‘पेरलेला एक दाणा शंभर दाण्यांचे कणीस आणतो. गरीबाला एक घास द्या, देव तुम्हाला कुबेर करील. गरिबाजवळ एक गोड शब्द बोला, देव तुमची स्तुतिस्तोत्रे गाईल. गरिबाला दिलेला एक दाणा सोन्याचा होऊन तुम्हास मिळेल. द्या, द्या. जवळ असेल ते देत जा. नाही कधी म्हणू नका. ते फुकट नाही जाणार. ते वाढेल, वाढेल.’
असे गाणे म्हणत होता. हळुहळू त्या दगडाळ माळरानाशी तो आला. त्याने गाडी सोडली. बैल बांधले. त्यांना चारा घालून तो दगडांकडे आला. पुन्हा आपले ते उघडे होते.
‘का रे दगडांनो, पुन्हा तुम्ही उघडेच?’
‘जोपर्यंत सारे शेतकरी वस्त्रप्रावरणांनी नटत नाहीत, तोपर्यंत आम्ही उघडेच राहू. तू आम्हाला देशील ते आम्ही त्यांस देऊ.’
‘दगडांनो, प्रेमळ उदार दगडांनो, या वेळेस मी रिकामा आलो. जवळ कापडचोपड काही नाही. बाबा रागावले. म्हणाले, पैसे वसूल करून आण. एका पैचीही बाकी ठेवू नकोस. आता काय करू?’
‘जयंता, किती होती किंमत? किती हवेत पैसे?’
‘मला काय माहीत? मीही त्यांना रागाने म्हटले, आणतो गाडी भरून पैसे तर म्हणाले, आण. बघतो कसे आणतोस ते. माझी अब्रू तुम्ही सांभाळा. नाही तर मी घरी जाणार नाही. माझे तोंड दाखवणार नाही.’
‘जयंता, रडू नको. चिंता करू नको. आमच्यातील तुला हवे असतील तेवढे दगड तू गाडीत भर व ने घरी. दे ते बाबांना. ते प्रसन्न होतील.’
‘दगडांना बघून का ते प्रसन्न होतील? माझ्या डोक्यात तेच दगड घालून ते मला मारतील.’
‘जयंता, आम्ही आता दगड नाही राहिले. तुझ्या प्रेमामुळे व उदारपणामुळे आमचे सोने झाले आहे. आम्ही दगड; परंतु शेतक-यांना आम्ही आमची वस्त्रे दिली. देवाने आम्हाला सोन्याचे केले आहे. तू घरी नेशील तो आम्ही सोने होऊ. तू जवळ असशील तो आम्ही सोने म्हणून राहू.’