‘दगडांनो, आज मी गाडीभर वस्त्रे आणली आहेत. तुम्ही दगड असून किती उदार! तुम्ही दगड असून किती मायाळू व प्रेमळ! तुम्हाला शेतक-यांची कीव आली, परंतु शेटसावकारांना येत नाही. माणसाला माणसाची किंमत कधी कळेल? माणूस माणसाला कधी बरं सुखवील? दगडांनो, आज तुम्हाला सर्वांना मी नटवतो. सर्वांना शृंगारतो.’
असे म्हणून जयंताने त्या सुंदर सुंदर वस्त्रांनी ते दगड शृंगारले. त्यांच्या अंगाखांद्यावर वस्त्रे शोभू लागली. जयंताला कृतार्थ वाटले.
‘धन्य आहे तुझी जयंता,’ दगड म्हणाले.
‘धन्य तुम्ही दगड,’ जयंत म्हणाला.
‘जयंता, उदारांचा राणा हो, सर्वांना सुखी कर, तू थोर मनाचा आहेस. असा मुलगा आम्ही पाहिला नाही. पुढे पाहाणार नाही.’ ते दगड उचंबळलेल्या हृदयाने व सदगदित कंठाने म्हणाले.
‘तुमची कृपा माझ्यावर असेल तर सारे ठीक होईल. दगडांनो, तुमचे मंगल आशीर्वाद द्या. जातो मी.’
असे म्हणून जयंत निघाला. दगडांनी वस्त्रे हलवली. जयंताने बैल सोडले. गाडी बांधली. बैल पळत सुटले. त्यांना घरी जायचे होते आणि गाडीत ओझेही नव्हते. जयंताचे हृदय आनंदाने फुलले होते. तो गाणी म्हणत होता. बैलांची गाणी.
‘बैलांनो, बैलांनो, मला तुम्ही फार आवडता. कशी तुमची शिंगे, कसे रुंद खांदे. भरलेल्या गाड्या तुम्ही ओढता. जड नांगर तुम्ही ओढता. तुमचे काळे निळे डोळे, जणू पाण्याचे गंभीर डोह. फार सुंदर असतात तुमचे डोळे, फार आवडतात मला ते. तुम्हाला आम्ही मारणार नाही. तुम्हाला शिवी देणार नाही. तुम्हाला पराणी टोचणार नाही. तुम्हाला त्रास देणार नाही.
बैलांनो, तुम्ही आमचे आधार, तुम्हा आमचे अन्नदाते. तुमचे अनंत उपकार. तुम्हाला ‘राजा, सरदार’ अशा हाका मारू. तुमच्या गळ्यात घंटा घालू, साखळ्या घालू, तुमच्या कपाळावर गोंडे बांधू. पाठीवर झुली घालू. शिंगांना शेंब्या बसवू. बैलांनो, बैलांनो, मला तुम्ही फार आवडता. खरंच, फार आवडता; परंतु मी तुम्हाला आवडतो का? तुम्ही मनात काय म्हणत असाल? माणसाला काय म्हणत असाल?’ अशा अर्थाची तो गाणी म्हणत चालला.
गाडी घरी आली, जयंता आईला भेटला. तिने पाठीवरून हात फिरविला. ‘जयंता, आता नको जाऊस हो कुठे. किती दिवस हिंडायचे?’ आई म्हणाली.