बुद्ध व बौद्धधर्म यांकडे पाश्चात्य पंडितांचें लक्ष्य अलिकडे बरेंच लागलेलें आहे. पाली व संस्कृत भाषांत बौद्ध धर्माचें जें वाङ्‌मय आहे. त्याचें अध्ययन ते अत्यंत परिश्रमानें करीत आहेत; व या  विषयावर सर्व पाश्चात्य भाषांत पुष्कळ ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. भगवान् बुद्धांनीं केलेल्या उदात्त उपदेशाचें ज्ञान तिकडे पसरत आहे व त्याविषयीं त्या लोकांचा आदरहि सारखा वाढत आहे. बुद्ध आमच्या देशांत अवतीर्ण झाले, त्यांचें शिक्षण आमच्या लोकांतच झाल्यानें त्यांनी पुढें शिकविलेल्या धर्माचा पाया आमच्याच पूर्वजांच्या विचारांवर रचिलेला आहे, त्यांनी व त्यांच्या शिष्यांनीं आपल्या धर्माचा प्रसार ज्या भाषेंत केला, व अजूनहि बौद्धांचे धर्मग्रंथ ज्या भाषेंत आहेत ती आमच्याच देशांतील भाषा, असें असून बुद्धासंबंधी माहिती मिळविण्यास आह्मांस पाश्चात्यांच्या तोंडाकडे पहावें लागतें। आमच्या देशांतील परिस्थिति, आमची प्राचीन विचारसरणी व पाली व संस्कृत ग्रंथांचें हृद्रत पाश्चात्य लोकांना पूर्णपणें समजणें अत्यंत कठिण. शिवाय बौद्ध धर्माग्रंथांचा विस्तार फार मोठा व त्यामुळें त्यांचें अध्ययनहि त्यांच्या हातून अजून पुर्णपणें झालेलें नाहीं. यामुळें त्यांच्या ग्रंथांत बरेच दोष आढळून येतात हें साहजिकच आहे. हे ग्रंथ वाचून इकडच्या चार गोष्टी, तिकडच्या चार गोष्टी, व त्यांत स्वत:च्या कल्पनांची भर घालून निर्माण झालेले आमच्या देशी भाषांतील या विषयावरील ग्रंथ.

प्राचीन धर्मसंस्थापक व धर्म यासंबंधीं विश्वसनीय ग्रंथ लिहायाचा असेल तर पुढील गुणांची आवश्यकता आहे. प्रथमत: त्या धर्माच्या वाङ्‌मयाचें मूळभाषेंत चांगलें ज्ञान करून घेतलें पाहिजे. ज्या देशांत त्या धर्माचा उदय व वाढ झाली त्यांतील चालीरीती, साधारण परिस्थिति, लोकसमजुती, विचारसरणी वगैरेंचा चांगला परिचय पाहिजे. ज्या धर्माविषयीं लिहावयाचें त्याविषयीं मन:पूर्वक आदर व श्रद्धा पाहिजे;  नाहींतर त्या धर्माचें रहस्य कदापि लक्ष्यांत येणार नाहीं. परंतु सध्यांच्या काळीं या श्रध्देबरोबरच स्वतंत्रपणें विचार करून सार काय असार काय अंधश्रध्देनें रचलेला भाग कोणता व धर्माचा सनातन अंश कोणता, अतिशयोक्ति अज्ञान व धर्मभोळेपणा कोणता व शुद्ध सत्य कोणतें हे निवडून स्पष्टपणें सांगण्याचें सामर्थ्य अंगी असलें पाहिजे. या सर्व गुणांची बिनमोल मेळवण प्रस्तुत पुस्तककर्त्याच्या अंगी विशेषेंकरून झालेली आहे. आमच्याच देशांत ब्राह्मणकुलीं जन्म, कुशाग्रबुद्धि, धर्मिक स्वभाव, संस्कृताचें उत्तम ज्ञान, नंतर बौद्धधर्म प्रचलित असलेल्या सिलोन, ब्रह्मदेश, वगैरे देशांत जाऊन, तेथील विहारांत बौद्ध भिक्षूच्या वृत्तीनें राहून नाणावलेल्या बौद्ध गुरूंच्या हाताखालीं मूळ पालिभाषेंत बौद्ध धर्मग्रंथांचें जिज्ञासाबुध्दीनें केलेलें नसून बौद्धधर्मावर जीवापाड श्रद्धा ह्मणून अनेक दु:सह संकटें सोसून केलेलें; व इतकें सर्व असून या विसाव्या शतकांतील कोणत्याहि पंडितास शोभेल अशी सारासार पाहून (Critical) व ऐतिहासिक द्दष्टया विचारकरण्याची पद्धति. या सर्व गुणांमुळें प्रो. धर्मानंद कोसंबी बौद्धसंबंधी जें जें लिहितील तें सर्व विचारी विद्वानांच्या आदरास पात्र होईल व त्यांपासून आह्मां हिंदुस्थानवसियांनाच नव्हे, परंतु पाश्चात्या पंडितांनाही पुष्कळ बोध होईल यांत मला संशय नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to बुद्ध व बुद्धधर्म


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत