‘रूपा!’ प्रतापने हाक मारली.

तिच्या सजल नयनांनी उत्तर दिले. परंतु म्हणाली.

‘तुम्हीही सुखी राहा. स्वत:ची काळजी घ्या. जगा.’

‘सुखी असा. क्षमस्व. आशीर्वाद द्या.’ प्रसन्न म्हणाला.

‘सुखी व्हा तुम्ही.’ प्रताप म्हणाला.

गेली सारी. घंटा झाली. आगगाडी त्या कैद्यांना घेऊन गेली. प्रताप रमणजवळ येऊन बसला. तेथे हत्यारी पोलीस होते. परंतु स्थानिक दवाखान्याऐवजी तुरुंगांतच रमणला न्यायचे ठरले. प्रतापला त्याच्याबरोबर जाता येत नव्हते. तुरुंगाच्या दारापर्यंत तो गेला. रमणला आत स्ट्रेचरवरून नेण्यात आले. तुरुंगाचा भयाण दरवाजा लागला. रात्रीचे दहा वाजले होते. ते पाहा टोले पडले. आलबेल सर्वत्र झाली. प्रताप धर्मशाळेत येऊन पडला. सारे स्वत:चे जीवन त्याच्या डोळयांसमोर येत होते. केवळ स्वत:चेच नाही तर सार्‍या मानवजातीचे जीवन त्याच्यासमोर उभे होते. जगातील विषमता, जगातील प्रतिष्ठित श्रीमंत लोक, जगातील श्रमणारी दुनिया, आणि हे संघर्ष, ही बलिदाने, या शिक्षा, हे तुरुंग, हे फास, हे वाद आणि तो शांत मुक्तात्मा फकीर, सारे त्याच्या डोळयांसमोरून चलच्चित्रपटाप्रमाणे जात होते.

सकाळ झाली. तो तुरुंगाच्या दारात आला. त्याला आत घेण्यांत आले. रमणचा आत्मा विश्वात्म्यात विलीन झाला होता. प्रतापच्या डोळयांतून अश्रुधारा आल्या. त्याच्या देहाला मूठमाती देण्याचे त्याने ठरविले. अधिकार्‍यांनी परवानगी दिली. प्रताप गावात गेला. त्याने एक गाडी आणली. तो पुण्यवान देह त्याने गाडीत ठेवला. तो त्या स्मशानात गेला. गावातील काही तरूण आले. प्रतापने नि त्या तरूणांनी सरण रचले. अग्नी देण्यात आला. त्या ज्वालांनी एक महान् जीवन समाप्त केले. प्रताप पुन्हा तुरुंगांत आला. त्याला काही लिहून द्यायचे होते. तेथे बरेच प्रतिष्ठित लोक आले होते.

‘ही मंडळी जेल बघायला आली आहे. तुम्हांला बघायचा आहे?’ जेलरने विचारले.

‘हो.’ प्रताप म्हणाला.

आणि मंडळी जेल बघत निघाली. त्या एकांतवासाच्या कोठडया, ते फटके मारायचे तिकाटणे, ती फाशी देण्याची जागा सारे दाखवण्यात आले.

‘येथे आठवडयातून एकदा धार्मिक प्रवचन होते.’ जेलर म्हणाला.

‘छान!’ एक प्रतिष्ठित गृहस्थ म्हणाले.

आणि पुढे गेले. तो तेथे प्रतापला तो कालचा फकीर दिसला.

‘तुम्ही येथे स्वामीजी?’ प्रतापने विचारले.

‘उडाणटप्पू म्हणून मला पकडून आणण्यात आले.’ तो साधू म्हणाला.

‘उभा राहा.’ शिपाई म्हणाला.

‘मी कोणाचा नोकर नाही उभा राहायला.’ तो साधू म्हणाला.

‘सीधा करेगा तुमको!’ पोलीस गुरगुरला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel