रुस्तुम विरघळला. तो धिप्पाड पुरुष निघाला. रानावनात राहिल्यामुळे त्याचा चेहरा राकट व उग्र दिसत होता. जासुदाबरोबर तो निघाला. राजाचे दूत वाटच पाहात होते. त्यांनी वार्ता आणिली की रुस्तुम येत आहे. राजा सामोरा गेला. रुस्तुमला त्याने आदराने आणले.
‘रुस्तुम, देशाचे नाव राखा. वृद्धावस्थेत तुमच्यावर ही जबाबदारी टाकायला आम्हाला संकोच वाटतो, पण उपाय नाही.’ राजा म्हणाला.
‘मला मुलगा असता तर इराणचे नाव राखता. शत्रूकडील तरुणाशी लढायला इराणमध्ये तरुण असू नयेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे.’
‘परंतु आपण उलट असे दाखवू या की, इराणमधील वृद्धही शत्रूकडील ताज्या दमाच्या तरुणास लोळवतात. रुस्तुम, ही चर्चेची वेळ नाही. शत्रूला कळवू ना की आमची तयारी आहे म्हणून?’
‘परंतु माझी एक अट आहे. माझे नाव कळवू नका. मी पडलो तर माझ्या नावाची अपकीर्ती नको! मी वृद्ध आहे. रुस्तुमच्या नावाला अपयशाचा डाग नाही लागता कामाचा. आमच्याकडचा कोणी एक अनामिक वीर युद्धास येईल असे कळवा.’
‘ठीक.’
शत्रूकडे त्याप्रमाणे कळविण्यात आले आणि सामन्याची तारीख ठरली. दोन्ही बाजूंची सैन्ये तो अद्वितीय समरप्रसंग पाहायला उभी राहिली. असे द्वंद्व पुन्हा कधी पाहायला मिळणार?
सोराब उठला त्याने आपल्या घोड्याला थोपटले. घोड्यावर त्याचे फार प्रेम होते. घोड्याचे नाव ‘रुक्ष’ असे होते.
‘रुक्ष, आज मी विजयी होऊन येईन का? विजयी होऊन आलो तर तुला पुन्हा भेटेन. पडलो तर शेवटची भेट. रुक्ष तुला मी बाबांना शोधण्यासाठी फार श्रमवले, खरे ना? क्षमा कर. पित्याला भेटायच्या उत्कंठतेमुळे तसे हातून घडले असेल. रुक्ष, जर मी विजयी होऊन आलो तर पुन्हा निघू बाबांना शोधायला. हो. कारण या विजयाचा मला काय आनंद? मला एकाच गोष्टीचा आनंद आहे. एकच गोष्ट मला हवी आहे. माझे बाबा. मला धन नको, कीर्ती नको, मानसन्मान नको, राज्य नको. माझे बाबा मला हवे आहेत. खरे ना रुक्ष? तू माझे हृदय जाणतोस, माझ्या भावना ओळखतोस. मी जिवंत परत आलो तर तू आपल्या पाठीवरून पुन्हा मला वायुवेगाने सर्वत्र ने. जातो हं.’