‘मी पुढच्या आठवड्यात आणखी घेऊन येईन हो. आज होते ते दिले. रागावू नका. जयंतावर प्रसन्न व्हा.’ असे म्हणून प्रणाम करून जयंत परतला.
रानावनांची शोभा बघत, नदीनाल्यांचे पाणी पित तो घरी आला. सुंदर सुंदर पक्षी, चपळ चपळ हरणे वगैरे बघत तो घरी आला. त्याला आनंद झाला. हसतमुख असा घरी आला.
‘जयंता, आलास? लागले वगैरे नाही ना? कोणी मारलेबिरले नाही ना? चोर नाही ना भेटले? वाघबीघ नाही ना भेटला?’ आईने विचारले.
‘आई, तुझ्या आशीर्वादाने सुखरूप परत आलो. वाघबीघ भेटला नाही, चोरांनी लुटले नाही. मी पुन्हा जाणार आहे. मला मजा वाटते. खरेच आई.’ जयंत म्हणाला.
बाप घरी आला. त्याला जयंत आल्याचे कळले. त्याने त्याला दिवानखान्यात बोलावले. जयंत नम्रपणे येऊन बसला.
‘जयंता, विकलास का माल? पसंत पडला का लोकांना?’
‘हो बाबा. सारा माल खपला. पसंत पडला. मी पुन्हा घेऊन जाईन. जास्त घेऊन जाईन. एका गाडीतच घालून नेला तर?’
‘परंतु पैसे कोठे आहेत?’
‘ते पुढच्या आठवड्यात देणार आहेत.’
‘असा उधार देऊ नये माल. पैसे घेऊन ये. जा गाडी घेऊन. म्हणजे बराच माल राहील. मात्र वाटेत जप. बैलांना पळवू नकोस. वाटेत खाचखळगे असतील. लक्ष ठेवून हाक.’
‘होय बाबा.’
आणि पुन्हा जयंत निघाला. गाडीत भरपूर माल घालून निघाला. बैल आनंदाने चालत होते. घणघण घंटा वाजत होत्या. जयंता गाणी गात होता.
‘ईश्वराने सर्व विश्वाला पांघरूण घातले आहे. त्याने कोणाला उघडे नाही ठेवले. पृथ्वीवर आकाशाचे न तुटणारे सुंदर वस्त्र त्याने घातले आहे. दयाळू देव! त्याने पाखरांना मऊमऊ ऊबदार पिसे दिली आहेत. मेंढ्याबक-यांना लोकर दिली आहे. दयाळू देव! तो झाडामाडांना दरसाल वसंत ऋतूत नवीन कपडे देतो. त्यांना वस्त्रांनी नटवतो. दयाळू देव!