आणि रुस्तुम सोराबच्या जवळ गेला. त्याने हलक्या हाताने दंडावरचे कपडे दूर करून पाहिले, तो ती खूण! त्याने पत्नीजवळ दिलेला तो ताईत! आणि रुस्तुम एकदम दु:खाने रडू लागला. पहाड पाझरू लागला. मीच पुत्राला मारले. अरेरे, मुलगा व्हावा म्हणून कोण मला उत्कंठा होती! परंतु तिने मला कळविले नाही. सोराब, पाळ! अरेरे! कसा रे घाव मी घातला! कसा भाला मारला! बाळ, खरेच, तू पित्याला शोभणारा आहेस. खरेच हो तुझा हात चालत नव्हता. तुझे निर्मळ पवित्र हृदय. त्या हृदयाने आतडे ओळखले होते. जन्मदात्याला ओळखले होते; परंतु मी पुत्राला ओळखले नाही. बाळ, तू शूराहून शूर आहेस; परंतु आता काय? अरेरे, असे कसे झाले! सोराब सोराब! असे म्हणून रुस्तुम विलाप करू लागला.
‘बाबा, रडू नका. माझे डोके तुमच्या मांडीवर घ्या. या भाल्याच्या वेदना सहन नाही होत; परंतु छातीतून तो काढण्यापूर्वी मला पित्याच्या भेटीचे सुख अनुभवू दे. आयुष्याचा शेवटचा क्षण गोड होऊ दे. कृतार्थ होऊ दे. घ्या माझे डोके मांडीवर. माझ्या तोंडावरून हात फिरवा. माझा मुका घ्या. प्रेमाने म्हणा, ‘सोराब, बाळ सोराब.’ रडू नका बाबा. पितृप्रेमाचा आनंद मला चाखवा. तो आनंद शेवटच्या क्षणी तरी मला द्या. पोटभर द्या. वेळ थोडा राहिला आहे. माझ्या आयुष्याच्या वाळूचे कण संपत आले आहेत. घटका भरत आली आहे. जग सोडून मी चाललो. या जगात विजेसारखा आलो. वा-यासारखा चाललो. ऐन तारुण्यात चाललो; परंतु जायला हवे. एक दिवस मरण आहेच. तुम्ही भेटलेत माझी आशा सफळ झाली. हृदयाची तळमळ शांत झाली. जे शोधीत होतो ते शेवटच्या क्षणाला मिळाले. बाबा, आता मला समाधान आहे. आईला भेटा. माझा घोडा रुक्ष याची काळजी घ्या. थोपटा ना मला.
आणि रुस्तुमने सोराबचे डोके मांडीवर घेतले. त्याचे केस झाडले. त्याच्या तोंडावरून आपला तो राकट दणकट परंतु आता वात्सल्याने थबथबलेला असा हात फिरवला. त्याने सोराबचा मुका घेतला. मस्तकाचे अवघ्राण केले. पित्याच्या डोळ्यांतील अश्रू पुत्राच्या मुखकमलावर पडले. सोराबच्या मुखावर मंदमधुर स्मित होते. कृतार्थतेचे, धन्यतेचे ते स्मित होते. ‘बाबा, काढा आता भाला. वेदना लहन नाही करवत. तुम्ही भेटलेत. तुमच्या मांडीवर मरण आले. आनंद!’ असे सोराब म्हणाला. रुस्तुमने तो भाला काढला आणि एकदम रक्ताचा पूर उसळला. त्या रक्ताबरोबर सोराबचे प्राणही बाहेर पडले.
आणि आता अंधार पडला. पाऊसही पडू लागला. सैन्ये आपापल्या तळावर गेली. नदीला पूर आला. अपरंपार पूर. आकाशात कडाडत होते. मेघ गर्जत होते. पंचमहाभूते प्रक्षुब्ध झाली होती.
आणि रुस्तुम तेथे होता. मांडीवर सोराब मरून पडला होता. प्रेमळ, शूर, उदार, दिलदार असा सोराब!