‘मी जातो.’ प्रताप म्हणाला.

‘किती सुंदर प्रवचन!’ तो अधिकारी म्हणाला.

‘मला काम आहे.’

‘मोटार नको?’

‘नको. मी जाईन.’

असे म्हणून प्रताप उठून निघून गेला. त्याच्याकडे श्रोतृवृंदाने पाहिले. प्रवचनकाराचेही डोळे त्याच्याकडे गेले. परंतु प्रताप सरळ निघून गेला.

त्या किल्ल्यातील स्थानबध्द तरूणीच्या आईचा पत्ता त्याच्याजवळ होता. आपण केलेली सर्व खटपट त्या मातेच्या कानावर घालावी व तिला धीर द्यावा असे वाटून तो एके दिवशी तिच्याकडे जायला निघाला. तो त्या बिर्‍हाडी आला. चष्मा लावलेली एक पोक्त बाई तेथे काही तरी वाचीत होती.

‘कोण पाहीजे आपल्याला?’ तिने विचारले.

‘मी प्रतापराव. तुमच्या मुलीसंबंधी शक्य ते सारे केले आहे.’

‘तुम्ही का ते? या. माझी मुलगी आज सकाळीच सुटून आली. तुमचे किती आभार मानू? बसा. या खुर्चीवर बसा. मी तिला बोलावते. ती शेजारी गेली आहे. मी काल सायंकाळी तुमच्या वाडयांत गेले होते. कारण काल ताराची तार आली होती. तुम्ही हल्ली वाडयांत राहात नाही वाटते?’

‘तेथे नाही राहात. तुमची तारा सुटून आली! छान. इतक्या लौकर काम होईल असे मला वाटले नव्हते.’

इतक्यात तारा आली. ती सडपातळ होती. ती अशक्त झाली होती.

‘सरकारला जिची धास्ती वाटे ती का तू?’ त्याने विचारले.

‘माझी तारा शूर आहे. निर्भय आहे. जगासाठी नि:स्वार्थीपणाने ती काम करीत आहे.’ माता म्हणाली.

‘माझ्यासारखी हजारो तरूण माणसे आता क्रांतीच्या कामाला लागली आहेत. यात आता वाखणण्यासारखे काय आहे? आजूबाजूचा अन्याय बघून मनुष्य स्वस्थ कसा बसतो, याचे आश्चर्य वाटावे. तो अन्याय दूर करायला तो उठतो यात कसले आश्चर्य? मला स्थानबध्द व्हावे लागले याचे मला वाईट नाही वाटत. वाईट वाटते याचे की तुरूंगात आपण व्यक्ती न राहता जणू वस्तू बनतो. आपल्या कपडयांवर नंबर; छातीवर कैदीनंबरचा बिल्ला; आपण जणू एक गाठोडे बनतो. तुरूंगात सकाळ-संध्याकाळ ‘गिनती’ करतात. दिवसपाळीचे शिपाई रात्रपाळीवाल्यांच्या स्वाधीन करतांना म्हणतात, ‘चारशे कैदी बराबर, साब.’ जणू इतके नग ताब्यात घ्यायचे, ताब्यात द्यायचे!’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel