हें त्या तरूणाचें भाषण ऐकून बुद्ध भगवान् तेथून चालते झाले. त्या चातुर्मासांत ते एका अरण्यांत जाऊन राहिले. इकडे ह्या भिक्षूंनीं बुद्ध भगवांताच्या सामोपचाराच्या गोष्टी ऐकल्या नाहींत, आणि हे भांडत राहिले, हें पाहून सगळ्या उपासक मंडळीस त्यांचा राग आला, व त्यांनीं आजपासून ह्या भिक्षूंस भिक्षा देऊं नये असा नियम केला. तेव्हां ते ताळ्यावर आले, व बुद्ध भगवंतांजवळ जाऊन त्यांनीं कृतापराधांची माफी मागितली.

या प्रमाणें बुद्धांच्या हयातींत संघांत फाटाफुट होण्याचा दोनादा प्रसंग आला. तथापि त्यामुळें संघाला दुर्बळता न येतां उलट बळकटीच आली. ह्य दोन्ही प्रसंगीं बुद्धाची निरपेक्षता व उपासकांची त्यांच्या ठायीं असलेली दृढ श्रद्धा, हीं जनांच्या चांगल्या प्रत्ययास आलीं.

बुद्ध भगवंताला जातिभेद मुळींच माहीत नव्हता. सारिपुत्त मोग्गल्लानादि ब्राह्मण जसे भिक्षुसंघात होते, तसाच सोपाक नांवाचा चांडाळहि त्यामध्यें होता.

“न जच्चा वसलो होति न जच्चा होति ब्राह्मणो।
कम्मना वसलो होति कम्मना होति ब्राह्मणो।।


जातीमुळें कोणी चांडाळ होत नाहीं, किंवा कोणी ब्राह्मण होत नाहीं. कर्मानें चांडाळ होतो, आणि कर्मानेंच ब्राह्मण होतो.

हें तत्त्व बुद्धांनीं भिक्षुसंघांस पूर्णपणें लागूं केलें होतें. कांहीं काळपंर्यत भिक्षुणींचा संघ त्यांनी स्थापिला नव्हता. परंतु पुढें त्याचीहि त्यांनीं स्थापना केली. भिक्षुणीसंघाला त्या कालच्या परिस्थित्यनुरूप कांहीं कडक नियम बु्द्धांनीं घालून दिले होते. एवढ्यावरून बुद्धांनीं स्त्रीस्वातंत्र्याला विरोध केला, असें रा. ब. शरच्चंद्रदास सी. आय्. इ. ह्या तिबेटी भाषाभिज्ञ बंगाली गृहस्थाचें ह्मणणे आहे. बोद्ध धर्मावर कित्येक निराधार आरोप करण्यांत येतात, त्यांपैकीं हाहि एक आहे, असें मी समजतों.

हिंदुधर्मामध्यें स्त्रियांना आणि शूद्रांना वेदाधिकार नाहीं. त्यांनीं पुराणांवरच आपली तहान भागविली पाहिजे. असा प्रकार कांहीं बौद्ध धर्मामध्यें नाहीं. बौद्धस्त्रियांना सर्व धर्मग्रंथ वाचण्याची मोकळीक आहे. आजला ब्रह्मदेशांत त्रिपिटक ग्रंथाचें अद्धायन केलेल्या आणि करणार्‍या पुष्कळ स्त्रिया आहेत. इंग्रज सरकारच्या तर्फेनें ब्रह्मी राजांच्या पद्धतीस अनुसरून पालिभषेंतील बौद्ध वाङ्मयाची परिक्षा घेऊन कांही बक्षिसें वांटण्यांत येतात. ह्या परीक्षेंत उत्तीर्ण होऊन बर्‍याच स्त्रियांनीं बक्षीसें मिळविल्याचें मला माहित आहे.

मंगलसुत्तांत आणि सिगालसुत्तांत गृहस्थांनीं गृहिणींचा आदर करण्याविषयीं बुद्धानें उपदेश केला आहे. अनाथ पिंडिक इत्यादि गृहस्थांनीं आपल्या गुणांनीं उपासकवर्गांत जसें अग्रस्थान मिळविलें होतें, तसेंच उपासिकावर्गांत विशाख प्रभृति गृहिणींनीं मिळविलें होतें. नकुलमाता नांवाच्या एका प्रमुख उपासिकेनें आपल्या पतीस केलेला उपदेश आपण ऐकाल तर तिला उपासिकावर्गांत अग्रस्थान कां मिळालें होतें याची आपणांस कल्पना करितां येईल, ह्मणून त्या उपदेशाचा सारांश येथें देतों.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to बुद्ध व बुद्धधर्म


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत