‘परंतु तिला ते माहीत नव्हते. एका दुसर्या स्त्रीने ठेवायला दिले. हिने ठेवले.’
‘मी गव्हर्नरांना भेटेन. तुझ्यासाठी म्हणून. परंतु माझे ऐक. तू या क्रांतिकारकांच्या नादी लागू नकोस.’
‘तुम्ही या मुलीच्या बाबतीत काही तरी करा. मी येतो.’
‘अरे, आज एक धर्मप्रवचन आहे. येतोस का प्रताप? तुझ्या वडिलांच्या नि माझा किती घरोबा. तू मला मुलासारखाच आहेस. येतोस? मोटारीतून जाऊ.’
त्याला नाही म्हणवेना. मोटारीत बसून ते प्रवचनाला गेले. एका बडया शेठजींच्या दिवाणखान्यात ते धर्मप्रवर्तन होते. बडेबडे व्यापारी, मोठमोठे अधिकारी आले होते. सोन्या-मोत्यांनी नटलेल्या स्त्रिया आल्या होत्या. प्रवचन सुरू होते. प्रवचनकार दाढीवाले होते. डोक्याला भगवे गुंडाळलेले होते. जवळ छाटी होती.
‘क्षणभर तरी विचार करा. आपण कधी विचारच करीत नाही. या देहाचे सार्थक करायचे आहे. परलोकाचा विचार तरी कधी मनात येतो? तेथे तोंड तरी दाखवता येईल का? तुम्हाला क्षमा केली जाणार नाही. तुम्हाला मोक्ष नाही. तुम्ही सारे नरकाचे धनी होणार! अरेरे! धाडधाड तुम्ही त्या नरकाच्या खाईत पडाल, रडाल, ओरडाल कोण येईल सोडवायला? बाप हो, काही विचार करा. त्या यमाचे दूत तुम्हाला करकचून बांधून नेतील. तप्त खांबांना तुम्हाला कवटाळावे लागेल. आधणाच्या पाण्यातून जावे लागेल. खरोखर तुमच्या आत्म्याचे होणार तरी काय? कोणाचा तुम्हास आधार? कोण तुम्हांस तारील? या नरकापासून तुम्हांस कोण वाचवील? बंधूंनो आपले सारे घर पेटले आहे. सारे घर. अरे, कोण वाचवील तुम्हाला? हरहर, पाप. भयंकर पाप?’
असे म्हणून प्रवचनकार रडू लागले. आणि श्रोत्यांचेही डोळे भरून आले. प्रवचन पुढे आहे.
‘परंतु घाबरू नका. संतांची तपश्चर्या तुम्हांस तारील. ख्रिस्ताच्या बलिदानाने जगाच्या पापाचे प्रायश्चित घेतले आहे. संत स्वत:चा बळी देतात नि तुम्हांला पापमुक्त करीत असतात. तुम्हांला आशा आहे. धीर धरा.’
प्रतापला ते कृत्रिम प्रवचन ऐकवेना. नरकाची भेसूर वर्णने विसाव्या शतकांत ऐकवणे मूर्खपणा आहे. पृथ्वीवर ठायीठायी आम्ही दैन्य-दारिद्रय-दास्याचे नरक निर्मिले आहेत, त्याविषयी हे प्रवचनकार, कीर्तनकार बोलतील तर शपथ. संतांचे बलिदान तुम्हां आम्हांला कसे तारणार? जो तो स्वत:स तारीत असतो. प्रत्येकाने सुधारल्याशिवाय उध्दार कसा होणार? ज्याने त्याने सत्कर्म आचरले पाहिजे, कर्तव्य केले पाहिजे. संतांवर बोजा घालून कार्यभाग होत नसतो. प्रत्येकाच्या हृदयातील संतत्व जागृत व्हायला हवे, कर्मात प्रगट व्हायला हवे.