त्या एका स्टेशनात कैद्यांची गाडी थांबली. तेथे दुसरी गाडी यायची होती. तेथील धर्मशाळेत ते सारे कैदी होते. सभोवती पहारा होता. रूपाकडे कोणी कैदी बघायचे, खडे मारायचे. किसनच्या पत्नीसही त्रास द्यायचे. परंतु राजकीय स्त्री-कैद्यांनी रूपा, किसनची पत्नी यांना धीर दिला. अरूणा तर नुसती आग होती. ती पोलीस अंमलदारास म्हणाली, ‘हे कैदी या रूपाला सतावतात, तुम्हांला दिसत नाही? नाही तर ती आमच्याबरोबर इकडे राहू दे.’ पोलीस अंमलदाराने हरकत नसल्याचे सांगितले. रूपा त्या राजकीय कैद्यांकडे राहू लागली. राजकीय कैद्यांतही स्त्री-पुरूष कैदी होते. रूपा त्यांच्या चर्चा ऐके. तिला सर्वांविषयी अपार आदर वाटू लागला. स्वत: चांगले व्हावे असे वाटू लागले. इतक्यांत आरडाओरडा ऐकू आली. काय होती भानगड? तो एक बडा अंमलदार रागाने लाल झाला होता.

‘स्वत:जवळ त्या मुलीला नको ठेवू म्हणून सांगितले होते की, नाही? बायको वाटेत मेली तर काय करायचे? त्या बायांजवळ दे त्या पोरीला. दे, का मारू आणखी ठोसा? पळालास तर आमच्यावर जबाबदारी.’

ती लहान मुलगी रडत होती. आगगाडीत तिची आई उन्हाच्या त्रासाने मरण पावली. ती मुलगी पित्याने स्वत:जवळ घेतली. परंतु ते करणे कायद्याच्या विरूध्द. अंमलदाराला तो दु:खी पिता म्हणाला, ‘राहू द्या माझ्याजवळ. ती दुसर्‍या बायांजवळ कशी राहील?’ तर चुरूचुरू बोलतो म्हणून त्याच्या नाकावर त्याने ठोसा मारला. पित्याच्या नाकांतून रक्त येत होते. शिपायांनी त्या लहान मुलीला स्त्री-कैद्यांजवळ नेऊन दिले. ती राहीना.
अरूणा तेथे धावून आली. ती लाल होऊन म्हणाली, ‘तुम्ही माणसे की राक्षस? तो कैदी त्या मुलीला घेऊन कोठे पळून जाणार आहे? बिचार्‍याची बायको वाटेत मारलीत. आता त्या चिमण्या जीवाला त्याच्याजवळ राहू देत नाही.’

‘तुम्ही तिकडे’ चालत्या व्हा. प्रत्येक गोष्टीत तुमची लुडबूड. अजून तुमचे राज्य नाही आले. बसा अंदमानात.’

‘येईल आमचे राज्य. हा सारा जुलूम मग भस्म होईल. म्हणे प्रत्येक गोष्टीत लुडबूड. जेथे जेथे मानव धर्म पायाखाली तुडवला जातो, तेथे तेथे आम्ही लुडबूड करणार. आणा त्या मुलीला, मी घेते!’

‘घ्या. परंतु पुरूष कैद्याजवळ आम्हांला कायद्याने ठेवता येणार नाही.

‘बापाजवळही?’

‘बापही पुरूषच ना?’

‘आग लावा त्या कायद्यांना!’

‘तुमच्या राज्यात लावा!’

‘लावूच, लावू.’

अरूणाने ती रडणारी मुलगी जवळ घेतली. परंतु ती थांबेना. तेथे रूपा आली.

‘मज जवळ द्या. माझ्या ती ओळखीची आहे. तुरुंगात मी तिला खेळवीत असे.’ रूपा म्हणाली

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel