गेल्या दोन तीन वर्षांत महाराष्ट्रांतील नामांकित इतिहाससेवक सर्व जात चालले. वासुदेवशास्त्री खरे, पारसनीस, महाराष्ट्र सारस्वतकार भावे, राजवाडे व साने सर्व दिवंगत झाले. न्या.रानडे यांनी मराठी इतिहासांचें आध्यात्मिक स्वरूप दाखवून दिलें व महाराष्ट्रीय इतिहासाचा मोठेपणा प्रतिष्ठापिला. त्यांच्यानंतर या पंच पांडवांनी महाराष्ट्रीय इतिहासाची बहुमोल कामगिरी केली व या सर्वांच्या कामगिरीमध्यें राजवाडे यांची कामगिरी शिरोधार्य आहे. या पांचही जणांत अर्जुनाप्रमाणें पराक्रम राजवाडयांनीच गाजविला; वासुदेव शास्त्री खरे यांचें कार्यक्षेत्र मर्यादित होतें म्हणून त्यांची कामगिरी व्यवस्थित आहे व खुलून दिसते; भावे व पारसनीस यांस द्रव्याची ददात नव्हती व थोरांमोठयांशी त्यांच्या दोस्ती होत्या. साने यांचें कार्यहि मर्यादितच स्वरूपाचें होतें, परंतु ठाकठिकीचें होतें. राजवाडे यांचेंच कार्य अफाट होतें. शतमुखी गंगेप्रमाणें त्यांची कामगिरी शतमुख होती. आणि हें सर्व राजेरजवाडे, सरकार व जनता यांची हांजी हांजी न करतां, त्यांचा आश्रय नसतां, स्वत:च्या हिमायतीनें केलें, म्हणून हें कार्य थोर आहे.

परंतु मोठया दु:खाची गोष्ट ही की राजवाडे ह्यात असतां या पुण्यभूमींत, आनंदवनभूवनी त्यांची ती धिप्पाड व तेजस्वी मूर्ति भ्रमण करीत असतां, तिचें महत्व लोकांस समजलें नाहीं. त्यांची महती, त्यांची महती फारच थोडयांस आकलन करितां आली. परंतु त्यांच्या मरणानंतर एकदम केवढा खळगा पडला हें दिसून आल्यामुळें महाराष्ट्र जनता दु:खांत बुडाली. स्विफ्टच्या मरणांनंतर एकानें म्हटलें 'Oh what a fall it was, it was like the fall of the Roman Empire'- त्याप्रमाणेंच राजवाडयांच्या मरणासंबंधें महाराष्ट्रास वाटलें. त्यांच्या मरणानें सर्वांसच धक्का बसला. पुष्कळ वेळां असेंच होतें. मनुष्याचा अंगचा मोठेपणा व त्याची थोरवी त्याच्या मरणानंतरच समजून येते. फूल कुसकरल्यावरच त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो, जिवंत असतां राजवाडे यांचें महत्व कळलें नाही-परंतु मेल्यावर त्यांचें महत्व, त्यांचें मोल सर्वांस कळून आलें. आता तरी महाराष्ट्रानें या पुण्यपुरुषास, या लोकोत्तर ईश्वरी देण्याच्या पुरुषास आपल्या हृदयकमलांतून दूर करूं नये. त्यांची संपूज्य स्मृति सदैव प्रज्वलित ठेवून त्यांच्याप्रमाणें नि:स्वार्थतेनें, कार्यनिष्ठेनें कार्य करण्यास पुढें यावें. निरनिराळया शास्त्रांत पारंगतता मिळवून पाश्चात्यांचा वरचढपणा दूर करावा व भारतवर्ष ज्ञानाचें पुनरपि माहेरघर करावें म्हणजेच राजवाडे यांच्या तळमळणा-या आत्म्यास शांति मिळेल, एरव्ही नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel