अशा प्रकारची सक्त शिकवणूक मनास लावून त्यानें दुर्गुणांचें निर्मूलन केलें. त्याच्या अंगांत अनेक गुण होतें. उद्योगीपणा हागुण तर फार अमौलिक होता. एक क्षणहि तो फुकट दवडीत नसे. जेवतांना सुध्दां तो गप्पागोष्टी मारीत नसे, तर आपल्या मुलांबराबार निरनिराळया विषयांवर तो संभाषण चालवी. कधीं कधीं भोजनाचे वेळी दुसरे मोठमोठे लोक बोलावून त्यांच्या जवळ तो विचारविनिमय करी व हें सर्व बोलणें मुलांच्या कानांवरून जावें हा त्याचा हेतु असे. म्हणजे भोजनाचे वेळींही तो मनास अन्न देण्यास विसरत नसे. ' क्षणश: क्रम शश्रवैव विद्यामर्थ च साधयेत् ' हें तत्व त्याच्या रोमरोमीं भरुन गेलेलें होतें. शाळेंत न जातां, मोठमोठया गुरूंच्या प्रत्यक्ष हाताखाली व देखरीखीखालीं न शिकतां त्यानें जें अफाट ज्ञान मिळविलें, पैसे जवळ नसतांहीं, पुस्तकें स्वत:ची नसूनही अनंतश्रमानें त्यानें ज्ञानार्जनन कसें केलें हें पाहिजें म्हणजे आमच्या विद्यार्थ्यानीं लाजेनें मानाखालीं घालाव्या. प्रयत्ना शिवाय बेंजामिनला ज्ञान कसें मिळतें ? ' सुखार्थिन :कुती विद्या ! कुतो विद्यार्थिन : सुखम् !! जो सुखविलासांच्या पाठीमागें लागला, त्याला विद्या प्रापत होणार नाहीं; विद्या पाहिजे असेल तर सुखाचात्याग केला पाहिजे. विद्या मिळविण्यांतच आनंद मानला पाहिजे. बेंजामिननें विद्येसाठी सुखावर निखारा ठेविला. पुस्तक मिळेल तेव्हां व वेळ नसेल तेव्हां त्यानें फार अधाशापरीं वाचलें, म्हणूनच तो तत्त्वज्ञ झाला. वेळाची किंमत त्यास फार वाटे. वक्तशीरपणा आपल्याकडील रावसाहेब मंडलिकांप्रमाणें बेंजामिनच्या अंगीं होता. त्यास वेळेचें महत्व किती वाटे या विषयीची एक गमतीची गोष्ट सांगतों. एकदां बेंजामिनच्या पुस्तकांच्या दुकानांत एक गृहस्थ पुस्तक विकत घेण्यासाठीं आला. पुस्तकें विकण्यासाठीं एक नोकर होता त्यानें त्या पुस्तकाची किंमत त्या गृहस्थास सांगितली. तो गृहस्थ ''कमी घेणार नाहीं का ? ''वगैरे घासाघीस करूं लागला. पुस्तक विकणारा नोकर म्हणाला, ''आंत बेंजामिन साहेब आहेत, त्यांस मी विचारून येतों. ''नोकर आंत गेला. नोकराचें म्हणणें ऐकून बेंजामिन बाहेर आला. त्यास गि-हाइकानें पुस्तकाची किंमत विचारली. बेंजामिन म्हणाला ''एक डॉलर व एक पेन्स. ''तुमच्या नोकरानें तर १ एक डॉलरच सांगितली, तेव्हां तुम्ही जास्त कशी सांगतां ? खरी किंमत सांगा, ''असें तो गृहस्थ म्हाणाला. बेंजामिन म्हणाला, ''एक डॉलर दोन पेन्स. ''''माझी थट्टा का आपण आरंभिली आहे ? मला तुमचें पुस्तक खरोखरच विकत घ्यावयाचें आहे. ''तो गृहस्थ पुन्हां म्हणाला. बेंजामिन म्हणाला ''एक डॉलर तीन पेन्स. ''त्या मुर्ख गि-हाइकाच्या लक्षांत कांहीच येईना. तेव्हां बेंजामिन म्हणाला, ''माझे एक एक मिनिट फुकट जातें आहे. प्रत्येक क्षण मोलाचा आहे. प्रत्येक मिनिटाबद्दल मी १ पेन्स जास्त घेणार. फुकट गप्पा मारण्यासाठीं व घासाघिशी करण्यासाठीं माझा वेळ नाहीं. ''आतां कोठें त्या गि-हाइकाच्या डोक्यांत प्रकाश पडला.
वेळेचें महत्व होतें, त्याप्रमाणें सत्याची पण बेंजामिन यास चाड होती. व्यक्तिविषयक टीका तो कधीं करीत नसें. एकदां एक श्रीमंत गृहस्थ व्यक्तिविषयक कटु टीकेनें भरलेला एक लेख घेऊन बेंजामिनकडे आला व म्हणाला, ''आपल्या वृत्तपत्रांत माझा हा लेख छापा. ''बेंजामिननें लेख पाहून नका दर्शविला. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, ''मी पुष्कळ पैसे पण देईन-छापा. ''बेंजामिन निश्चयपूर्वक म्हणाला, ''नाहीं. व्यक्तिविषयक टीका प्रसिध्द करून मी श्रीमंत होऊं इच्छित नाहीं. हें पहा, माझें अन्न साधें असतें ;माझा पोषाख साधा असतों; तेव्हां असले लेख मी कशास प्रसिध्द करूं ? मला केवळ पैशाची मातब्बरी नाहीं. ''तो श्रीमंत मनुष्य तोंडांत मारल्याप्रमाणं होऊन निघून गेला. बेंजामिनच्या ठिकाणी अशी तत्वनिष्ठा व सत्यप्रीति होती म्हणून त्याचा द्वेष कोणी केला नाहीं. तो सर्वास वंद्य, पूज्य व आदरणीय वाटे.
उद्योग, श्रमसातत्य, चिकाटी, सत्यप्रीति, या गुणांच्या जोरावर तो थोर पदवीस चढला; त्यानें मेघांपासून वीज आणली, व जुलमी राजांकडून देशास स्वातंत्र्य आणून दिलें. बेंजामिन हा व्यावहारिक शहाणपणाबद्दल फार प्रख्यात आहे. लहानलहान अर्थगंभीर वाक्यें - ज्यावाक्यात अनुभवाचें बोल ओतलेले आहेत अशीं म्हणीं सारखीं सुटसुटीत शेकडों वाक्यें बेंजामिननें आपल्या रोजनिशांमधून प्रसिध्द केलीं. ती वाक्यें आज सर्व जगाच्या तोंडीं आहेंत. असा जगत्-शिक्षक अन्य झाला नाहीं. हीं सुटसुटित वाक्यें लोकांच्या जिभेंवर बसून गेलीं आहेत. परंतु हीं वाक्यें लिहिणारा बेंजामिनच होता हें मात्र कोणास माहीत नसतें. बेंजामिन यास हें विद्वत्त्व कोणीं दिलें ? अनुभवानें, व निरीक्षणानें. महाविद्यालयांतील शिक्षण हें अनुभवात्मक शिक्षणाप्रमाणें जिवंत व कीर्तिकर होऊं शकत नाहीं. पुस्तकी ज्ञानास अनुभवाची जोड पाहिजे, म्हणजेच मनुष्य कार्यक्षम होतो. बेंजामिनच्या वाक्यांतील कांहीं महत्वाची वाक्यें शेवटीं परिशिष्टांत दिलीं आहेत. ती बालवाचकानीं ह्त्पटलावर खोदून ठेवावीं व तसें वागावें.
एकंदरीत हें बेंजामिनचें चरित्र कांदबरीपेक्षांही रसाळ व नवनवल कथांनीं नटलेले आहे. येथील प्रत्यक्ष वस्तुस्थिति कांदबरींतील काल्पनिक सृष्टिपेंक्षां मनोरम व आश्चर्यकारक आहे. दारिद्रय, अडचणी, संकटें यांच्यावर बेंजामिननें मिळविलेले विजय अद्भुतरम्य आहेत. त्याची निश्रयता, काम करण्याची हातोटी, युक्ति, कार्यभक्ति, उद्योग, तडफ यांमुळें व इतर गुणांनीं त्याचें चरित्र सर्वास आदर्शभूत झालें आहे. आयुष्यांत त्याचा अनेकदां हिरमोड झाला; परंतु पराजयानें खचून न जातां तो ' कीं तोडला तरु फुटे आणखी भरानें ' या न्यायानें जास्त जास्त पुढेंच गेला. यश मिळवीत चालला. वैभव वाढूं लागलें, व्याप वाढला तसतसे जास्त उदात्ततर पदार्थ मिळविण्यास तो झटला. नेहमीं उन्नत होत जावें ही त्याची दृढ इच्छा होती. आजची एक घडी उद्यांच्या दोन घडींच्या बरोबरची आहे असें तो मानी. जाणारी वेळ मोलाची तो समजे. मेणबत्त्यांचें दुकान, छापखाना येथें त्याची अभ्यासाची जागा होती. निरीक्षण आणि अनुभव हे त्याचें शिक्षक होते. यांच्या जोरावर १८ व्या शतकांतील तो नामांकित मुत्सदी झाला; देशबांधवांचा विश्वस्त वकील झाला. बेंजामिननें कधीं उतावीटपणा केला नाहीं; तो एक शब्दसुध्दां कमी अधिक बोलला नाहीं. योग्य वेळीं व योग्य तेंच तो सदा बोले व करी. मितव्ययी, मितभाषी, मिताहारविंहरी विवेकी, विरागी व विद्यावंत, असा तो अमेरिकेंतील योगी होता. असा हा थोर पुरूष अमेरिकेनें जगास दिला. त्याच्याकडे पाहून आपलीं चुकणारी पावलें आपण नीट वाटेंवर आणावी आणि सुख व समाधान हीं मिळवत जन्म सार्थकीं लावावा हीच वाचकांस सविनय व सप्रेम प्रार्थना आहे.