आयुर्वेदालाहि ह्या दहा पापांचा त्याग मान्य आहे अष्टंगह्रदयसंहितेच्या २ र्‍या अध्यायांत वाग्भट ह्मणतात:-

सुखं च विना धर्मात्तरस्माद्धर्मपरो भवत्।
भक्त्या कल्याणमित्राणि सेवेतेतरदूरग:।।


धर्मावांचून सुख नाहीं, ह्मणून धर्मपरायण व्हावें. श्रद्धापूर्वक सज्जनांची सेवा करावी व खलांपासून दूर राहावें.

हिंसास्तेयान्यथाकामं पैशुन्यं परूषानृते।
साभिन्नालापव्यापादमभिध्यादृग्विपर्यजम्।।
पापं कर्मेतिदशधा कायवाङ्मानसैस्त्यजेत्।।

हिंसा, स्तेय (चोरी), व्यभिचार, चहाडी, कठोर भाषण असत्य भाषण, वृथा बडबड, व्यापाद (क्रोध), परधनचिंता आणि मिथ्या दृष्टि (नास्तिकता) ह्या दहा पापांचा कायेनें वाचेनें आणि मनाने त्याग करावा.

वागभट हा जरी बौद्ध होता तरी बौद्धधर्म लोकांनीं पाळावा ह्या हेतूनें ह्या दहा पापांचा त्याग करण्यास त्यानें सांगितलें नाहीं. आरोग्यप्राप्तीला ह्या दहा पापांचा त्याग अत्यावश्यक आहे असें त्याचें ह्मणणें आहे.

ह्या दहा पापांच्या त्यागाला पालिभाषेंत मनुष्यधर्म असें ह्मटलें आहे. यावरून व वरील दोन उतार्‍यांवरून आपणांस असें दिसून येईल कीं, प्राचीनकालीं या देशांत ह्या दहा पापांचा त्याग सर्वसंमत झाला होता. नागरिकत्वाला पोंहचण्यास ह्या पापांचा त्याग आवश्यक आहे असें सर्वांस वाटे. तेव्हां, सभ्य गृहस्थहो, सर्व पंथांच्या लोकांना पसंत पडण्यासारखा हा दश पापकर्मांचा त्याग आपण आपल्या तरूण पिढीस कृतीनें आणि शब्दांनीं शिकविण्यास कोणती हरकत आहे?

या प्रमाणें निषिद्ध शीलाचें स्वरूप थोडक्यांत आपणासमोर ठेवलें आहे. या सर्व शीलाचे- विहित आणि निषिद्ध शीलचि-पुन: हीन, मध्यम आणि उत्तम असे तीन भेद केले आहेत. कीर्तींच्या आशेनें पाळलेलें शील हीन, पुण्यफळाच्या आशेनें पाळलेलें मध्यम, व हें माझें कर्तव्यच आहे अशा भावनेनें पाळलेले उत्तम समजावें ‘मी मोठा शीलवान्, हे दुसरे लोक दु:शील आहेत, हे पापी आहेत,’ अशाप्रकारें ज्या शीलाचा आत्मस्तुति आणि परनिंदा करण्यांत उपयोग होतो, तें हीन शील, ज्याचा असा उपयोग होत नाहीं परंतु जें ज्ञानयुक्त नाहीं, तें मध्यम, व प्रज्ञापूर्ण शील उत्तम जाणावें. आपणास दुसर्‍या जन्मीं सुख मिळावें ह्मणून पाळलेलें शील तें हीन, आपणाला मौक्ष मिळावा ह्या हेतूनें पाळलेलें मध्यम, व सर्व प्राणिमात्राच्या हितासाठीं पाळलेलें शील उत्तम होय.

आणखी या शीलाचे हानिभागि, स्थितिभागि, विशेषभागि आणि निर्वेदभागि असे चार भेद करितात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel