अशा प्रकारचे बुद्धाला मारून आपण बुद्ध होण्याचे प्रयत्न निष्फळ झाल्यावर देवदत्तानें बुद्धसंघात भेद उत्पन्न करण्याची एक नवीन युक्ति शोधून काढीली. देहदंडनाला मदत होईल आशा रीतीचे नवीन नियम भिक्षुसंघासाठीं बुद्धभगवान् करणार नाहीं हें त्यांस पक्कें माहीत होतें; आणि कांहीं लोक देहदंडन करणार्‍यांला भुलून जाऊन त्यांच्या नादीं लागतात हेंहि त्यास माहित होतें. ह्मणुन त्यानें अशी युक्ति योजिली कीं, बुद्धाजवळ जाऊन त्यांची सम्मति मिळणार नाहीं, असें कांही नवीन नियम संघाला घालून देण्यास त्यांस सांगावें. व त्यांनीं हीं गोष्ट अमान्य केली ह्मणजे ते लोकांना पूर्ण वैराग्य शिकवीत नाहींत असा बोभाट करून संघांतील कांहीं भिक्षूंना आपल्या नादीं लावावें. ही युक्ति त्यानें कोकालिक व समुद्रदत्त या दोघां संन्याशी सहायांस कळविली, व आपल्या मताचे जेवढे लोक होते, तेवढे गोळा करून तो बुद्धाजवळ गेला. बुद्धाला नमस्कार करून एका बाजूस बसल्यावर तो ह्मणाला:-“भगवान्, आपण अल्पेच्छ आणि संतुष्ट मनुष्याचे गुण वर्णन करितां, तेव्हां हे नवीन पांच नियम भिक्षुसंघानें पाळण्यासाठीं आपण घालून द्यावे, कारण हे पांच अल्पेच्छता, आणि संतोष वाढवितील.(१) भिक्षूंनीं यावज्जीन अरण्यांतच रहावें, जो भिक्षु गांवात वस्ती करील त्याला दोषी ठरवावें. (२) भिक्षूंनीं यावज्जीन भिक्षान्नावरच निर्वाह करावा. जो आमंत्रण घेऊन जेवावयास जाईल त्यास दोषी ठरवावें (३) भिक्षूंनीं यावज्जीव रस्त्यांत वगैरे पडलेल्या चिंध्या गोळा करून त्यांनी बवविलेल्या चीवरारच निर्वाह करावा. जो भिक्षु गृहस्थानं दिलेलें वस्त्र घेऊन त्याचें चीवर करील त्यास दोषी ठरवावें. (४) भिक्षूंनीं यावज्जीव वृक्षाखालीं वास करावा. जो भिक्षु आच्छादित (झोंपडी वगैरे) ठिकाणीं वास करील त्यास दोषी ठरवावें. (५) भिक्षूंनी यावज्जींव मासे खाऊं नयेत. जो भिक्षु मासे खाईल, त्यास दोषी ठरवावें.”

बुद्ध भगवान् ह्मणाले:- “ देवदत्ता, ह्या नवीन नियमांची कांही जरूरी नाहीं. ज्याची इच्छा असेल त्यानें अरण्यांतच रहावें, आणि नसेल त्यानें गांवाजवळ रहावें. ज्याची इच्छा असेल त्यानें भिक्षेवरच निर्वाह करावा, अणि नसेल त्यानें आमंत्रण केलें असतां जेवावयास जावें. ज्याची इच्छा असेल, त्यानें चिंध्यांच्या चीवरावरच निर्वाह करावा, नसेल त्याला गृहस्थानें दिलेल्या वस्त्राचें चीवर शिवण्यास हरकत नसावी. (पावसाळ्याचे चार महिने खेरीज करून) आठ महिने वृक्षाखालीं राहण्यास मी परवानगी दिलीच आहे. भिक्षान्न तयार करण्यासाठीं हे मासे मारले आहेत असें जर भिक्षूनें, पाहिलें, ऐकिलें, किवा अशी त्यास शंका आली तर त्या माशांचें त्यानें ग्रहण करूं नये नाहींतर ग्रहण करण्यास हरकत नाहीं.”

हें ऐकून देवदत्ताला फार संतोष झाला. ही गोष्ट त्यानें राजगृहांत जिकडे तिकडे प्रसिद्ध केली व तिजमुळें कांहीं भिक्षूंना आणि उपासकाना आपल्या नादास लाविलें. कांहीं भिक्षू संघ सोडून देवदत्ताच्या शिष्यशाखेंत जाऊन मिळाले आहेत, हें वर्तमान जेव्हां ते सारिपुत्त आणि मोग्गल्लान या बुद्धाच्या मुख्य शिष्यांना समजलें, तेव्हां ते बुद्धाच्या परवानगीनें देवदत्ताजवळ गेले, आणि संघसोडून गेलेल्या मिक्षूंस त्यांनी पुन: संघात आणिलें. देवदत्ताला आपल्या पापकर्मांचा पुढें पश्चात्ताप झाला परंतु तो बुद्धापाशीं प्रकट करण्यापूर्वींच त्याचें देहावसान झालें.

कौशांबी नगरीमध्यें बुद्धाच्या ह्यायातीत भिक्षुसंघांत आणखी एक भांडण उपस्थित झालें होतें. बुद्ध भगवंतांला हें वर्तमान समजल्यावर ते तेथें गेले. त्यांनीं अनेक प्रकारें उभय पक्षांचें समाधान करण्याचा प्रयत्न केला. तेव्हां त्यांपैकीं एक तरूण भिक्षु त्यांस ह्मणाला:-“भगवान्, आपण आतां वृद्ध झालां आहां, आतां आपण या भानगडींत कशास पडतां ? आमचे आह्मी काय होईल तें पाहून घेऊं.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel