तो बाहेर पडला. जेथे तिच्याजवळ तो प्रथम बोलला होता, त्या जागेवर तो उभा राहिला. तेथे आंब्याचे झाड होते. त्याची दाट छाया तेथे आजही होती. परंतु रूपा कोठे आहे? तो हिंडत होता. आणि ज्या ठिकाणी रूपासह तो खेळला होता, तेथे तो गेला. ते काटेरी झुडूप आता तेथे नव्हते. तो खळगा तेथे नव्हता. तुला लागले का, म्हणून रूपाने त्याला तेथे विचारले होते. त्याने तिचे हात हातात घेतले होते. तो तेथून नदीकडे गेला. नदी खळखळ वाहात होती. तो तेथे बसला. त्याला स्वत:चा जीवनप्रवाह दिसू लागला. प्रथम तो या गावी कित्येक वर्षांपूर्वी जेव्हा आला होता तेव्हा तो निर्मळ होता, विशुध्द होता; ध्येयार्थी होता; चारित्र्यवान होता. त्याच जीवन त्या वेळेस नुकत्याच उमलणार्‍या फुलाप्रमाणे घवघवीत, टवटवीत ताजे ताजे होते. आणि आज? ज्या विशाल जीवनाला मिठी मारण्याचे त्याचे ध्येयस्वप्न होते, ते कुठे आहे? परंतु तो पुन्हा ध्येयाचा यात्रेकरू होत हाता. आडरानातून पुनरपी संतांच्या मार्गावर येत होता. तो उठला. तो घरी आला. जड अंत:करणाने तो घरी आला. त्याने स्नान केले; तो जरा पडला. त्या घरात तो हिंडत होता. मावश्यांची कपाटे तपाशीत होता. एके ठिकाणी त्याला जुनी पत्रे सापडली आणि एक मोलाची वस्तू त्याला सापडली. रूपाचा त्या वेळचा एक सुंदर फोटो त्याला आढळला. किती सुंदर ती दिसत होती! साधेपणा, तजेलदारपणा, एक प्रकारची निर्मळ मोहकता तिच्या चेहर्‍यावर दिसून येत होती. त्याने तो फोटो खिशात घातला. तो आता थकला होता. त्याने जरा वामकुक्षी केली. परंतु फार वेळ त्याला झोप लागली नाही. कशी येणार झोप? तो उठला. दिवाणजींनी चहा आणला.

‘बसा दिवाणजी.’ तो म्हणाला.

‘आपली व्यवस्था सारी ठीक आहे ना?’

‘सारे ठीक आहे. येथे या गावात रूपाची मावशी राहाते का हो? तुम्हांला माहीत आहे?’

‘हो. गावातच ती राहाते. चोरून ताडी विकते. तिची मी चांगली खरडपट्टी काढणार आहे. मी तिच्यावर खटलाच भरणार होतो. परंतु म्हातारीची कीव येते. घरात तिची नातवंडे आहेत.’

‘कोठेसे आहे तिचे घर?’

‘गावाच्या टोकाला. शेवटकडून तिसरे घर. विटांच्या एका घरापलीकडे तिचे घर आहे. घर कसचे. खोपटं आहे. मीच येतो तुमच्याबरोबर.’

‘नको नको. मी ते शोधून काढीन. तुम्ही उद्या सार्‍या कुळांना बोलवा.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to नवजीवन


जगातील अद्भूत रहस्ये
इसापनीती कथा २०१ ते २५०
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha
भूत बंगला
विश्राम
महात्मा गौतम बुद्ध
रामाचा शेला
संध्या
धडपडणारी मुले
इस्लामी संस्कृति
आजही अश्वत्थामा जिवंत आहे का ??
नलदमयंती
मराठी फॉर्वर्डस 2
खुनी कोण ?- भाग तिसरा
भारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल !