“याप्रमाणे मार शोकानें व्याकुळ झाला असतां त्याच्या काखेंतून विणा गळून पडला. तेव्हां तो मार अत्यंत दु:खी होत्साता तेथें अंतर्धान पावला।”

माराचा पराभव करून धर्ममार्ग शोधून काढल्यावर बोधिसत्व बुद्ध झाला. तेथून पुढें त्याला संबुद्ध, तथागत, सुगत, धर्मराज, मारजित्, जिन इत्यादि संज्ञा लावतात. हा मार्ग त्यानें आपल्या वयाच्या ३६ व्या वर्षीं शोधून काढला. यापुढील हकीकत महावग्ग ग्रंथांत दिली आहे. महावग्ग ग्रंथाचें इंग्रजी भाषांतर१ उपलब्ध आहे, तें ज्यांना इंग्रजी येत असेल त्यांनीं अवश्य पहावें. महावग्गांतील विस्तृत वर्णन येथें देण्यास सवड नाहीं, तथापि त्यापैकीं कांही गोष्टींचा येथें उल्लेख केल्यावांचून राहवत नाहीं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ Sacred Books of the East vol. XIII & XVII.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धर्मज्ञान झाल्या दिवसापासून भगवान् बुद्ध सात दिवसांपर्यंत मोक्षरसाचा अनुभव घेत त्याच आसनावर बसले होते. सातव्या रात्रीच्या शेवटल्या प्रहरीं त्यांनी असा आनंदोद्रार काढिला:-

यदा हवे पातुभवन्ति धम्मा आतापिनो झायतो ब्रह्मणस्स।
विधूपयं तिठ्ठति मारसेनं सुरियोव ओभासयमंतळिक्खंति।।

ज्या वेळी ध्यानस्थ आणि उत्साही अशा ब्राह्मणाला धर्मज्ञानाचा साक्षात्कार होतो, त्या वेळीं तो मारसेनेचा विध्वंस करून टाकतो, आणि अंतरिक्षांतील सूर्याप्रमाणे प्रकाशतो.

नंतर ह्या नेरंजरा नदीच्या कांठावरील प्रदेशांत भगवान् राहत असतां त्यांच्या मनांत असा विचार आला कीं:-

किच्छेन मे अधिगतं हलं दानि पकासितुं।
रागदोसपरेतेहि नायं धम्मो सुसंबुध्दो।।१।।
पटिसोतगामिं निपुणं गंभीरं दुद्दसं अणुं।
रागरत्ता न दक्खन्ति तमोखन्देन आवुताति।।२।।

(१) “मोठ्या प्रयत्नानें ह्या मार्गाचें ज्ञान मला झालें आहें. आतां तें लोकांना सांगण्यांत अर्थ दिसत नाहीं. कारण लोभानें आणि द्वेषानें भरलेले लोक तें लवकर जाणूं शकणार नाहींत.

(२) हा मार्ग लोकप्रवाहाच्या उलट जाणारा आहे, हा ज्ञानयुक्त आहे, हा गंभीर आहे, हा दुरधिगम आहे, आणि हा सूक्ष्म आहे, (ह्मणून) आज्ञानावरणानें आच्छादित व कामासक्त मनुष्यांला त्याचें ज्ञान होणार नाहीं।”

भगवंताच्या मनांतील हा विचार ब्रह्मदेवानें जाणला, आणि तो आपल्याशींच ह्मणाला, ‘अरेरे। बुद्धनें जर धर्मोपदेश केला नाहीं, तर लोकांची मोठी हानि होणार आहे। लोकांचा नाश होणार आहे। असे उद्‍गार काढून ब्रह्मदेव एकदम बुद्धासमोर प्रगट झाला व त्यास ह्मणाला:-
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel