विज्ञानामागील सायन्स... विज्ञान, सायन्स एकच तर आहे, मग पुस्तकाचे शीर्षक असे का?

तर एकदा मित्रमैत्रिणींच्या गप्पांची मैफल रंगली होती, एक मैत्रीण गंमतीने तिच्या नवऱ्याला म्हणाली, "पुढच्या वर्षी मी तुमच्यासाठी वटपौर्णिमेच्या उपासच करणार नाही. मग बसा बोंबलत." तो म्हणाला, "नको करुस, माझं काय जातंय, तो उपास आमच्यासाठी कुठे? तुमच्यासाठी असतो."

ती म्हणाली, "ते कसं?" मग त्याने एका व्हाट्सअँप मेसेजबद्दल सांगितलं. जुन्या काळातील स्त्रियांचे राहणीमान, मग वडाचे झाड, त्याच्यापासून मिळणारं ऑक्सिजन, बरंच काही त्याने सांगितलं.

आधुनिक जीवनशैली जगत असलेल्यांना वटपौर्णिमेच्या उपसामागचे कारण कळताच बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या. तेव्हा एक जण म्हणाला, "काय लॉजिक वापरतात ना लोक?"

मी म्हणालो, "असं काही नसतं, त्यामागे विज्ञान असतं."

दुसरा मित्र म्हणाला, "हो रे भाई, पण विज्ञानामागे पण काहीतरी सायन्स असेल ना?"

त्याचे ते विधान ऐकून आम्ही सगळे हसू लागलो, प्रसंग हलकाफुलका होता, काही दिवसांनी हा किस्सा इतर मित्रांना सांगत असताना त्या वाक्यात एक वेगळीच गंमत वाटू लागली, जसं मुलांचं जेन्टस सलून, पाण्याचा वॉटर सप्लाय, थंड कोल्ड ड्रिंक, तसंच काहीसं होतं विज्ञानामागील सायन्स.

हे वाक्य म्हणजे माझ्यासाठी एक मानसिकता आहे. ज्यात समोरची व्यक्ती, म्हणजे ती आपल्या ओळखीची कोणीही असू शकते, ती व्यक्ती अंधश्रद्धा, चमत्कार, जादू अशा गोष्टी बाजूला ठेवून हे मान्य करते की ज्या गोष्टी घडतात, त्यामागे विज्ञान आहे, पण ते विज्ञान त्यांना माहित नसतं. त्यामागचं त्यांना माहित नसलेलं कारण हे त्यांच्यासाठी सायन्स असतं.

मग निरीक्षण करू लागलो, बरेच जण असे शब्द वापरताना दिसू लागले. जिथे शक्य असायचे, तिथे त्यांना ते (त्यांच्या शब्दांत) सायन्स सांगता येत होते, पण प्रत्येक वेळी असे घडायचेच असे नाही, काही प्रश्न असे असायचे की, तेव्हा असे विषय घेऊन पुस्तकांची मालिका सुरु करण्याचा विचार मनात आला, ज्याचे नाव असेल, विज्ञानामागील सायन्स.

मनोगत वाचत असताना सुरुवातीला आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल, की पुस्तकाची सुरुवात प्रश्नोत्तराने का? (इथे दुसरा प्रश्न आला) तर पुस्तकाचे मनोगतच नाही, तर संपूर्ण पुस्तक हे प्रश्नोत्तर स्वरूपाचे आहे. ज्यात आपले मन आपल्याला विचारते, यामागे काहीतरी आहे ते नक्की, पण मग नक्की ते आहे तरी काय? इथे प्रश्नांची निवड मोजक्याच शब्दांत केली आहे, जेणेकरून प्रश्न रटाळ वाटणार नाहीत, आणि अंधश्रद्धेवरील प्रश्नाचे निराकरण अनेक समाजसुधारकांनी आणि साहित्यिकांनी केले आहेच, तर मग या पुस्तकात वेगळे काय वाचायला मिळेल? (पुन्हा प्रश्न?)

तर या पुस्तकात जपानमधील 10 हजार वर्षापुर्वी समुद्रात बुडलेले योगागूनीच्या विशाल शहराबद्दल, न्युझीलँड येथील वेटोमो गुहेच्या चमकण्याचे रहस्य, कोलंबिया येथील कैनो क्रिस्टल्स या रंग बदलणाऱ्या नदीचे रहस्य, चंद्र आणि सूर्याभोवती रिंगण का पडते? आजूबाजूला वाळवंट असून देखील नाईल नदी आटली कशी नाही? ज्वालामुखी त्सुनामी म्हणजे काय? तुर्की येथील हजारो वर्षांपासूनचे गरम पाण्याचे झरे, समुद्राच्या लाटा नेहमीच किनाऱ्याकडे का येतात? वेगवेगळ्या ग्रहांवर वस्तूंचे वजन भिन्न का असते? घड्याळात क्वार्ट्झ (Quartz) का लिहिलेले असते? मनुष्य प्राणी अंतराळात जास्तीत जास्त किती दिवस राहू शकतो? सॅटेलाईटच्या प्रक्षेपणाच्या वेळी त्याच्याभोवती सोनेरी कागद का लावतात? सूर्याची उत्पत्ती कशी झाली? अशा प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. काही प्रश्न रहस्यांमागील विज्ञान (सायन्स) सांगतात, तर काही उत्तरे आपले ज्ञान वाढवतात. पुस्तकामध्ये मी मराठी क्वोरावर लिहिल्येला उत्तरांचा देखील समावेश केला आहे, ज्यांपैकी अनेक उत्तरांची सर्वोत्कृष्ट उत्तरे म्हणून निवड झाली आहे.

मराठी क्वोरा, अर्थ मराठी ज्ञानभांडारच्या माध्यमातून वाचकांसाठी याआधी देखील (वि)ज्ञान वाढवणारी माहिती उपलब्ध करून दिली आहे, आणि ते ज्ञान पुस्तकस्वरूपी प्रकाशित करताना वाचकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आणि हो, विज्ञानामागील सायन्स जेव्हा वाचकाला आवडेल, तेव्हाच तर तो सायन्स-फिक्शन आवडीने वाचेल.

धन्यवाद!
लोभ असावा,

आपलाच,
अभिषेक ज्ञानेश्वर ठमके


पुस्तक वाचून झाल्यावर आपल्या प्रतिक्रिया abhishek.thamke@gmail.com वर अवश्य कळवा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel