मावश्यांकडे पुन्हा आलेला प्रताप हा असा होता. त्याला पाहून त्या आनंदल्या. म्हणाल्या,

‘बरे झाले, दोन दिवस आलास. चांगलाच वाढलास. मिशाही आल्या तुला. आणि हे काय? भिजलास वाटते?’

‘जरा पाऊस लागला.’

‘अग रूपा, त्याला आधी कढतकढत कॉफी आण.’

प्रताप आपल्या जुन्या खोलीत गेला. त्याने दुसरे कोरडे कपडे घातले, आणि रूपा कॉफी घेऊन आली. त्याने तिला ओळखले. तिला तेथे पाहून त्याचे डोळे आनंदले.

‘ये की आत.’ तो म्हणाला.

‘तू बरा आहेस?’ तिने विचारले.

‘तू बरी आहेस ना?’ त्याने विचारले.

‘हो. हा तुझा आवडता साबण घे. हा टॉवेल घे.’

‘मी येथे आलो. तू भेटलीस. मला किती आनंद होतो, रूपा.’ तो म्हणाला.

परंतु त्याच्या डोळयांची तिला भीती वाटली. ती तेथून चटकन् निघून गेली. परंतु त्याच्या मनात पूर्वीच्या सार्‍या स्मृती जागृत झाल्या. तिचा आवाज तिची पावले दुरूनही कानी येताच तो अस्वस्थ होई. त्याचे प्रेम उसळे. परंतु ते प्रेम पूर्वीचे नव्हते. ते पवित्र, मधुर, सुंदर, गूढ असे ते प्रेम आज नव्हते. पूर्वी त्याला वाटे की, मनुष्य एखदाच प्रेम करू शकतो. प्रतापसारख्या व्यक्ती जणू दुहेरी असतात. त्यांच्या एका देहांत जणू दोन मने असतात. एक भोगी तर एक त्यागी. एक मन धडपड करणारे, वर जाऊ पहाणारे तर दुसरे खाली ओढणारे, गटारात जाणारे. एक मन सर्वांच्या सुखाचा विचार करणारे, ‘अवघाचि संसार सुखाचा’ करू पाहणारे, तर दुसरे मन केवळ ‘अहं’ पाहणारे स्वत:पुरता विचार करणारे. प्रतापचे एक मन त्याला म्हणे, ‘येथे राहा. भीती कशाची? भोग नि मग जा.’

त्या दिवशी एकादशी होती. मावश्या कीर्तनाला गेल्या होत्या. रूपाही गेली. त्याला वाटले होते की, ती घरी राहील. परंतु ती गेल्यामुळे तोही कीर्तनास गेला. तो तिच्याकडे पाही. रूपा त्याच्याकडे पाहीना. परंतु प्रतापची दृष्टी आपल्याकडे आहे हे तिला कळत होते. कीर्तन संपून सारी घरी आली. सायंकाळची वेळ होती. ती बाहेर केळीजवळ उभी होती. सायंकाळचा रक्तिमा पडून तिचा चेहरा किती सुंदर दिसत होता. आणि तो तिच्याकडे पाहात होता. जगातले सारे सौंदर्य तिच्या मुखमंडलावर येऊन नाचत आहे असे त्याला वाटले. तो तिच्याजवळ गेला. त्याने तिचे हात धरले. त्याने तिच्या डोळयांक डे पाहिले.

‘हे काय?’ असे म्हणून तिने हात पटकन् ओढून घेतले.

ती निघून गेली. तो तेथेच हात चोळीस बसला. नंतर दिवे लागले. ती पडवीत काही काम करीत होती. मावश्या पुढल्या अंगणात माळा जपत होत्या.

‘रूपा. रात्री मी तुझ्या खोलीत येईन, तू एकटी असशील. कडी नको लावू.’ तो म्हणाला.

‘हे काय बोलतोस? असे नको मनात आणू. असे काही करू नकोस.’ ती भीतीने म्हणाली. परंतु रात्री मावश्या केव्हा झोपतात ह्याची तो वाट पाहात होता. आणि तो उठला. त्याने तिचे दार हळूच ठोठावले. ती जागी होती. तिचे सारे अंग थरारले. जणू विद्युत शरीरांत नाचत होती. ती का कडी काढत नव्हती?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel