‘हा काय चावटपणा चालला आहे? येथे दवाखान्यात असे वर्तन चालणार नाही. मी तेथून तुम्हांला काढून टाकीन.’ तो मुख्य डॉक्टर म्हणाला.

आणि त्याच दिवशी तिला दवाखान्यातून काढून टाकण्यात आले. कोणीही आपल्याला पतित समजावे. आपला अपमान करावा, आपल्याकडे भोगी दृष्टीने पाहावे याचे तिला वाईट वाटले. त्या दिवशी तिला रडू आले. ज्या वेळेस ती प्रतापला भेटायला गेली, त्या वेळेस आपण निरपराधी आहो असे ती त्याला सांगणार होती. परंतु ‘तुझे वर्तन नि तू...’ असे तो म्हणाला. आपणावर त्याचा विश्वास नाही असे तिला वाटले. आपण आपली बाजू मांडली तर त्याचा अधिकच संशय येईल असे मनात येऊन ती अधिक काही बोलली नाही. दोन वेळच्या भेटीत जरी त्याच्याजवळ कठोरपणे वागली होती, ती त्याला क्षमा करायला तयार दिसली नाही, तरी अलीकडे ती त्याच्यावर नकळत प्रेम करू लागली होती. त्याच्या इच्छेप्रमाणे ती वागू लागली होती. त्याला बरे वाटावे म्हणून ती दवाखान्यात जाऊ लागली. नटणेमुरडणे तिने सोडले. बिडीसिगारेट ओढणे सोडले. ती जरी त्याच्याजवळ लग्न करायला तयार नव्हती तरी त्याच्याविषयी तिला मनांत आदर होता. आपणाजवळ लग्न केल्यामुळे त्याची सामाजिक प्रतिष्ठा नष्ट होईल म्हणून ती लग्नाला तयार होत नव्हती. परंतु आज त्याचा आपल्या सद्वर्तनावर विश्वास नाही असे प्रतापला खात्रीपूर्वक वाटावे, याचे तिला शिक्षा कायम झाली या बातमीपेक्षाही अधिक वाईट वाटले. त्याला भेटून गेल्यावर ती रडली.

आणि प्रताप रस्त्याने जात होता. त्याच्या मनात सर्वच कैद्यांविषयी आज अपार करूणा भरली होती. हे हजारो कैदी तुरूंगातून का खितपत पडलेले असतात? खरोखर काय असतो यांचा अपराध? काय या सर्वांचा गुन्हा? कैद्यांचे पाच प्रकार त्याच्या डोळयांसमोर आले. पहिला वर्ग रूपासारख्यांचा. अगतिक होऊन अशी माणसे गुन्हा करतात. त्यांचा हेतूही नसतो. त्यांची परिस्थितीच अशी असते की, लोक त्यांच्याकडे येतात नि भानगडी होतात. दुसरा प्रकार म्हणजे द्वेषमत्सरादी विशिष्ट भावनेच्या आहारी जाऊन गुन्हा करणार्‍यांचा. त्या त्या परिस्थितीत कोणीही तसाच वागतो. कैद्यांपैकी निम्मे कैदी या दुसर्‍या प्रकारांतले असतात. ती भावना ओसरल्यावर त्यांना वाईट वाटते. परंतु कायदा यंत्रवत् असतो. आणि कैद्यांना वर्षानुवर्षे तुरूंग भोगावा लागतो. तिसरा वर्ग अशांचा असतो की, आपण काही खरोखर गुन्हा करीत आहोत असे त्यांना वाटत नसते. केवळ कायदा म्हणून गुन्हा. खोताच्या मालकीची सर्वत्र जमीन. जरा गवत कापले. लाकूडफाटे नेले तर गुन्हा होतो. हा का खरोखर गुन्हा? हजारो एकर जमीन स्वत: बळकावून बसणाराच वास्तविक गुन्हेगार. परंतु शिक्षा होते मोळीविक्या मोलकरणीला. गवत नेणार्‍या गरीब शेतकर्‍याला! चौथा प्रकार राज्यकर्त्यांपेक्षा जे स्वत:ला नैतिक दृष्टया श्रेष्ठ समजतात अशांचा. कोणी स्वातंत्र्यासाठी बंड करणारे, समाजवाद आणू पाहणारे, कोणी संप करणारे! या वर्गात किती तरी उच्च प्रकारची माणसे असतात. बुध्दीने मूलगामी, हृदयाने थोर अशी! परंतु त्यांची जीवने अंधारात जात असतात! आणि पाचवा प्रकार अशांचा की, जर समाजाने नीट वागवले असते तर ते गुन्हेगार झाले नसते! खरोखर हे लोक निष्पाप असतात. कोणला खायला नसते म्हणून ब्रेड चोरतो. कोणी बेकार म्हणून कोठे चोरी करतो. त्यांना धंदा द्यावा. ते सारे स्वाभिमानी जीवन जगतील. त्याला तुरूंगातील वेश्येचा एक मुलगा आठवला. त्याला लहानपणापासून भली संगती मिळालीच नाही, आणि शेवटी तुरूंगात येऊन पडला. प्रतापला तो तुरूंगात भेटला तेव्हा म्हणाला, ‘हे वकील, कायदेपंडीत, हे तुरूंग, हे कायदे आम्हांला सुधारण्यासाठी सारे आहे. परंतु आम्हांला सुधारणारी एक वस्तू कोठेच मिळत नाही. आमचा स्वाभिमान राखणारी सहानभूतीची वागणूक! आम्हांला धंदा शिकवा, कला शिकवा. आमच्याकडे मानवतेच्या दृष्टीने पाहा. परंतु ते दूरच राहिले. बेटे आम्हांला सुधारू पाहतात. परंतु स्वत:च मनाने अध:पतित असतात!’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel