बेंजामिनची चलती होऊं लागली. 'उद्योगाचे घरीं ऋध्दिसिध्दी पाणी भरी ' ही म्हण यथार्थ झाली.