प्रताप आपल्या विचारात मग्न होता. हवेत झालेला बदल त्याच्या लक्षातही आला नाही. तो पाहा एक भला मोठा ढग पश्चिमेकडून येत आहे. सूर्याला त्याने झाकाळले. आणि दूर डोंगराकडे चांगलाच पाऊस पडत होता. येथेही पडू लागला. मधून मधून ढगांना फाडून वीज चमकत होती. गडगडाटही होत होता. सरसर पाऊस येऊ लागला. प्रतापच्या कोटावर पाणी येऊ लागले. ओल्या मातीचा सुगंध आला. हिरवीगार शेते दुरून दिसत होती. मधून मधून फळबागा होत्या. बटाटयांची शेते होती. पावसामुळे हिरवे अधिकच हिरवेगार दिसू लागले;  पिवळे अधिकच पिवळे धमक दिसू लागले; काळे अधिकच काळे कुळकुळीत दिसू लागले.

‘किती सुंदर, सुंदर!’ प्रताप उद्गारला.

बाहेरची रमणीय सृष्टी तो पाहात होता. परंतु तो पाऊस टिकला नाही. एकदोन ढग आले. त्यांनी वृष्टी केली. ते रिकामे झाले नि गेले. पूर्वेच्या बाजूला सुंदर इंद्रधनुष्य दिसू लागले. त्यातील जांभळा रंग फारच स्पष्ट दिसत होता. गाडी पुढे जात होती. त्याला दगडधोंडेही दिसत होते. पाऊस पडला तरी तेथे हिरवे नव्हते. प्रतापला वाटले हे दगड येथे कशाला? हे पाणी पृथ्वीत शिरू देत नाहीत, तिला सस्यश्यामल होऊ देत नाहीत. या दगडांचीही जरूर असेल. परंतु पृथ्वीचे मुख्य कार्य त्यांनी मारता कामा नाही. धान्य, फुले, फळे, हिरवेगार गवत, झाडेमाडे हे पृथ्वीचे वैभव आहे. त्याच्याआड दगडधोंडे येतील तर काय कामाचे? हे सरकारी अंमलदारही जरूरीचे असतील. परंतु त्यांनी मानवी भावनांना पारखे नाही होता कामा. हे लोक कायद्यांचे स्तोम माजवतात. परंतु मानवी हृदयावर अभंग खोदलेला भूतदयेचा कायदा, परस्परांविषयी प्रेम नि सहानुभूतीचा कायदा, तो मात्र हे मानीत नाहीत. सर्व कायद्यांचा वास्तविक जो आधार, असा तो देवाचा विश्वव्यापक कायदा, तो मात्र हे मानीत नाहीत. हे अंमलदार डोळयांसमोर नकोत असे वाटते. जणू डाकू, दरोडेखोर अशांप्रमाणे ते वाटतात. दरोडेखोरांसही एखादे वेळेस दयामाया वाटत असेल, परंतु या अंमलदारांच्या मनातून ती साफ मेलेली असते. तंटया भिल्ल, उमाजी नाईक हे का दरोडेखोर, होते? नाही. हे मोठमोठे अंमलदार, हे हपीसर हे खरे दरोडेखोर, हे खरे राक्षस! आणि पुन्हा यांच्या दुष्ट कृत्यांबद्दल कोणी जबाबदार नाही! वरपासून खालपर्यंत सरकारी संबंधांची एक निर्जीव यांत्रिक साखळी असते. जो तो म्हणतो, मी हुकुमाचा ताबेदार. मनुष्यांना निर्जीव गोळयांप्रमाणे हे मानतात. मानवी संबंधांनुसार कैद्यांशी वा कोणाशीही वागायला हवे, ही यांना जाणीवही नसते. काही काही बाबतीत प्रेम वगैरे गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात, असे मनुष्य मानतो म्हणून हे प्रकार होतात. परंतु प्रेमाचा, मानवी सहानुभूतीचा कायदा कधीच दूर ठेवता येणार नाही. वस्तूंजवळ तुम्ही प्रेमशून्यतेने वागाल; झाडे तोडाल; दगड फोडाल; माती तुडवाल, बिया भाजाल; लोखंड तापवाल, ते घणाने ठोकाल. परंतु मानवाजवळ का त्याला निर्जीव निष्प्राण समजून वागाल? मधमाशांजवळ जपून वागू तरच मध मिळतो. जर त्यांना दुखवू तर आपणही दुखावले जाऊ. मानवी संबंध गुण्यागोविंदाचे, मधुर असे राहायला हवे असतील तर प्रेमाचा पहिला शाश्वत कायदा सर्वांनी पाळलाच पाहिजे. मनुष्य प्रेमाची दुसर्‍यावर सक्ती करू शकणार नाही ही गोष्ट खरी. आपण दुसर्‍याला सक्तीने काम करायला लावू शकत नाही ही गोष्ट खरी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel