खरे नाही का त्याचे बोलणे? आणि तो दुसरा तरूण! त्याच्या बापाचे शेतभात गेलेले. तो लष्करात जातो. अधिकार्‍यांच्या प्रेमपात्रावर तोही प्रेम करू लागतो. शेवटी तुरूंगात येऊन पडतो. त्या तरूणाचा स्वभाव भावनामय होता. परंतु त्यांना सुसंस्कृत वळण कोणी लावले नाही. केवळ जीवन बेछूट भोगासाठी, असेच तो धरून चालला. त्याच्यावरचे अंमलदार तसेच होते. भोगी किडे!

प्रताप विचार करीत जात होता. इतर माणसांप्रमाणेच ही तुरूंगातील माणसे. काही तुरूंगात पडली, काही बाहेर आहेत. या बाहेरच्या तुरूंगात असणार्‍यांचा न्याय करण्याचा काय म्हणून अधिकार?

तो विचार करीत घरी आला. तो तेथे एक चिठी होती. त्याची बहीण आली होती. तिने त्याला भेटायला बोलावले होते. बरेच वर्षांत बहीणभावाची भेट नव्हती. बहिणीचा नवरा सरकारी वकील होता. आपण फार मोठे असे त्याला वाटे. प्रतापला त्याचा तिरस्कार येई. आपली बहीण याच्यावर कशी प्रेम करते याचे त्याला आश्चर्य वाटे. लहानपणाची थोर स्वभावाची माझी बहीण! ती का केवळ दिडक्यांना महत्व देणारी झाली! परंतु तिला भेटायला तो निघाला. बहिण घरीच होती. तिचा नवरा थकल्यामुळे झोपला होता. वास्तविक उठायची वेळ झाली होती. परंतु अजून उठला नव्हता.

‘ताई, तुझी चिठी मिळाली.’ तो म्हणाला.

‘अरे, प्रथम मी जुन्या वाडयात गेले. ते तेथे राहात नाहीस असे कळले. ती आईच्या वेळची मोलकरीण तेथे राहाते. तू घर विकायला निघाला होतास असे कळले. वेडा! आणि एवढे घर सोडून भाडयाच्या दोन खोल्या घेऊन राहातोस?’

‘काय करायची जास्त जागा? तू बरी आहेस ना? बरीच जाडजूड झाली आहेस. तिकडची हवा चांगलीच मानवली वाटते?’

‘तुला सारे समजले वाटते.’

‘सारे कळले. प्रताप, अरे ती बाई का आता सुधारेल? सात-आठ वर्षे तिने कुंटणखान्यात काढली. कशी सुधारणार रे ती?’

‘तिच्या सुधारण्याचा प्रश्न नाही. हा माझ्या सुधारण्याचा मार्ग आहे!’

‘तिच्याशी लग्न लावणे हाच का याला उपाय?’

‘हा त्यातल्या त्यांत उत्तम मार्ग. शिवाय मी अशा लोकांत जाईन जेथे मी त्यांच्या उपयोगी पडू शकेन.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel