बेंजामिनच्या डोक्यांतून ही गोष्ट कधीं गेली नाहीं. त्यानें वृध्दपणी लिहिलेल्या अनेक पत्रांमूधन त्यानें या शिटी प्रकरणाचा उल्लेख केला आहे. तो एके ठिकाणी ही गोष्ट सांगून मग लिहितो ''शिटीसाठीं पुष्कळ पैसे देणारी मी अनेक माणसें जगांत पाहिलीं आहेत. एखाद्या मनुष्य राजाची मर्जी प्रसन्न करून मोठें पद मिळविण्याची महत्वाकांक्षा धरितो; या महत्वाकांक्षेसाठी
तो आलें विचारस्वातंत्र्य, वाक्यस्वातंत्र्य, आपले सर्व सदुण, आपले स्नेही सोबती, आपलें सात्विक समाधान सर्व देऊन टाकतो, म्हणजेच तो क्षुल्लक दीड दमडीच्या शिटीसाठीं बहुत देतो; आपलें काम सोडून उगीचच्या उगीच समाजांत पुढें येऊं पाहणारा याच वर्गातील एखाद्या कृपण सर्व थोर सुखें सोडून दुस-यावर उपकार करणें, बंधुभाव वगैरेंस फांटा देऊन केवळ द्रव्याची पूजा करितो - म्हणजेच तो शिटीसाठीं पुष्कळ देतो. मानसिक समुन्नति सोडून देऊन जो केवळ शारीरिक सुखास लांलचावलेला, सवकलेला असतो तो याच नमुन्याचा केवळ झकपक पोषाख करून नटतो मुरडतो; कर्जबाजारी होतो. तो शिटीसाठीं पुष्कळ खर्च करिता, ''याप्रकारें बेंजामिननें आपले विचार या मननीय पत्रांत नमूद केले आहेत 'मनुष्यप्राणी हा जात्या स्खलनशील आहे; मूर्खपणा करण्याकडे त्याची स्वाभाविक प्रवृत्ति आहे ' असें इरॅस्मस या पंडितानें एके ठिकाणीं लिहिलें आहे. परंतु चुकांनीं शहाणें होणं, अनुभवानें चुकतें पाऊल सरळ मार्गावर आणणें यांत मनुष्याच्या मोठेपणाचें बीज आहे. नाहीं तर पशू व आपण सारखेच. किंबहुना पशुपेक्षांही कमी दर्जाचे ठरूं.
बेंजामिनचे वडील गरीब होते. त्यांस मोठया कुटुंबाचें पोषण करावयाचें असे. एवढया २0 माणसांच्या कुटुंबांस नको काय ? तीन दगड मांडलें म्हणजे सारें त्रिभुवन लागतें अशी आपल्यांत म्हणच आहे. तरी पण जोशिया हें समाधानानें राहात होते. परंतु मुलांस शिक्षण वगैरे देणें त्यांस झेंपत नसें. सात वर्षाचा असतां बेंजामिन हा स्वत:च प्रयत्न करून वाचावयास शिकला. मुलाची ही जिज्ञासा पाहून बापास कौतुक वाटलें व त्याबरोबर वाईटही वाटलें. मुलगा हुशार व कष्टाळू आहे हें पाहून पित्यास आनंद होई. परंतु अशा होतकरू मुलास मला नीट शिकवितां वगैरे येत नाहीं या विचरानें त्या दरिद्री पित्याच्या ह्दयाचें पाणी होई.
परंतु कांहींही होवो, बेनला शाळेंत घालावयाचेंच असें त्याच्या आईबापांनीं निश्चित केलें. बेंजामिन यास फार आनंद झाला. तो दोन वर्षे शाळेत होतो. त्याची हुशारी, तरतरी, अभ्यास व जिज्ञासू वृत्ति सर्व मुलांच्या पेक्षां नेहमीं अभ्यासांत पुढें असणें या सर्वाचाशाळेच्या गुरुच्या मनावर फार चांगला परिणाम झाला गुरुची मर्जी बेंजामिनवर बसली. बेंजामिन यांस परीक्षा होईपर्यत वरच्या वर्गात जाण्याची वाट पहावी लागत नसे. त्यास भराभर वरच्या वर्गात चढविण्यांत आलें. इतर मुलांस बेंजामिनचा हेवा वाटे. बेंजामिन बौध्दिक व अभ्यासिक बाबतीत पुढें असे असें नव्हे तर खेळांतही तो प्रवीण होता. त्याचें शरीर व मन दोन्ही उत्साहानें उसळत होती.
दोनच वर्षे बेन शाळेंत गेला. आतां त्याला शाळेंतून काढणें जरून होतें. बापास फारसे पैसे मिळत नसत. शिवाय वडील मुलगा दुस-या गांवीं गेल्यामुळें बेंजामिन यास बापास धंद्यात मदत करण्यास घरींच राहावें लागले. पुस्तकें, वाचन, अभ्यास यांस सोडचिट्टी देऊन त्या मेणबत्त्या करीत बसणं बेंजामिन यास आवडेना. उडूं पाहणा-या पांखराचे पंख धरुन ठेवावे त्याप्रमाणं बेंजामिनच्या ज्ञानोत्सुक मनाची स्थिती झाली. परंतु तसाच तो आपलें जें नीरस काम करीत होता. आईबापांस संतुष्ट करणें, कोणतेंही काम करावयास तयार असणें हें तो लहानपणापासून शिकला होता. त्याचा बाप त्याला लहानपणी एक वाक्य वारंवर सांगत असे ''Seest thou a man deligent in his business ? He shall stand before kings; he shall not stand before mean men '' याचा अर्थ (स्वत:च्या कामांत दक्ष असा माणुस तुला दिसतो का ? तर तो राजदरबारीं कामकाज करील; तो नीच मनुष्यांसमोर उभा नाहीं राहणार) आणि खरोखरच हा मेणबत्ती करणारा बेंजामिन पुढें राजदरभारीं मोठा मुत्सदी, तसाच तत्वज्ञ, शास्त्रज्ञ म्हणून युरोपभर व अमेरिकेंतही गाजला.