‘नव्हतो का एके काळी आणीत? परंतु तू ती कुस्करून टाकीत असस. पायांखाली चिरडून टाकीत असस. मग आणणे मी बंद केले.’
‘मी तुझे सत्त्व पाहात होते खंड्या. देवी एकदम नाही प्रसन्न होत. जा त्या पाखराकडे. ते रडत आहे, तू रड. जा नीघ.’
खंडू खरेच पिंज-याजवळ आला. त्या पाखराकडे दु:खाने पाहात राहिला. बराच वेळ विचार करून खंडू त्या पाखराला म्हणाला, ‘पाखरा, तुला मी आज सोडूनच देईन हो, तुला मी आणले हीच चूक. पाखरांची झाडावरच शोभा. झाडांवरचीच त्यांची गाणी ऐकावी. मन रिझवून घ्यावे. उगीचच तुला आणले व कोंडले. आज तिने जीभ कापली, उद्या तुझा गळाही ती कापील. ती राक्षसीण आहे. अगदी राक्षसीण. पाखरा, जा हो. सोड मला. मी अभागीच आहे. मला एकट्यानेच राहिले पाहिजे. फार तर सृष्टीची दुरून मिळेल ती संगत घ्यावी. फुलांची, पाखरांची, झाडामाडांची, डोंगरटेकड्यांची, नद्यानाल्यांची, गाईगुरांची दुरून संगत. मेघांची, ता-यांची, थंडापावसाची, ऊनवा-याची हीच संगत. खरे ना? होय. ही सृष्टीतील गंमत मी घेत जाईन. तुला सोडतो हो आज; परंतु तुझे जातभाई तुला मारणार नाहीत ना? तू दास्यात जिवंत राहिलास म्हणून तुला चोची नाही ना मारणार? नाही मारणार. कारण तू उपकारासाठी कैदी झालास. एका दु:खी माणसाला आनंद देण्यासाठी तू आपखुषीने आलास. तुझे भाईबंद तुझ्यावर रागावणार नाहीत. तुझे स्वागत करतील. तुझा मुलेबाळे, तुझी बायको तुझ्यावर अधिकच माया करतील. जा पुन्हा प्रेमळ घरट्यात, डोल फांद्यांवर, पोह आकाशात, खा रानचे मेवे. जा हो पाखरा. आज मी मुक्त करीन हो तुला.’
असे तो बोलत होता, तो आतून घसरा आला. ‘या गिळायला. भाकर झाली आहे.’ खंडू गेला. त्याच्याने आज खाववले नाही. पाखराला आज खाता येत नव्हते. पाखराची जीभ दुखत होती. खंडूला खाणे का गोड लागेल? दोन तुकडे खाऊन तो उठला. पाणी प्यायला. हातात पिंजरा घेऊन तो शेतात गेला. त्या गर्द छायेच्या झाडाखाली बसला. त्याने पिंज-यातून ते पाखरू बाहेर काढले. त्याने ते प्रेमाने हृदयाशी धरले. अश्रूंनी त्याला त्याने न्हाऊ घातले. पाखराने चोच वर केली. दोन अश्रू ते प्यायले; परंतु ते पाणीही त्याच्या जिभेला झोंबले.