मंगळवारचा दिवस गेला व अमंगळ टळलें. बुधवारी एनेमा त्यांस देण्यांत आला. झोंपही चांगली स्वस्थ लागली. यामुळें गुरुवारी त्यांस जास्त हुशारी व तरतरी वाटली. परंतु ही हुशारी मालवणा-या दिव्याच्या वाढत्या ज्योतीप्रमाणें आहे,  तुटणा-या ता-याच्या वृध्दिंगत तेजाप्रमाणें आहे हें आशातंतूवर जगणा-या मनास समजलें नाही. आपण हा लोक सोडून जाणार ही राजवाडे यांस कल्पनाही नव्हती. इतर कोणासही राजवाडे लौकरच आपणांस अंतरणार असें वाटलें नाही. शुक्रवार उजाडला. सकाळी शौच्यास झालें. दोनदां दूध त्यांनी मागून घेतलें. परंतु वेळ आली ८॥ वाजतां कळ आली तीच शेवटची. कळ आल्यावर ते खोलीतून कचेरीत येऊं लागले तों पडले. पुनरपि डाक्टरांस बोलावणें गेलें- परंतु डॉक्टर येण्यापूर्वीच सर्व आटोपलें. श्री.शंकरराव देव यांचा पुतण्या दाजीबा यानें मरतांना मांडी दिली व त्या मांडीवर या देशार्थ तळमळणा-या जीवानें १९२६ डिसेंबरच्या ३१ तारखेस शांतपणे प्राण सोडला. आशेचा मेरु उन्मळला. कर्तव्यनिष्ठेचा सागर आटला. उत्साहाचा सूर्य अस्तंगत झाला. महाराष्ट्र सरस्वती अनाथ झाली; महाराष्ट्र इतिहास पोरका झाला.

राजवाडे हे महापुरुष होते. विद्यारण्यांसारखे ते विद्येचे निस्सीम उपासक होते. परंतु त्यांचें सर्वांत मोठें कार्य म्हणजे महाराष्ट्रास ज्ञानप्रांतांत पुढे घुसण्यास त्यांनी जागृति दिली. स्वदेशाचा इतिहास सांगून स्वदेशाची दिव्य व स्तव्य स्मृति प्रचलित केली. प्रख्यात महाराष्ट्रीय इतिहासकार सरदेसाई आपल्या पाटणा युनिव्हर्सिटीतर्फे दिलेल्या व्याख्यानांत राजवाडे यांचेसंबंधें जें गौरवानें बोलले त्याचा मी अनुवाद करितों. 'जनतेच्या मनांत ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनासंबंधीची तीव्र जागृति उत्पन्न करण्याचें काम राजवाडे यांनी केलें. ही जागृति उत्पन्न करण्याचें सर्व श्रेय ह्या महापुरुषाला आहे. त्यांच्याजवळ साधन सामुग्रीहि नव्हती. संपत्तीचा त्यांना पाठिंबा नव्हता. परंतु कॉलेजामधून बाहेर पडल्यावर या कार्योन्मुख पुरुषानें घरोघर भटकून, दारोदार हिंडून कागदपत्र संग्रह करण्याचें काम चालविलें. पुणें, सातारा, नाशिक वांई या मोठया शहरीच नव्हे तर लहानसान खेडयापाडयांपासूनही जुने सरदार, जुने उपाध्ये, जुने कारकून, जुने कुळकर्णी, देशपांडे यांच्या घरी ते खेटे घालीत. कागदपत्रें जमा केल्यावर नितांत निष्ठेनें व एकाग्रतेनें त्या पत्रांची ते चिकित्सा करीत. असें करीत असतां त्यांची तहानभूकही हरपून जावयाची. अल्प साधनसामुग्रीच्या जोरावर सर्व बृहन्महाराष्ट्रभर ते वणवण हिंडले व उरापोटावरुन, खांद्याडोक्यावरुन कागदपत्रांची पोती त्यांनी वाहून आणिली. हा अफाट साधनसंग्रह महाराष्ट्रांत ठिकठिकाणी आपल्या मित्रांकडे ठेविला आहे. राजवाडे यांची निरपेक्ष कार्यभक्ति पाहून इतरही तरुणांस स्फूर्ति मिळाली व या खंद्या वीराच्या सभोंवती संशोधनाच्या समरांगणांत कार्य करण्यासाठी तरुणांची मांदी मिळाली. राजवाडे हे संन्यस्तवृत्तीचे, त्यागाचे उत्कृष्ट आदर्श आहेत. मनुष्य एका कार्यास जीवेंभावें करुन जर वाहून घेईल, तर तो किती आश्चर्यकारक कार्य करुं शकतो हें राजवाडे यांनी स्वत:च्या उदाहरणानें दाखविलें आहे. अडचणी व संकटे, दारिद्रय व सहानुभूतीचा अभाव वगैरे निरुत्साहकारी गोष्टींचें धुकें कार्यनिष्ठेच्या प्रज्वलित सूर्यप्रभेसमोर टिकत नाही.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel