त्या दप्तरांतील आनंदीबाई, राघोबादादा, सखारामबापू, निजामअल्ली वगैरे इतिहासप्रसिध्द व्यक्तीसंबंधी दप्तरांत उपलब्ध असलेले कागद निरनिराळे बांधण्यास त्यांनी ८० रुपये खर्च करून कापड विकत घेतलें व सर्व रुमालावर निरनिराळया व्यक्तींची नांवें घालून व्यवस्थित दप्तर लावून ठेविले. यांत नाना नेहमी उपयोगांत आणीत असत ते नकाशे त्यांनी एका निराळयाच दप्तरांत बांधून ठेविले होते. त्यांतील एक दोन नकाशे गळवठले असल्याचे आढळल्यावरुन राजवाडयांनी चौकशीस सुरुवात केली. परंतु राजवाडे यांनीच ते चोरले असा मालकानें आरोप घेतला. स्वाभिमानी व नि:स्पृह राजवाडयांस ही गोष्ट कशी सहन होणार ! अनंतश्रम करुन यांची दप्तरें तपासा व परत ही दक्षिणा ! राष्ट्राचा इतिहास तयार करुं पाहणा-या पुरुषाची अशी ही पूजा ! त्यांनी मेणवली दप्तराचा नाद सोडून दिला ज्या ज्या वेळेस त्यांस या दप्तराची आठवण येई. त्या त्या वेळीं त्यांचें मन उद्वेगाने भरुन येई. पुढें नानाफडणीसाचें महत्वाचें प्रचंड दप्तर श्रीमंत शेट पुरुषोत्तम विश्राम मावजी व पारसनीस यांचे हाती गेलें.
याच सुमारास पारसनीस यांनी ब्रम्हेंद्रस्वामीचें चरित्र व पत्रव्यवहार प्रसिध्द केला. या खंडांत पारसनीस यांनी प्रथम १०० पानांत ब्रम्हेंद्राचें जें चरित्र देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांत ब्रम्हेंद्रांस त्यांनी रामदासांच्या पायरीस नेऊन बसविले आहे. फार थोर जनपदहितकर्ता व सल्लागार म्हणून त्याची महती त्यांनी त्यांत गायिली आहे. परंतु ज्या पत्रांवरुन हें चरित्र रचिलें त्यांत ब्रम्हेंद्राचें चरित्र निर्विकार दृष्टीने पाहिलें तर खरोखर निराळें दिसतें. राजवाडे यांनी ब्रम्हेंद्रासंबंधी अल्पच पत्रें मिळवून प्रसिध्द केली व या तिस-या भागांत प्रस्तावनेंत त्यांनी ब्रम्हेंद्रांचें त्यांच्या दृष्टीने खरें स्वरूप दाखवून दिलें. या भागाची ही प्रस्तावना अशीच फार मार्मिक आहे. ब्रम्हेंद्र स्वामी हा कलागती लाविणारा, भांडणे लावणारा, सावकारी वृत्तीचा एक सामान्य माणूस होता व राष्ट्राचें नुकसान करण्यास मात्र कारणीभूत झाला, असें राजवाडे यांनी आपलें मत स्थापिलें. या प्रस्तावनेंत ते एके ठिकाणी लिहितात 'राष्ट्रांतील पुढारी व नेत्या पुरुषांची दानत धुतल्या तांदळासारखी असेल तरच कल्याण होतें.' उघडच आहे 'महाजनी येन गत: स पंथा:' समाजातील नेते, त्यांचे गुरु जर ब्रम्हेंद्रासारखे चुगलखोर निघाले तर इतरांनी त्यांचेंच अनुकरण केलें तर त्यांत नवल काय ?
राजवाडे यांची ही प्रस्तावना प्रसिध्द झाल्यावर विविधज्ञान विस्तारांत कित्येक महिने खडाजंगी चालली होती. राजवाडे यांचें लिहिणें जरी जरा जास्त दिसलें, तरी तें यथार्थ वाटतें. ब्रम्हेंद्रास सिध्दी वगैरे असेल, परंतु विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणें सिध्दीच्या मार्गानें मनुष्य एकादे वेळेस अवनतीस जातो, चमत्कार करून मोठेपणा मिरवावा असें त्यास वाटूं लागतें. त्याच मासल्याचा ब्रम्हेंद्र असावा असें वाटतें. त्याच्या पत्रांत कांहीना कांही तरी पैसे, खाद्य पेयें यांच्या शिवाय शब्द दिसत नाही. असला घृतमधु सेवन करणारा व याचे पैसे घेऊन त्यास देणारा संन्यासी राष्ट्रकार्यधुरंधर रामदासांच्या पंक्तीस कोण बसवील? सावकारांच्या दारांत कपाळ छिनत चाललें असले उद्गार निराश होऊन तो रणपंडित अचाट कर्तृत्वशाली बाजीराव काढतो व ब्रम्हेंद्र त्यास स्वत:च्या कर्जाचा तगादा लावितो. वाहवारे गुरु ! असो. हे मतभेदाचे प्रश्न आहेत. परंतु ब्रम्हेंद्राच्या पत्रांवरुन तरी ते रामदासांच्या पासंगासही पुरणार नाहीत अशी विचारशील मनाची खात्री होते.