बौद्ध धर्म हा विषय अत्यंत विस्तृत; या छोटया पुस्तकांत त्याचा अत्यंत अल्प असा सारांशच येणार व तो कांही स्थलीं दुर्बोध राहाणारच. तरी पण ग्रंथकर्त्यानें सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा मोठया कुशलतेनें संग्रह केला आहे व त्या होईल तेवढया सुगम करून वाचकापुढें मांडल्या आहेत. व कांहीं कांहीं गोष्टींत तर बौद्ध धर्माच्या स्वरूपाची कल्पना या लहानशा पुस्तकाच्या द्वारें जशी येईल तशी पाश्चात्यांनीं लिहिलेल्या मोठमोठया ग्रंथांच्या वाचनानेंहि येणार नाही. असें जरी आहे तरी हें पुस्तक पडलें अत्यंत अल्पच. याच्या वाचकांस बौद्ध धर्माविषयींच्या पुष्कळ गोष्टी अज्ञात व अस्पष्ट राहाणारच त्यांच्या मनांत जी जिज्ञासा उत्पन्न होईल ती तृप्त करण्याकरितां प्रो. धर्मानंद अधिक विस्तृत ग्रंथ लवकरच लिहितील अशी मला आशा आहे. पण याहूनहि उत्तम गोष्ट ह्मणजे वाचकांनी प्रो. धर्मानंदांसारखा सर्वस्वी योग्य मध्यस्थ शिक्षक मिळत असला, तरीहि पण दुसर्‍याच्या ओंजळीतनें पाणी न पितां स्वत: पालिभाषेचें ज्ञान प्राप्त करून घेऊन बौद्ध धर्माचें ज्ञान प्रत्यक्ष करून घ्यावें ही होय. आमच्या युनिव्हर्सिटीच्या आभ्यासक्रमांत पालिभाषेचा अंतर्भाव आतां झालेलाच आहे. तेव्हां या भाषेचें अध्ययन करण्यास सुरवात करावी ह्मणून मी आमच्या तरूण मंडळीला आग्रहाची विनंति करितों. व आशा रीतीनें, विचारास पटणारा आत्मविजय हा ज्याचा पाया व सार्वत्रिक व अप्रतिहत प्रेमभाव हा त्याचा कळस आशा कल्याणप्रद बौद्ध धर्माचें ज्ञान आमच्या देशांत वाढून, प्रो. धर्मानंद ह्मणतात त्याप्रमाणें “ ह्या रत्नाचा उज्वल प्रकाश आमच्या अंतकरणावर पडून आमचें अज्ञान नष्ट होईल, आमच्यांतील भेदभाव आह्मी विसरून जाऊं, व पुन: मनुष्यजातीचे हित साधण्यास समर्थ होऊं अशी आशाआहे.”
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ पृष्ठ २४ पहा)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वा. अ. सुखठणकर.
मुंबई, ता.४ एप्रिल १९१०.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel