काळाचा अजब तडाखा. कोणास सुटला आहे ? मी मी म्हणणारा आशावादी काळानें तेव्हांच गिळंकृत केला जातो. तसेंच शेवटी या महापुरुषाचें झालें. आपण शंभर वर्षे जगूं व शतायुर्वै पुरुष: हें श्रुतिवचन सार्थ करुं अशी राजवाडे यांस बालंबाल खात्री होती. परंतु परमेश्वरी नेमानेम निराळेच होते. कार्य करणारा पुरुष आशेच्या व इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूस दूर ढकलूं पाहात असतो, परंतु वास्तविक कोणासही मृत्यू दूर करतां येत नाही. त्याची वेळ झाली म्हणजे तो यावयाचा.
मरणाचे आधी एक वर्ष दीड वर्ष आपणांस कांहीतरी विकार जडला आहे असें राजवाडे यांस वाटूं लागलें होतें. म्हणून तर पुण्यास राहण्याचें सोडून ते धुळयास आले. त्यावेळी ते जरा खिन्न व चिंताक्रांत दिसले. आपले मित्र धुळयाचे रा. भट यांस ते म्हणाले 'तुम्ही सुग्रास अन्न जेवतां; परंतु आम्हांस असें सुग्रास अन्न कोठे मिळणार ?' कदाचित् याच उद्गारावरुन बंगालचे जदुनाथ सरकार यांनी राजवाडे पुन: लग्न करुं इच्छित होते असें लिहिण्याचें धाडस केलें असेल. सुतानें स्वर्गास जातां येतें म्हणतात तें असें. जन्मभर ज्यानें स्वयंपाक केला त्यानें एखादे वेळीं आपल्या मित्रांजवळ असे उद्गार काढले म्हणजे त्याचें वैराग्य एकदम नष्ट झालें व तो सुखलोलुप बनला असें कोण विचारी मानील. परंतु कर्णोपकर्णी वार्ता ऐकून पराचा कावळा होतो व राईचा मेरु होतो त्यांतलेंच हें.
धुळयास आल्यावरही एकदम भयंकर वेदना मस्तकांत सुरुं झाल्यामुळें ते नाशिक येथें गेले. तेथें डॉक्टरकडून तपासणी झाली व त्यांस बरें वाटूं लागलें व पुन्हां धुळयास ते आपलें आवडतें काम जोरानें सुरु करणार होते; परंतु मरण जवळच येत होतें. हें दुखणें वगैरे शेवटचीच चिन्हें होती.
मरावयाचे वेळेस राजवाडे धुळें येथे आले होते. धुळयावर राजवाडयांचा फार लोभ. रामदासी संशोधनासाठी त्यांनी ज्यांना स्फूर्ति दिली ते समर्थ सेवक शंकरराव देव याच धुळयाचें भूषण. महाराष्ट्र धर्म हे सुंदर उद्बोधक पुस्तक लिहिणारे श्री. भट याच धुळयाचे अलंकार. राजवाडे यांचे महत्व जाणणारे व त्यांस मानणारे येथें बरेंच विद्वान् लोक. राजवाडे यांच्या संग्रहाचा बराच भाग धुळयास आहे. अशा या धुळें शहरीच आपला देह ठेवण्यास न कळत राजवाडे आले. त्यांची प्रकृति चांगली धडधाकट होती. धातुकोशाचें काम ते जोरानें सुरुं करणार होते. रोज पांच सहा मैल फिरावयास जाण्याची त्यांची ताकद होती. परंतु न कळत मृत्यू जवळ जवळ येत होता. १९२६ डिसेंबरची २७ तारीख. त्या दिवशी सोमवार होता. सोमवारी राजवाडे यांची प्रकृति उत्तम होती. शंकरराव देव वगैरे मंडळी त्यांच्याजवळ बोलणे चालणें करुन गेली. मंगळवार उजाडला.सकाळी ११॥ वाजतां ते जेवणास बसले-परंतु जेवण वगैरे राहिलेच. त्यांना उलटी झाली; शौच्यासही लागली म्हणून ते जाऊं लागले; परंतु शक्ति नव्हती. क्षीणता एकाएकी आली व ते चौकांत पडले. नोकर बंगल्यांत झाडीत होता; तो आला. इतक्यांत हस्तलिखितें जी मिळविली होती, त्यांची यादी करण्यास येणारे नित्सुरे मास्तर ते तेथें आले. त्यांनी राजवाडे यांस उचलून आणलें व अंथरुणावर निजविलें. त्यांची नाडी मंद चालूं लागली होती; नाडीत क्षीणता आली होती. लसूण वगैरे अंगास चोळण्यांत आल्यावर ते शुध्दीवर आले व त्यांनी विचारलें 'काय चोळता ? डॉक्टरांस बोलविण्यास त्यांनी सांगितलें. डॉक्टर आले व औषध वगैरे देण्यात आलें.