‘आता माझे काय व्हायचे राहिले आहे? वाईटाची पराकाष्टा झाली आहे. आणखी वाईट दुसरे काय आहे? मला कशाचीही आता आशा नाही. जीवनातील सारे विष मी पचविले आहे.’ रूपा म्हणाली.

‘अग, एखादे वेळेस सुटशील. नाही तर आहेच जन्माचा तुरूंग.’ कोठडीतील ती बाई बोलली.

‘पुरे तुमची बोलणी. मोठी आली सल्ला देणारी. बंद कर तोंड; नाही तर थोबाड फोडीन. हो आत. कोठडी बंद करायची आहे.’ ती नायकीण गरजली.

जेलरसाहेब निघाले. रूपाला घेऊन शिपाई निघाले. बोळाच्या दारापर्यंत ती औरत-कोठडयांची नायकीण त्यांच्याबरोबर गेली. सलाम करून ती परत कोठडीवर देखरेख करायला आली.

तुरूंगाच्या कचेरीतून सारी व्यवस्था झाल्यावर शिपायांच्या पहार्‍यांत रूपा बाहेर पडली. ते हत्यारी शिपायी होते. आपण जबाबदारीने कर्तव्य पार पाडीत आहोत, अशा ऐटीत ते चालले होते. त्या दुर्दैवी स्त्री-कैद्याकडे रस्त्यांतून येणारे जाणारे पाहात होते. गाडीवाले, मजूर, हमाल, दुकानदार, कारकून सारे रूपाकडे बघत नि निघून जात. जणू ती प्रदर्शनातील वस्तू होती. होय! जगाने तिचे प्रदर्शनच मांडले होते. ती खिन्नपणे परंतु गंभीरपणे पावले टाकीत जात होती.

‘काही तरी वाईट कर्म केले असेल, शेण खाल्ले असेल. भोग म्हणावे कर्माची फळे.’ तिच्याकडे पाहून म्हणे. शाळेत जाणार्‍या मुलामुलींचीही रस्त्यांत गर्दी होती. दहा-साडेदहाची ती वेळ होती. रस्ते गजबजलेले होते. हत्यारी पोलीस पाहून मुले जरा दुरूनच बघत. ही डाकीण आहे की काय, जादूटोणा करणारी आहे की काय, असे मुलांच्या मनांत येई. आपल्या अंगावर ती धावून तर नाही ना येणार, असेही लहान मुलांच्या मनांत येई. परंतु पोलीस आहेत, ती गडबड करणार नाही, असा विश्वास वाटून ती थांबत तिच्याकडे बघत. तो पाहा एक शेतकरी. खेडयातले धान्य घेऊन तो आला होता. ते विकून आलेल्या पैशांत दुसरे शहरी पदार्थ घ्यायला तो जात होता. त्याला त्या अभागिनीची कीव आली. त्याने खिशातून एक चवली काढून तिच्या हातावर ठेवली. दु:खी रूपा दु:खाने हसली. ती लाजली. आपली कीव केली जावी याचे तिला दु:ख वाटले. तिच्या डोळयात पाणी चमकले. परंतु तिने अश्रू आवरले. काही तरी ती पुटपुटली नि पुढे चालली. कोणी तिच्याकडे वाकडया नजरेनेही बघत. जणू तिचे सौंदर्य त्यांना मोह पाडीत होते. तिला त्यामुळे बरे वाटे. तीही त्यांच्याकडे प्रसन्न दृष्टीने पाही. तिच्या तोंडावर आज जरा टवटवी दिसत होती. बाहेरची मोकळी हवा मिळाली. बाहेरचे विशाल जग बर्‍याच दिवसांनी आज पुन्हा तिने पाहिले. तिचे हृदय-कोमेजलेले हृदय-जरा प्रफुल्लित झाले होते. ते पाहा धान्याचे मोठे दुकान; आणि त्याच्यापुढे किती कबुतरे, किती पारवे! त्यांना दाणे टाकण्यांत आले होते. माणसांची आबाळ झाली तरी चालेल; परंतु पशुपक्ष्यांची होता कामा नये! रूपा जात होती. एका सुंदर कबुतराला तिचा पाय लागला. फडफड करीत ते उडाले. तिच्या डोक्याभोवती फिरून आपल्या पंखांचा तिला वारा घालून ते पुन्हा खाली आले नि दाणे टिपू लागले. त्या कबुतराकडे पाहून तिच्या तोंडावर स्मित झळकले. परंतु तिला स्वत:च्या स्थितीचे भान आले आणि ते स्मित लगेच मावळले. ती पुन्हा खिन्न झाली. तिची मुद्रा करूणगंभीर दिसू लागली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel