बुद्धांनी धर्मोपदेशास सुरवात करण्यापूर्वीं उत्तरहिंदुस्थानामध्यें निरनिराळ्या पंथांचे अनेक श्रमण (संन्यासी) होते. एकेका पंथाच्या श्रमण लोकांच्या समुदायास संघ किंवा गण असें ह्मणत असत. अशा कित्येक संघांचा त्रिपिकटक ग्रंथांत उल्लेख सांपडतो; परंतु त्यांची विशेष माहिती उपलब्ध नाहीं. बुद्धानें स्थापिलेल्या संघाचा मात्र विस्तृत वृत्तांत विनयग्रंथांत उपलब्ध आहे. त्यांतील थोडासा भाग बौद्ध संघाची माहिती देण्यासाठीं आज मी आपणासमोर ठेवीत आहें.

बुद्ध भगवंतांनीं काशींतील ऋषिपत्तन नांवाच्या प्रदेशांत राहत असतां आपले पूर्वींचे सहाय पांच भिक्षू यांस उपदेश करून आपले केल्याची हकिगत पहिल्या व्याख्यानांत आलीच आहे. ह्या पांच भिक्षूंपैकीं कौण्डन्य हा बुद्धांचा पहिल्यानें शिष्य झाला. तदनंतर वप्प(वप्र) आणि भद्दिय (भद्रिय) हे दोघे व तदनंतर महानाम व अस्सजि(अश्वजित्) हे दोघे शिष्य झाले. ते सर्व जातीनें ब्राह्मण होते. बुद्धभगवान् आणि हे त्यांचे पांच शिष्य ऋषिपत्तनांत राहत असत त्या वेळीं जवल असलेल्या वाराणसी नगरींत य़श नांवाचा एक श्रीमंत व्यापार्‍याचा मुलगा राहत होता. त्याला राहण्याकरितां त्याचे बापानें एक उन्हाळ्यासाठीं, एक पावसाळ्यासाठीं व एक हिंवाळ्यासाठीं असे तीन वाडे बांधले होते. परंतु यशाला या वैभवानें कांहीं सुख झालें नाहीं. त्याला सर्वत्र दु:खच नांदत आहे असें वाटायास लागलें. एके दिवशी रात्री ‘अहो दुखं अहो कष्टं’ असें ह्मणत तो आपल्या वाड्यांतून बाहेर पडला आणि जेथें बुद्ध राहत होते तेथें गेला. पहांटेच्या प्रहरीं बुद्ध भगवान् इकडून तिकडे चक्रमण करीत होते, त्यांनी यशास पाहिलें. यश पुन: ‘उपद्रुतं बत भो उपसृष्टं बत भो’ (अहो सर्वत्र उपद्रव आहे, सर्वत्र उपसर्ग आहे) असें ओरडला. तें ऐकून बुद्धभगवान् ह्मणाले “यशा येथें उपद्रव नाहीं. येथें उपसर्ग नाहीं.” तेव्हां यश बुद्धाजवळ जाऊन बसला. त्यानें भगवंतांच्या उपदेशश्रवणानें तेथल्या तेथें निर्वाणपद प्राप्त करून घेतलें, व भिक्षुसंघांत प्रवेश केला.

दुसर्‍या दिवशीं यशाचा बाप त्याचा शोध करीत ऋषिपत्तनांत आला. त्यानें बुद्धाला यशास पहिलें आहे काय? असा प्रश्न केल्यावर बुद्ध त्याला ह्मणाले, “हे गृहपति, तूं घाबरूं नकोस. यशाला तूं या ठिकाणीच पाहशील.” हें ऐकून त्याला धीर आला, व तो बुद्धाच्या बाजूस एका आसनावर बसला.तेव्हां बुद्धांनीं त्याला धर्मोपदेश केला. तो ऐकून त्याच्या मनामध्यें पूर्ण वैराग्या उत्पन्न झालें. आणि तो बुद्धाचा ताबडतोब उपासक झाला. तेव्हा बुद्धांनीं त्याची आणि यशाची तेथल्या तेथें गांठ घालून दिली. यशानें संसारत्याग केला याबद्दल त्याच्या बापास कांहींच वाईट वाटलें नाहीं; कारण बुद्धोपदेशानें त्याच्या मनांत तसाच प्रकाश पडला होता. तो बुद्धाला ह्मणाला “भगवन्, यशाची आई यशास पाहण्यास फार उत्सुक झाली आहे. ती त्य़ासाठीं फार शोक करीत आहे. तेव्हां कृपा करून आपण यशास बरोबर घेऊन उद्यां आमच्या घरीं भोजनास यावें.” बुद्ध यशास बरोबर घेऊन दुसर्‍या दिवशीं त्या व्यापार्‍याच्या घरी गेले. तेथें त्यांनीं यशाच्या आईला व पूर्वाश्रमांतील बायकोला धर्मोपदेश केला. त्या उपदेशानें त्यांच्या मनांत प्रकाश पडला. त्या दोघी तत्काल बौद्धउपासिक झाल्या. अर्थांत यशाच्या गृहत्यागाबदल त्यांनी कांही वाईट वाटलें नाहीं.

यश भिक्षू झाला, हें वर्तमान जेव्हा विमल, सुबाहु, पूर्णजित् आणि गवंपति ह्या त्याच्या चार मित्रांनी ऐकिलें, तेव्हां ते ऋषिपत्तनांत जाऊन यशास भेटले, यशानें त्यांस बुद्धाजवळ नेलें. बुद्ध भगवंताच्या उपदेशानें त्यांच्या मनांत प्रकाश पडला, व त्यांनी तेथल्या तेथेच भिक्षूसंघांत प्रवेश केला. ही गोष्ट त्या प्रांतांतील यशाच्या पन्नास मित्रांस समजल्यावर त्यांनींहि ऋषिपत्तनांत बुद्धाची भेट घेऊन बौद्धसंघात प्रवेश केला. याप्रमाणें भगवान् ऋषिपत्तनांत राहत असतां त्यांजपाशीं साठ भिक्षूंचा संघ जमला. हे सगळे भिक्षू अर्हत्पदाला पावले होते. त्यांना एकत्र जमवून बुद्ध ह्मणाले:-“भिक्षू हो, प्रापंचिक आणि स्वर्गीय पाशांतून मी मुक्त झालों आहें; आणि भिक्षू हो, तुह्मीहि या पाशांतून मुक्त झालां आहांत. तेव्हा आतां भिक्षूहो, बहुजनांच्या हितासाठीं, पुष्कळांच्या सुखासाठीं, लोकांवर अनुकंपा करण्यासाठीं, देवांच्या आणि मनुष्यांच्या कल्याणासाठीं, धर्मोपदेश करण्यास प्रवृत्त व्हा. एका मार्गानें दोघे जाऊं नका. प्ररंभीं कल्याणप्रद, मध्यंतरीं कल्याणप्रद व शेवटीं कल्याणप्रद अशा ह्या धर्ममार्गाचा उपदेश करा.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel