‘अरे माणसांनो, देवाचे तुम्हाला लाडके व्हायचे आहे का? तर कोणाला उघडे पाडू नका. सर्वांच्या अंगावर कपडा आहे की नाही ते पाहा. कोणा कोणा श्रीमंतांकडे खंडीभर कपडे असतात; परंतु गरिबांच्या अंगावर लक्तरे असतात. त्यांची मुलेबाळे थंडीत गारठतात. असे नाही असता कामा. माणसांनो, असे नाही असता कामा. सर्वांनी आनंदाने राहावे. सर्वांनी सुखाने राहावे, एकमेकांस सांभाळावे.’
अशा अर्थाची गाणी म्हणत तो जात होता. वाटेत झाडाखाली तो स्वयंपाक करी. आनंदाने खाई. बैलांना पाणी पाजी, चारा घाली, विसावा देई, असे करीत त्या दगडाळ माळरानाजवळ गाडी आली. गाडी पुढे चालेना. थांबली गाडी. जयंत खाली उतरला व त्या दगडांच्या भेटीस निघाला.
परंतु ते दगड उघडेबोडके होते. ती वस्त्रे कोठे गेली? कोणी पळवली, लांबवली? ते दगड पुन्हा आपले दु:खी जणू.
‘का रे दगडांनो, मी तुम्हाला कपडे देऊन गेलो होते. कोठे आहेत ती वस्त्रे? कोणा दुष्टाने नेली?’
‘जयंता, उघडेबोडके शेतकरी आले. त्यांच्या अंगावर चिंध्या होत्या. त्यांच्या बायकांची अब्रू रक्षण होईल इतकेही वस्त्र त्यांच्या अंगावर नव्हते. पोरेही उघडी. जयंता, हे शेतकरी दरवर्षी दाणे पिकवतात; परंतु सावकार नेतात सारे. पुन्हा आपले उपाशी. पुन्हा पडतात उघडे. त्या शेतक-यांना पाहून आम्हाला वाईट वाटले. आम्ही त्यांना म्हटले, ‘अरे शेतक-यांनो, इकडे या. हे घ्या कपडे. घाला अंगावर!’ परंतु शेतकरी घेत ना. ते म्हणाले, ‘असतील कोणाचे. कसे घ्यावे? आम्ही मरू, परंतु दुस-यांच्या वस्तूस हात लावणार नाही!’ जयंता, किती सत्यवादी हे शेतकरी; परंतु त्यांना मोठे सत्य अद्याप समजले नाही. खरोखर सारे त्यांचेच आहे. श्रमातूनच सारे पिकते, निर्माण होते. आधी त्यांचा हक्क आहे सर्व अन्नवस्त्रावर; परंतु त्यांना कोण हे शिकवणार? केव्हा त्यांना कळणार? कळेल एके दिवशी. कळेल वेळ येईल तेव्हा. त्या शेतक-यांना आम्ही सांगितले, ‘अरे हे कपडे खरोखरच आमचे आहेत. एक उदार मुलगा आला होता. त्याने आम्हाला उघडे पाहून पांघरूण घातले. त्याला आमची दया आली; परंतु शेतकरी बंधूंनो, तुमची दया कोणीच करीत नाही. थंडी, वारा, ऊन, पाऊस यांची आम्हाला लाखो वर्षांची सवय आहे. आम्ही उघडे राहू शकतो. घ्या हो. हे कपडे तुम्ही घ्या. त्या मुलाने आम्हाला दिले. आम्ही तुम्हाला देतो. त्या शेतक-यांना ते कपडे घेतले. आम्ही दगड, परंतु आम्हीही आनंदाने हसलो. आम्ही दगड, परंतु आमच्या डोळ्यांतूनही श्रममूर्ती शेतकरी शृंगारलेला पाहून आनंदाश्रू आले. आम्ही दगड, परंतु त्या शेतक-यांचा आनंद पाहून आमच्या ओबड-धोबड काळ्यासावळ्या अंगावर रोमांच उभे राहिले. जयंता ते शेतकरी गेले.’