ज्याच्यावर तिने प्रेम केले, त्याने तिला भोगले आणि कचर्‍याप्रमाणे फेकून दिले. हे प्रेम का वंचना? आणि तिला माहीत असलेल्या तरूणांत प्रताप हा सर्वात चांगला असे तिला वाटत होते. तो चांगला जर ह्या प्रकारचा, तर इतरजनांविषयी बोलायलाच नको. त्या मावश्यांनी तिला घालविले. आपल्या भाच्याचे पाप त्या कशाला घरात ठेवतील? आणि रूपा जेथे जेथे गेली. तेथे तेथे तिला सर्वांनी छळले. लुटले. पुरूषाची भोगी दृष्टी आणि स्त्रिया लुबाडीत. जो तो सुखासाठी लालचावलेला. स्त्री असो, पुरूष असो. सर्वत्र सुख नि भोग यांची दृष्टी. जो तो स्वत:पुरते पाहाणारा. तो एक कवी तिला भेटला होता. तो म्हणे, ‘अग, हे प्रेमभोग म्हणजेच परमानंद. जीवनाचे हेच सारसर्वस्व! हेच खरे काव्य! हेच खरे सौंदर्य!’ रूपाला कटू अनुभव आला की जो तो स्वत:साठी जगतो, स्वत:च्या सुखासाठी. देवधर्म-सारा दंभ, फापट पसारा. या जगात सारे परस्परांस छळीत आहेत, गिळीत आहेत, म्हणून जगात सर्वत्र दु:ख आहे. कधी कधी तिला दु:ख असह्य होई. आपण अध:पतित होत आहोत याचे तिला वाईट वाटे. परंतु ती मग दारू पिई. मनांत संशय येऊ देत नसे. ती धूम्रपानही करू लागली. ती क्षणभर कोणावर प्रेम करी, त्याला प्रेमभोग देई, त्याला दूर करी! सारे जग असेच आहे, ती म्हणे. अशा जगात धर्माची ही सोंगे कशाला? ज्या तुरूंगात न्याय नाही, दया नाही, माणुसकी नाही, तेथे रविवारी ते प्रवचनकार येतात! सारा चावटपणा! ते तुरूंगाचे अधिकारी येता जाता लाच खातात नि गुन्हेगारांना धर्म शिकवण्यासाठी प्रवचने! गुन्हेगार खरे कोण?
रात्रभर ती अशा विचारांत होती. सारे जीवन तिला आठवले. पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. दुसरा दिवस उजाडला. ती खिन्नच होती.

‘कशाला रडतेस? जा काळया पाण्यावर. तेथे प्रेम करायला कोणीतरी मिळेल. तुला आता कोणीही चालत असेल.’ एक बाई म्हणाली.

‘केव्हा येथून जावे लागेल?’ तिने विचारले.

‘महिन्या दोन महिन्यात.’ कोणीतरी उत्तर दिले.

तो दिवसही गेला. काळया पाण्याची ती वाट पाहात होती.

प्रतापला दुसर्‍या दिवशी दहा वाजता यायला सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे तो आला. भेटीला आलेल्या स्त्री-पुरूषांची तेथे गर्दी होती. तो आत जाऊ पाहात होता. जेलरची त्याला थप्पड बसली.

‘अंदर किदर जाता है?’ असे म्हणून जेलर आत गेला. प्रताप शरमला. त्याच्या डोक्यावर ती थप्पड बसली होती. तो जमीनदार होता. सरकार-दरबारी त्याची ओळख. थोरामोठयांशी त्याच्या ओळखी. प्रतापने मान खाली घातली. तो मनात म्हणाला, ‘जसे हजारो इतर लोक, तसाच मी; मी स्वत:साठी निराळया गोष्टींची का इच्छा करावी? त्यांना पोलीस दरडावतात, थपडा देतात, तसाच मी. त्या जेलरने मला ओळखले नसावे. तोही गर्दीत होता. परंतु मी कशाला मनाला लावून घेऊ? जसे इतर लोक तसाच मी.’
भेटीची वेळ आली. तेथे गजांची खोली होती. आतल्या बाजूस कैदी उभे राहात. बाहेर भेटीला आलेले. गजांतून भेट व्हायची. पति, पत्नी, भाऊ, बहिणी, आई-बाप, मुले एकमेकांस गजांतून पाहात होती. ती तिकडे उभी, ही इकडे उभी. सर्वांची एकदम बोलणी सुरू झाली. हुंदके ऐकू येऊ लागले. लहान मुले रडू लागली. पोलिसांचे दटावणीचे शब्द सुरूच होते. तेथे सारी निष्ठुरता होती; तेथे माणुसकी नव्हती. तेथे सारा गोंधळ होता. मानवी जीवनाचा केवढा उपमर्द तेथे होत होता! परंतु जेलर, पोलिस, कोणालाही त्याचे वाईट वाटत नव्हते. त्यांच्या मनात याचा विचारच येत नसे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel