चार पैसे शिल्लक राहूं लागल्यावर बेंजामिननें पूर्वीच ठरलेल्या आपल्या वधूशीं विवाह केला. उभयतांच्या जन्माच्या गांठी पडल्या व सुखसागरांत तीं पोहूं लागलीं. संसार सुखानें चालला एकदां आपल्या जन्मग्रामास बोस्टनला जावें असें त्यास वाटलें. तो गेलाहीं. त्यावेळीं त्याचा भाऊ जेम्स हा आजारी होता. जेम्सला भेटावयास बेंजामिन त्याच्या घरीं गेला. पूर्वी आपल्या भावाजवळ आपण नीट वागलों नव्हतों याचें जेम्सला आतां वाईट वाटलें. त्यानें बेंजामिनजवळ आपली चूक कबूल केली व म्हणाला, ''झालें गेलें सर्व विसरून जा, आतां आपण एकमेकांवर प्रेम करावयास शिकूं. ''बेंजामिननें मन तर पूर्वीपासूनच पवित्र व निर्मत्सर होतें. भावाचें पश्चातापयुक्त बोलणें ऐकून त्यास गहिंवर आला. उभयतां बंधूच्या डोळयांत अश्रू उभें राहिलें. जेम्स बेंजामिनला म्हणाला, ''बेन, या दुखण्यांतून नीट बरा होऊन मी हिंडूं फिरुं लागेन असें शक्य दिसल नाहीं. मृत्यूची भीषण छाया मला समोर नेहमीं दिसते. मी मेल्यानंतर माझ्या या १0 वर्षाच्यामूलास तूं आपल्या छापखान्यांत शिकव व मग त्याला त्याच्या आईकडे पाठवून दे. तोंपर्यत त्याची आई कसेंबसें काम चालवील. ''मरणोन्मुख बंधूची शेवटची प्राथर्ना बेंजामिननें मान्य केली. ''मी माझ्या मुलाप्रमाणे त्याचें पालन करीन; त्यास शिकवीन सावरीन, त्याच्यावर प्रेमाचें पांघरून घालीन ''असें भरल्या कंठानें बेंजामिननें आश्वासन दिलें. पुढें लवकरच जेम्स दिवंगत झाला. बेंजामिननें त्याच्या मुलास फिलॅडेल्फिया येथें आणलें व मुलाप्रमाणें त्याच्यावर ममता करून त्यास वाढविलें.

बेंजामिन यासही एक सुंदर मुलगा आतां झाला होता. त्या मुलाचें मुखमंडळ फारच सुरेख व डोळे पाणीदार होते. फुलाप्रमाणे सुकुमार असें हें मूल ४ वर्षाचें झालें न झालें तोंच काळानें हिरावून नेलें. त्याच्या प्रेतावरील कबरीवर बेंजामिननें ''सर्वांचा लाडका ''असें वक्य लिहिलें होतें.

कौटुंबिक परिस्थितींत अशी स्थित्यंवरें होत होतीं. परंतु लौकिक स्थिति मात्र झपाटयानें सुधारत होती. बेंजामिन हा मोठा माणूस समजला जाऊं लागला. त्यानें आपल्या छापखान्यांत सुंदर रोजनिशा वगैरे छापून काढावयाचा प्रघात सुरु केला. त्यांमध्यें सुंदर म्हणी घालून तद्द्वारा लोकांस व्यावहारिक शिक्षण पण त्यानें दिलें. या रोजनिशा फार लोकप्रिय झाल्या. बेंजामिन यास बरेच पैसे मिळूं लागलें. छापखान्यास जोडून एक स्टेशनरीचें व पुस्तकविक्रीचें पण दुकान काढावें असें बेंजामिननें ठरविलें. इंग्लंडमधून निरनिराळीं निवडक व चांगलीं पुस्तकें तो मागवी. लोकांस वाचनाची चटक त्यानें आपल्या वृत्तपत्रानें लाविलीच होती. फिलॅडेल्फिया शहरांत बेंजामिन यानें निरनिराळया सर्वजनिक चळवळी वगैरे करावयास सुरूवात केली. त्याचा इतिहास थोडक्यांत पुढील प्रकरणांत देऊं. उद्यागानें, श्रमसातत्यानें, सचोटीने व धैर्याने बेंजामिन सुखाचे दिवस पाहूं लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel