भिक्षू हो, दु:ख नांवाचें पहिलें आर्यसत्य तें हें:- जन्महि दु:खकारक, जराहि दु:खकारक, व्याधिहि दु:खकारक, मरणहि दु:खकारक, अप्रियांशीं समागम दु:खकारक, प्रियांचा वियोग दु:खकारक, इच्छिलेली वस्तु मिळली नाहीं ह्मणजे तेणेंकरूनहि दु:ख होतें: सारांश पांच उपादनस्कंध हे दु:खकारक होत.

“भिक्षूहो, दु:खसमुदय नांवाचे दुसरें आर्यसत्य ह्मणजे जी पुन:पुन: उत्पन्न होणारी व सर्वत्र आसक्ति उत्पन्न करणारी तृष्णा. ती ही:- कामतृष्णा (ऐहिक सुखाची तृष्णा), भवतृष्णा(स्वर्गादिकांची तृष्णा), आणि विभवतृष्णा(नाहींसा होण्याची तृष्णा.)”

“भिक्षूहो, दु:खनिरोध नांवाचें तिसरें आर्यसत्य ह्मणजे या तृष्णेचा अशेष वैराग्यानें निरोध करणें, तिचा त्याग करणें, तिला फेंकून देणें, तिच्यापासून मुक्त होणें आणि तिजपासून परावृत्त होणें.”

“भिक्षूहो, दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा नांवाचें चवथें आर्यसत्य ह्मणजे (वर सांगितलेला) आर्यआष्टांगिकामार्ग.”

ह्या बुद्धाच्या पहिल्या उपदेशास ‘धर्मचक्रप्रवर्तन’ असें ह्मणतात. या पांच भिक्षूंपैकीं कौंडिन्य नांवाच्या भिक्षूला बुद्धाचा उपदेश त्याच वेळीं पटला व तो बुद्धांचा शिष्य झाला. पुढें बाकीचे चारही भिक्षू बुद्धांचे शिष्य झाले.

सभ्यगृहस्थ हो, येथून पुढें कुसिनारा१  येथें परिनिर्वाण (देहावसान) होईपंर्यत ४५ वर्षांच्या अवधींत बुद्धांनीं केलेल्या परोपकाराचें वर्णन थोडक्यांतहि करण्यास-अवकाश फार झाल्यामुळें सवड राहिली नाही. त्यांनी स्थापन केलेल्या संघाची थोडीशीं  माहिती मी दुसर्‍या व्याख्यानांत आपणासमोर ठेवणारच आहें. आतां त्यांच्या दिनचर्ये थोडीशी हकिगत सांगून आटोपतें घेतों.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- हें स्थान गोरखपुर जिल्ह्यांत आहे.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बुद्ध भगवान् पहांटेस उठत असत. त्या वेळीं ते ध्यान करीत किंवा विहाराच्या बाहेरच्या बाजूस चंक्रमण (इकडून तिकडे शांतपणें फिरणें) करीत. सकाळीं उठून भिक्षेसाठीं ते गांवांत प्रवेश करीत, तेथें कोणी कांही प्रश्न विचारला तर त्याचें त्याला उत्तर देत व मग त्याल उपदेश करून सन्मार्गाला लावीत. कृषिभारद्वाज, शृगाल, इत्यादिकांना त्यांनी अशाच प्रसंगीं उपदेश करून सन्मार्गाला लाविलें. भिक्षापात्रांत शिजविलेल्या अन्नाची जी भिक्षा एकत्र होई ती घेऊन ते विहारांत परत येत असत व दुपारचे बारा वाजण्यापूर्वी भोजन करीत असत. भोजनोत्तर थोडीशी विश्रांति घेऊन ध्यान करीत असत. संध्याकाळीं गृहस्थांला किंवा भिक्षूंला उपदेश करीत असत. रात्रीं पुन: ध्यान करीत असत अथवा चंक्रमण करीत असत. मध्यरात्रीच्या सुमारास ते उजव्या कुशीवर पायावर पाय ठेवून व उशीला हात घेऊन निजत असत. या त्यांच्या निजण्याला सिंहशय्या असें ह्मणतात. ज्या वेळीं ते प्रवासाला जात त्या वेळीं बहुधा त्यांच्या बरोबर भिक्षूंचा बराच मोठा समुदाय असें. सकाळीं एका गांवामध्यें भिक्षा ग्रहण करून दुसर्‍या गांवामध्यें रात्रीं मुक्कामाला जात. जेथें विहार नसेल तेथें ते झाडाखालीं किंवा एकाद्या बागेमध्यें राहात. कोणी पूर्व दिवशीं आमंत्रण केलें असतां भिक्षुसंघासह ते त्याच्या घरी भिक्षाग्रहण करीत असत.

यप्रमाणें सतत ४५ वर्षें अनेक जनसमुदायावर आपल्या धर्मामृताचा वर्षाव करून वयाच्या ८० व्या वर्षीं बुद्धभगवान् कुसिनारा य़ेथें परिनिर्वाण पावते झाले. क्षत्रियकुलांत त्यांचा जन्म झाला असून परराष्ट्रांच्या विजयापक्षां मनोविजय त्यांना श्रेष्ठ वाटला. आपल्या शत्रूंस त्यांनीं शस्त्रांनी न जिंकितां श्रद्धा, क्षांति आणि लोककल्याणाचा अप्रकंप्य उत्साह याच उपयांनीं जिंकलें. ज्यानें मारास जिंकलें तो काय न जिंकील?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel