विज्ञानामागील सायन्स

पनामा कालवा - आधुनिक जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य

Author:अभिषेक ठमके

ह्या कालव्याने जग बदलले. अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडणारा अभियांत्रिकी शास्त्राचा उत्कृष्ट नमूना म्हणजे पनामा कालवा. विचार करा, समुद्र आणि महासागर म्हटलं तर भरती-ओहोटी आलीच. दोन टोकांवर असलेल्या या महासागरांच्या भरती-ओहोटीनुसार पाण्याची पातळी राखून ठेवणे. मोठमोठाले जहाज रहदारीशिवाय आणि विनाअडथळा मार्गिकेतून जायला हवे. पहिल्या टोकापासून ते शेवटच्या टोकापर्यंत या कालव्यामुळे कोणतीही समस्या निर्माण होऊ नये. स्वच्छतेवर नियंत्रण मिळवणे आणि या सुविधेमध्ये कमतरता येऊ नये म्हणून मार्गिकेची सतत तपासणी करणे, सॅटेलाईटद्वारे पाहणी करणे अशा बऱ्याच बाजू आहेत, ज्यांच्यामुळे हा प्रकल्प आज उभा आहे, आणि आपले सातत्य टिकवून आहे.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-34caf02facc3d92db5d9e26ea4ebc807

दोन गोष्टी लक्षात घ्या,

पहिली म्हणजे, या कालव्याचा प्रकल्प अप्रत्यक्षपणे 500 वर्षांपासून चालू होता.

दुसरी गोष्ट मी तुमच्यावर सोडतो, समजा मुंबई येथील वरळीपासून ते दादर पूर्व एवढाच कालवा काढायचा आहे. मोठे जहाज जाऊ शकेल इतका खोल खड्डा खोदणे. आणि तीच खोली वरळीपासून ते दादर पूर्व पर्यंत सातत्याने असायला हवी. किती दिवस लागेल, विचार करा. एवढं कशाला? तुमच्या घराच्या खिडकीबाहेर बघा. तुमच्या डोळ्यांना शेवटपर्यंत दिसेल, एवढा भाग जरी खोदायचं म्हटलं. तर समोर काय चित्र असेल, याची फक्त कल्पना करून बघा. कारण तशी कल्पना या पनामा प्रकल्पावर काम करणाऱ्या प्रत्येकाने प्रत्यक्षात साकार करून दाखवली आहे. आणि म्हणूनच जगातील सात नव्या आश्चर्यांच्या यादीमध्ये या प्रकल्पाचा समावेश नाही झाला तर नवलच. maphill ने दाखवलेला नकाशा पाहिल्यावर या कालव्याचा उपयोग करून आपण किती वेळ आणि इंधन वाचवतो, याचा अंदाज लावू शकता.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-99304fe6354a6343850b40e481a66b51

या प्रकल्पाचा इतिहास देखील मोठा आहे. हा कालवा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे. जो आधी सांगितल्याप्रमाणे अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला पॅसिफिक महासागरासोबत जोडतो.

पनामा कालवा बांधण्यापूर्वी पॅसिफिक महासागरामधून अटलांटिक महासागरात पोहोचण्यासाठी बोटींना दक्षिण अमेरिका खंडाला वळसा घालून धोकादायक मेजेलनच्या सामुद्रधुनीमधून प्रवास करावा लागत असे. मध्य युगापासूनच हा प्रवास टाळण्यासाठी मानवनिर्मित कालव्याची कल्पना मांडली जात होती. पनामाचे मोक्याचे स्थान व अरूंद भूमीचा पट्टा पाहता येथेच हा कालवा काढणे सहजपणे शक्य होते. रोमन साम्राज्याचा राजा पहिला कार्लोस याने 1534 साली ह्या कालव्यासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. 1855 साली अमेरिकेने पनामा कालव्याचा प्रस्ताव मांडला. ह्याच काळात सुवेझ कालव्याचे निर्माण करण्यात फ्रेंचांना यश मिळाल्यामुळे पनामा कालव्याचे ऐतिहासिक कामदेखील त्यांनाच देण्यात आले.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-d39c53c6e1ae912b96683971472c933a

सध्या जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक असलेल्या या कालव्याचे बांधकाम फ्रेंचांनी 1880 मध्ये सुरू केले होते. दुर्दैवाने कालव्याच्या बांधकामावर काम करणारे अनेक फ्रेंच आणि पनामायनियन लोक पिवळ्या रंगाचा ताप आणि मलेरियासारख्या आजारांनी मरण पावले. सुमारे 28 कोटी अमेरिकन डॉलर खर्च केल्यानंतर हा उपक्रम दिवाळखोरीत निघाला व 1890 साली या कालव्याचे काम थांबले. यामुळे बांधकामात महत्त्वपूर्ण विलंब झाला.

पुढील 13 वर्षे अमेरिकेने अनेक पाहण्या व अभ्यास केले. अखेर 1904 साली राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्टच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने ह्या कालव्याचे हक्क विकत घेतले व बांधकाम पुन्हा सुरू झाले. अनेक अडचणींचा सामना करीत अमेरिकन अभियंत्यांनी 1914 साली कालव्यामधून जाहजांची वाहतूक सुरु झाली. पहिल्याच वर्षी 1000 जहाजांनी या कालव्यामधून प्रवास केला आणि आता दरवर्षी जवळपास 14,000 लहान-मोठे जहाजं या कालव्याचा वापर करतात. ज्यामुळे त्यांचा 7,900 मैलांचे अंतर वाचते.

ह्या कालव्याच्या बांधणीसाठी अनेक नैसर्गिक व कृत्रिम तलावांचा वापर करण्यात आला. हे तलाव समुद्रसपाटीपासून सुमारे 26 मी उंच असल्यामुळे पनामा कालव्यामध्ये दोन्ही बाजूंना बंदिस्त बांध (लॉक्स) बांधले आहेत. ह्या बांधांमध्ये अनुक्रमे पाणी सोडत आत शिरणाऱ्या जहाजांना वर चढवले जाते. कालव्यामधून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठी उलटी क्रिया करून खाली उतरवले जाते. सध्याच्या घडीला ह्या बांधांची रूंदी 110 फूट आहे. पनामा कालव्याची एकूण लांबी 77.1 किमी (48 मैल) आहे. ह्या कालव्यामुळे संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, संयुक्त संस्थाने ते जपान हे अंतर कमी झाले आहे.

आणि म्हणूनच अमेरिकन स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेने ह्या कालव्याचा जगातील सात नव्या आश्चर्यांच्या यादीमध्ये समावेश केला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to विज्ञानामागील सायन्स


नाईट वॉक : लघुकथा संग्रह
टेरर ऍटॅक ऍट डोंबिवली स्टेशन
मैत्र जीवांचे