टीकाप्रतिटीकात्मक लेखांत 'किंकेडच्या ग्रंथावरील लेख' केसरीतील बाजीराव व मद्यपान यासंबंधी वाद, ज्ञानेश्वरीवाद, वगैरे लेख आहेत. राजकारण विषयक लेखांत सुरतेची राष्ट्रीय सभा, गोखल्यांची इंग्लंडांतील कामगिरी, स्वदेशी, वेदोक्त, बडोदें राज्यांतील सुधारणा, ६ संबंधट्वालन मीमांसा ७ महाराष्ट्रांतील गेल्या ७५ वर्षांतील कर्त्यापुरुषांची मोजदार- हे लेख महत्वाचे आहेत; हा शेवटचा निबंध फार महत्वाचा आहे. त्यावरुन आपल्या समाजाची नीट कल्पना येते. याच निबंधांत तात्या टोपे, नानासाहेब बंडवाले यांस पहिल्या दर्जाचे देशभक्त असें राजवाडयांनी गौरविलें आहे. लोकशिक्षण या मासिकांत हा लेख प्रसिध्द झाला होता. 'गोखल्यांची इंग्लंडांतील कामगिरी, हा लेख विश्ववृत्त यांत प्रसिध्द झाला व तोही मला फार आवडला. राष्ट्रीय पुढा-यास सर्व जनतेचा पाठिंबा असल्याशिवाय त्याच्या म्हणण्यास जोर येत नाही. आपल्या देशांतील लोक पुढा-यास फसविणारे व कृतघ्न कसे आहेत, त्यांच्यांत निष्ठा नसून ते लोंचट कसे आहेत वगैरे मुद्देसूत विवेचन राजवाडे यांनी त्यांत केले आहे.
इतर संकीर्ण लेखांत अत्यंत प्रामुख्यानें ज्याचा निर्देश केला पाहिजे असा लेख म्हणजे 'कनिष्ठ, मध्यम व उच्च शाळांतील स्वानुभव' हा त्यांचा आत्मचरित्रपर लेख होय.
राजवाडे यांची मनोरचना कशी तयार झाली, त्यांच्या मनावर व बुध्दिवर कोणत्या गोष्टीचे संस्कार झाले, हें समजण्यास हा लेख फार महत्वाचा आहे. तत्कालीन शाळा, कॉलेजें, अध्यापक वर्ग वगैरेंची पण कल्पना आपणांस येते. या संकीर्ण निबंधांत तत्कालीन म्हणजे गेल्या शतकाच्या शेवटच्या २५।३० वर्षांची थोडीफार स्थिती समजून येते. शिवकालीन समाजरचना हा केसरीमधील निबंध असाच सुरेख आहे. इतिहास व ऐतिहासिक यामधील इतिहास संशोधनाचा आढावा घेणारा त्यांचा लेख- त्यांतील दफ्तरें व संशोधनाचे कार्यांतील कष्ट व हाल यांचें विवेचन वाचण्यासारखें आहे.
भारत इतिहाससंशोधक मंडळाच्या अहवालांतून बारीकसारीक गोष्टीवर लहानमोठें शेंकडों निबंध, टांचणें टिपणें त्यांनी प्रसिध्द केली आहेत. त्यांचे हे लेख ग्रंथमाला, विश्ववृत्त, लोकशिक्षण, सरस्वतीमंदीर, राष्ट्रोदय, इतिहास व ऐतिहासिक, रामदास व रामदासी, विद्यासेवक, चित्रमयजगत्, प्रभात, प्राचीप्रभा, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अहवाल--शिवाय ज्ञानप्रकाश, केसरी, समर्थ वगैरे वृत्तपत्रें यांतून प्रसिध्द झालेले आहेत. ग्रंथमालेंतील त्यांचें कांही लेख 'संकीर्ण लेख' या नांवानें स्वतंत्र खंडांत प्रसिध्द झाले आहेत.
राजवाडयांच्या या अवाढव्य लेखन सामुग्रीचा सामग्रयाने विचार केला म्हणजे मन चकित होतें व एकच पुरुष श्रमसातत्याच्या जोरावर श्रध्दापूर्वक व आस्थेनें कार्य करावयास लागला तर कसे चमत्कार घडवून आणतो हें आपणांस दिसून येते.