महाभारत, ब्राम्हणें या कालांतील अनेक गोष्टीवर शेंकडों निबंधाची रुपरेखा त्यांच्या मनांत होती. तसेंच वेदमंत्रांचें वर्गीकरण करुन संगति लावून आपण स्वत: बसविलेल्या उपपत्तीप्रमाणें वेदांचा खरा अर्थ करून दाखवावा व या विषयावर हजार दोन हजार पानांचा ग्रंथ लिहावा असा त्यांचा मनोदय त्यांनी सातवळेकरांजवळ अनेकदा व्यक्त केला होता. त्याप्रमाणेंच आर्य लोकांच्या विजयाचा एक मोठा ग्रंथ ते लिहिणार होते. या ग्रंथाची त्यांनी खालीलप्रमाणें रुपरेखा आंखली होती.
१ क्षेत्रांतील पंडयांच्या वह्यांवरून अखिल हिंदुस्थानांतील आर्यांची आडनांवे संगतवार लिहून काढणें व त्यांचें सामाजिक वर्गीकरण फार काळजीपूर्वक करणें.
२ नंतर हिंदुस्थानांतील बाहेरच्या देशांतील गांवांची नांवे पाहून त्या आडनांवाचा व त्या स्थानांचा संबंध ऐतिहासिक व सामाजिक दृष्टीनें निश्चित करणें.
३ शक्य तितक्या अधिक गांवांचें अति प्राचीन नांव शोधून काढून आर्यांच्या हालचालीच्या दृष्टीनें त्यांचें महत्व निश्चित करणें.
४ या व अशा अनेक महत्वाच्या मुद्यांचे संगतिकरण करून आर्यांच्या एकंदर क्रांतीचें व विजयाचें स्वरुप दाखविणें अशा प्रकारच्या अलौकिक ग्रंथाला त्यांनी आरंभ केला होता हें मागें सांगितलेंच आहे. परंतु त्यांचें हें काम आतां कोण करणार ?
मरेपर्यंत अशी सांस्कृतिक व उब्दोधक कामगिरी ते करणार होते. ८५वर्षेपर्यंत ही कामगिरी करून मग ते एकान्तवासांत रहाणार होते. केवढा हा आत्मविश्वास व आयुष्याच्या सार्थकतेसंबंधी कोण ही महनीय खटपट.
या सर्व श्रमांची गुरुकिल्ली आपल्या समाजास जागें करणें यांत आहे. या बाबतींत ते कधी कधी उद्विग्न होत व हताश होत. परंतु पुनरपि प्रयत्नास लागत. शारदामंदीराच्या अध्यक्षस्थानी असतां त्यांनी मराठी भाषेचें व एकंदर भारतवर्षाचें एक दुर्दैवी चित्र काढलें होते. मराठी भाषा मरत जाणार व हिंदुस्थान म्हणजे गुलाम व मजुरांचे राष्ट्र होणार असा भयसूचक ब्युगूल त्यांनी वाजविला. परंतु अशी निराशा दिसत असूनही ते प्रयत्न अखंड करीत होते. निराशेची आशा त्यांच्या जवळ होती. दामले यांच्या वाकरणाचें परीक्षण करून ते शेवटी म्हणतात 'प्रत्येकानें आपापलें काम स्वत:च करावें हें श्रेयस्कर, कां की, प्रस्तुत काली आपल्या देशांतली परिस्थितीच अशी आहे. कोणतेंही शास्त्रीय काम करण्याला ह्या देशांत प्राय: अनेक तर सोडून द्या पण अर्धाहि माणूस तयार झाला नाही. तेव्हा श्रमविभाग होण्याची आशा करणें आणीक पन्नास शंभर वर्षे ह्या देशांत अयुक्त होय. कधी काळी चुकून माकून एखाद्याच्या मनांत कांही शास्त्रीय कृत्य उठविण्याचें सुदैवानें मनांत आलें व मनांत येऊन त्या कृत्याचा अंत पाहण्याचा उत्साह त्याच्याठायी वर्षोनवर्ष कायम राहिला तर त्यानें ह्या देशांत इतर कोणाच्याही साहाय्याची अपेक्षां करुं नये, हें उत्तम. कारण साहाय्य होण्यासारखी परिस्थिती नाही.