बेंजामिन यांस आतां फार भूक लागली; त्याच्या पोटांत कावळे ओरडूं लागलें. भुकेनें जीव कासावीस झाला. तो रस्त्यांतून कोठें तरी भटकत चालला होता. समोरून एक गृहस्थ पावरोटी घेऊन जात होता. बेंजामिननें विचारिलें ''कोठें बरें पावरोटी विकत मिळतें ? ''त्या गृहस्थानें बेंजामिन यास त्या दुकानाची खूण सांगितली. बेंजामिन त्या दुकानांत गेला. त्यांच्या खिशांत किती पेसे असतील असें तुम्हास वाटतें ? फक्त १ शिलिंगच त्याच्याजवळ होता. तेवढा शिलिंग कां संपला एकदां, म्हणजे बेंजामिन यांस त्या शहरांत कसलाही व कोणाचाही आधार नव्हता.

त्या शिलिंगातून ३ पेन्सचा त्यानें पाव मागितला. रोटीचे तीन मोठेमोठे तुकडे त्यास मिळालें बोस्टन शहरांत महागाई फार असे. तीन पेन्सांना तेथें १ रोटी मिळे. येथील ही स्वस्ताई पाहून बेंजामिन यांस धीर आला. व मनांत म्हणाला ' उरलेले पैसे मला ४/५ दिवस तरी पुरतील. तेवढया वेळांत मला कोठें तरी नोकरी चाकरी बहुधा मिळेल.

तीन तुकडे मिळाले, त्यापैंकी एकाचा त्यानें तेथेच चट्टापट्टा केला. उरलेले दोन तुकडे हातांत गुंडाळून घेऊन तो जात होता. वाटेंत जातांना एक गरीब बाई त्याला दिसली. त्या बाईला एक मूल होतें. उभयंता मायलेकरें पोटांत कांही नसल्यामुळें कंठांत प्राण घेऊन बसलीं होती. ती गरीब बाई शोक करीत होती. बेंजामिनचें उदार व तरुण ह्दय कळवळलें, त्यानें ते उरलेले दोन तुकडे त्या बाईस दिले व त्या बाईनें त्याला दुवा दिला - धन्यवाद दिला. बेंजामिनची ही उदारता, स्वत: विपन्न असूनही दुस-याचें दु:ख दूर करण्याची ही तत्परता कोणाच्या मनास मोहणार नाहीं ?
कोठें जावें, आश्रय कोणाजवळ मागावा हें बेंजामिनला सुचेना. ओळख ना देख. तो एका चर्चमध्यें (प्रार्थनमांदिरामध्यें) शिरला तेथें प्रार्थना चालली होती. एका कोंप-यांत बेंजामिन पडून राहिला. त्याला दमून गेल्यामुळें तेथेंच गाढ झोंप लागली. प्रार्थना संपली व लोक घरोघर निघून गेले. दरवाजा बंद करणारा नोकर आला, तो त्याला हा मुलगा आढळला. त्या नोकरानें बेंजामिन यास जागे केलें. बेंजामिन त्या नोकरास म्हणाला ' मला एखाद्या खाणावळीचें ठिकाण दाखवाल, तर मी आपला फार आभारी होईन. ' त्या गृहस्थानें एक सभ्य व मध्यम वर्गातील लोकांस आवडेल अशी एक खानावळ बेंजामिन यास दाखवून दिली.

बेंजामिन खानावळींत जाऊन उतरला व एका खोलींत त्यानें रहाण्याची सोय लावून घेतली. नंतर दुसरे दिवशीं न्यू यॉर्क येथील ज्या गृहस्थाच्या मुलास भेटावयाचें त्यानें ठरविलें हातें, त्याच्याकडे बेंजामिन गेला. बेंजामिन यास जो सद्गृहस्थ न्यू यॉर्क येथें भेटला होता, तो स्वत:च घोडयावर बसून बेंजामिन येण्याच्या आधींच फिलाडेल्फिया येथें आपल्या मुलांकडे आला होता. या सद्गृहस्थांच्या मुलाच्या छापखान्यांत नुकताच नवीन मनुष्य ठेवला असल्याकारणानें जागा रिकामी नव्हती; परंतु त्या सद्गृहस्थानें बेंजामिन यास दुस-या एका छापखानेवाल्याकडे नेलें. मात्र ४/५ दिवसांत बेंजामिनची सोय लागली.

बेंजामिन यास छापखान्याच्या कामाची चांगलीच माहिती होती. कोणतेंही काम तो अर्धवट शिकत नसे. जें काय त्याला येत असे, तें नीट चांगलें येत असे. बेंजामिनची टापटीप, तरतरी व हुशारी पाहून तो छापखानेवाला त्याच्यावर खूष झाला. बेंजामिन यास येथें मित्र स्नेही पुष्कळ मिळाले. या मित्रांत कोणी लेखक, कोणी कवि असे होते. हे सर्व तरुण विशीच्या आंतील होते. त्यांचा सर्व वेळ मोठया आनंदांत जाई. दिवसभर काम केल्यावर हे रात्री एकत्र जमत असत आणि निरनिराळे लेख, कविता वगैरे लिहून वाचीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel