‘त्यांना पाटी दिलेली आहे. लिहावे, पुसावे, पुन्हा लिहावे. वह्या कशाला हव्यात? त्यांना गुप्तपणे बाहेर पत्रे पाठवायला हवीत.’

‘तुम्ही विचार करा. वर्षानुवर्षे तुम्ही या तरूणांना चौकशीशिवाय डांबून ठेवता. त्यांचा वेळ तरी कसा जायचा? तुमची ती धार्मिक पुस्तके त्यांना नकोत. या तरूणांजवळ मानवतेचा धर्म आहे. धर्माचा काथ्याकूट, त्या स्वर्ग-नरकाच्या कल्पना, ते शनिमहात्म्याचे धर्म त्यांना नको आहेत. पाटीवर लिहायला हे तरूण का कुकुली बाळे आहेत? तुरूंगात हे एखादा अमर ग्रंथ लिहितील.’

‘या क्रान्तिकारकांचा कशावर विश्वास नसतो.’

‘असतो, क्रांतीवर असतो.’

‘देवाधर्मावर नसतो. त्याला ते थोतांड म्हणतात.’

‘कारण ‘देव देव’ करणारे जनतेला पिळीत असतात. मी कालच खेडयातून आलो. शेतकर्‍यांची दैना या डोळयांनी पाहिली. मरेमरेतो ते काम करतात; परंतु त्यांना पोटभर खायला नाही. आणि आपण ऐषआरामात लोळत आहोत नि धर्माच्या गप्पा मारीत आहोत. या तरूणांजवळ, समाजात मानवता यावी म्हणून धडपडणार्‍या या तरूणांजवळ थोडासा तरी खरा धर्म आहे. हे तरूण हालअपेष्टा भोगीत आहेत. ध्येयासाठी मरायला सिध्द आहेत.’

‘तुमचे एकूण म्हणणे काय? आम्ही काय करावे, नि पोटभर खाऊ मात्र नये.’

‘तुम्ही खाऊ नका असे नाही मी सांगत. सर्वांनी काम करावे नि सर्वांना पोटभर खावे.’

‘प्रताप. तुझे लक्षण एकंदरीत ठीक दिसत नाही. तुझी आई असती तर तुला असे वागू देती ना.’

इतक्यात दुसरे कोणी तरी बडे गृहस्थ पत्नीसह तेथे आले.

‘या आज हा प्रताप आला आहे.’

‘काय म्हणतो आहे?’

‘तो मला सांगत आहे, ‘मरेमरेतो काम करा. साधा सदरा घाला. चटणीभाकर खा. प्रताप, आणखी काय करु?’

‘माझे तेवढे काम करा.’

‘त्या मुलीच्या सुटकेचे माझ्या हातांत नाही. आईच्या भेटीचे बघेन. काय रे, या मुलींनी कशाला हा धुडगूस घालावा? लग्न करावे; संसार करावा. ते सोडून यांना नसत्या उठाठेवी. त्यांना दुसर्‍यांस मदत करायचीच असेल तर दुसरे का मार्ग नाहीत? बाँब, पिस्तुल हीच साधने हवीत वाटते?’

‘तुम्ही मुलींना निराळे का काढता? स्त्रिया काय, पुरूष काय, दोघे मानव आहेत. मानवता दोघांची सारखीच. दोघांना हृदय, बुध्दी, मन आहे. अन्यायाविरूध्द पुरूषांच्या आत्म्याने बंड करावे नि स्त्रियांनी का गप्प बसावे? जाऊ देत या चर्चा. तुम्ही त्या मुलीला भेटीची तरी परवानगी द्या. तिच्या सुटकेविषयी मी प्रांताधिपतींसच पत्र लिहीतो. मी जातो आता. तुमचा वेळ घेतला. माफ करा.’ असे म्हणून इतर पाहुण्यांसही वंदून तो गेला.

दोन-चार दिवस कामातच गेले. प्रतापने त्या किल्ल्यातील मुलीसाठी गर्व्हनरास पत्र लिहिले त्या बाबतीत एका बडया अधिकार्‍यासही तो भेटला. तो त्यांना म्हणाला,

‘ती मुलगी निरपराधी आहे. हे पोलीस वाटेल त्याला पकडतात. सरकारही त्यांच्यावर भरवंसा ठेवते.’

‘प्रतापराव, सरकारला जी माणसे मिळतात, त्यांना घेऊनच कारभार चालवावा लागतो. तू काही सरकारी नोकरी करीत नाहीस! सदसदविवेकबुध्दीला मानणारे सारे दूर राहतात नि केवळ टीका करतात. सरकारला तुम्ही का मदत करू नये? सरकारी राज्ययंत्रापासून सारी चांगली दूर राहिली तर सरकारी कारभार तरी सुधारणार कसा? तुम्हांला सुधारणा हवी असेल तर स्वत: काम करायला या. तू या मुलीला निरपराधी म्हणतोस. तुला काय माहीत? तिच्याजवळ आक्षेपार्ह वाङमय सापडले.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel