चिपळूण येथील एका गृहस्थानें मुद्दाम चार आणे या कार्यास पाठविले होते. परंतु पत्रें ज्या मानानें मिळत गेली त्या मानाने प्रकाशन झाले नाही. मराठयाच्या इतिहासांची साधने या नांवाने त्यांनी २२ खंड प्रसिध्द केले. तरीसुध्दा ५० हजार पत्रे त्यांच्या जवळ राहिलीच हे सर्व काम राजे महाराजे, सरदार दरकदार यांच्या मदतीशिवाय कसें व्हावें ? राजवाडे संतापून आपल्या प्रस्तावनेंत एक ठिकाणी लिहितात 'साधनें प्रकाशण्यासंबंधाने एक चमत्कार आज कित्येक वर्षे मी निमूटपणें पाहा आहे; तो असा की, शिंदे, होळकर, गायकवाड, आंग्रे, पटवर्धन, विंचूरकर, पवार, राजेबहाद्दर, कोल्हापूरकर, तंजावरकर, फडणीस, प्रतिनिधी, फलटणकर, भोरकर, जतकर, हैद्राबादकर, जयपूरकर, जोधपूरकर, सागरकर व इतर लहान मोठे संस्थानिक, जहागिरदार, इनामदार, देवस्थानवाले, व पूर्वीचे मुत्सद्दी हे अद्यापपर्यंत काय करीत आहेत ? त्यांची दप्तरें किंवा त्याच्या संबंधाचे कागदपत्र आमच्या सारख्या भिकरडयांनी शोधण्याचा व छापण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्यासारख्या श्रीमंतांनी अगदीच उदासीन व निद्रिस्थ असावें, हा कोठला न्याय ? काय, त्यांचे पूर्वज त्यांचे कोणी नव्हत ? पूर्वजांनी संपादिलेल्या जहागिरी व राज्यें भोगण्यास राजी आणि त्यांचे पराक्रम व इतिहास जाणण्यास गैरराजी, हा न्याय पृथ्वीवर इतर कोठेही पहावयास मिळावयाचा नाही. वासुदेव शास्त्री ख-यांनी आपलें घरदार विकून पटवर्धनी दप्तर छापावें आणि मिरजकर, सांगलीकर, जमखिंडीकर ह्यांनी खुशाल झोपा काढल्या. शिवाजी महाराज, दमाजी गायकवाड, परशुराम भाऊ पटवर्धन हे आम्हां संशोधकांचे आजे पणजे आहेत आणि संस्थानिकाचे कोणी नाहीत, असेंच म्हणावयाची पाळी आली. संस्थानिकांची व इनामदारांची आपल्या प्रत्यक्ष पूर्वजांसंबंधानें केवढी ही विस्मृती ! केवढा हा अपराध ! ही भरतभूमि पितृपूजेविषयी प्रख्यांत आहे. तींत प्रस्तुत काळी पितरांची अशी बोळवण व्हावीना ? असे. राजा निजले अहेत, जहागिरदार डुलक्या घेत आहेत, आणि इनामदार झोंपा कढीत आहेत. ते जागे होईपर्यंत, जागे झालेले मध्यम स्थितीतील जे आप,ण त्यांनी राष्ट्रांच्या या पुतरांचे स्मरण कायम ठेविले पाहिजे. आपले सामर्थ्य अद्यापि जुजबी आहे, तथापि ह्या पुण्य कर्माप्रीत्यर्थ ते खचिले पाहिजे.’
राजवाडे यांचे पत्रें वगैरे प्रसिध्द करण्याचें काम कै. विजापूरकर यांची ग्रंथमाला करीत होती त्याच्या मार्मिक व मुद्देसूद प्रस्तावना याच ग्रंथमालेंतून प्रसिध्द झाल्या व त्यांच्यावर वाचकांच्या उडया पडत. विजापूरकर व राजवाडे दोघे एकमेकांस साहाय्य करते झाले. विजापूरकरांस राजवाडयांचे कर्तृत्व कळलें होतें व त्यांच्या स्वभावाशी ते नीट जमवून घेत. परंतु पुढें विजापूरकर कैदेंत गेले. त्यांची मासिके बुडाली; सरस्वतिमंदिर हें द्रव्याभावी बंद पडलें. पारसनीस यांचें इतिहास संग्रह चाललें होतें; परंतु राजवाडे व पारसनीस यांचे फारसें सख्य नसे. तेव्हां आपली टांचणें, टिपणें प्रसिध्द करण्यास एखादें मंडळ काढावें असें ठरलें. संघटित प्रयत्न व्हावे असें त्याच्या मनानें घेतलें. शके १८२७ मध्यें सहाव्या खंडाच्या प्रस्तावनेंत आरंभी ही इतिहास संशोधक मंडळाची आवश्यकता प्रथम त्यांनी पुढें मांडली. नंतर राष्ट्रोदयांत त्यांनी पुनरपि ही कल्पना जाहीर केली