आपले जुने मित्र, जुन्या आठवणी सर्व बेंजामिनच्या डोळयासमोर आलें. आपली आई आपल्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल, आपल्या गमनानें तिला कसा आनंद होईल वगैरे विचारांनी त्याचें उदार व उमदें ह्रदय भरून गेलें होतें. शेवटी एक दिवस बेंजामिन पुनरपि बोस्टन बंदरांत दाखल झाला.
तडक तीरासारखा तो आपल्या घरीं आला, बेनला पाहतां क्षणींच आईबापांस आनंदाचें भरतें आलें. मागें त्यांच्या एक मुलगा १२ वर्षांनीं परत आला होता, त्या वेळेसारखेंच या वेळेसही वाटलें. आई म्हणाली बेन, कितीरे कठोर मनाचा तूं ! तुझ्यासाठीं मी सारखी रडत असतें; अश्रु अद्यापही खळले नाहींत.
सर्वाच्या भेटी झाल्या, बेंजामिननें सर्व हकीगत सांगितली. गव्हर्नरनें दिलेलें पत्र त्यानें आपल्या वडिलांस दाखवितें. जेम्सचें पूर्वीचें अनुदार वर्तन विसरून बेंजामिन त्याच्या पण घरीं भेटण्यासाठीं गेला. बेंजामिनच्या मनांत राग, द्वेष कांहीं एक नव्हतें. झालें गेलें विसरून जाण्यास तो तयार होता. परंतु जेम्स कोठें तयार होता ? जेम्स उन्मत्त व गर्विष्ठ होता. उदार मनस्क बेंजामिनजवळ तो एक शब्दही बोलला नाहीं.
हिरमुसला होऊन बेंजामिन घरीं आला. बेंजामिनबद्दल ज्यास फार आस्था वाटे तो बेंजामिनचा मेव्हणा पण बोस्टन येथें यास सुमारास आला. त्यानें बेंजामिनच्या बापास सर्व परिस्थिती समजून सांगितली परंतु बेंजामिनचा बाप फारच सावधगिरीनें वागणारा होता. तो बेनला म्हणाला ' तू २१ वर्षाचा हो; मग मी भांडवल देण्याच्या भेरीस पडेन. तोंपर्यत तूं विविध अनुभव मिळव व शहाणां आणि हुशार हो. '
बेंजामिन यास वाटलें होतें तसेच झालें. उगवती आशा लगेच मावळली. त्याला आपल्या बापाच्या स्वभावाची माहिती होतीच - परंतु गव्हर्नराच्या आग्रहास्तव तो तेथें आला होता. शेवटीं पुनरपि फिलडेल्फिया येथें जाण्यास तो निघाला. त्यानें या वेळेस कपडेलत्ते, पुस्तकें सर्व कांही बरोबर घेतलें. आईबापांनीं त्यास मंगल आशिर्वाद दिला. बेंजामिन पुनरपि फिलाडेल्फिया येथें येऊन आपल्या कामावर रूजू झाला. त्याच्या मालकास अर्थात् फार आनंद झाला.