आपण दुसर्याला सक्तीने काम करायला लावू शकू; परंतु सक्तीने प्रेम करायला कसे लावू शकू? ही गोष्ट खरी असली तरी आपण दुसर्याजवळ प्रेमाने वागावे. जर दुसर्यापासून भलेपणाची आपण इच्छा करीत असू तर असे प्रेमाने वागणे हा आपला धर्म ठरतो. जर प्रेम करता येत नसेल तर मानवी समाजात राहू नका. जेथे केवळ वस्तू आहेत, व्यक्ती नाहीत, अशा जगात जाऊन राहा. जेथे दगडधोंडे, झाडेमाडेच फक्त आहेत तेथे जाऊन वस्ती करा. भूक असेल तेव्हाच खाल्ले तर अपाय होत नाही, त्याप्रमाणे प्रेम कराल तेव्हांच लोकांजवळ तुम्हांला नीट वागता येईल. मग अपाय होणार नाही. माझे जीवन मला हाच धडा शिकवीत आहे. काल मी माझ्या मेव्हण्यांचे मन दुखावले. मनांत साहानुभूती असती तर मी तसा वागतो ना. जीवनात जी अनेक दु:खे भोगावी लागतात ती यामुळेच. प्रतापला एक प्रश्न सुटला असे वाटले. तापलेल्या सृष्टीवर मेघवृष्टी झाल्यामुळे जसे सर्वत्र हिरवे प्रसन्न नवजीवन आल्याप्रमाणे दिसत होते, त्याप्रमाणे स्वत:च्या जीवनातही नवप्रकाश आला असे त्याला वाटले.
त्याचे डोळे प्रेमाने फुलले. त्याची मुद्रा प्रेमसागर बनली. तो इतका वेळ खिडकीतून बाहेर बघत होता. तो आता आत बघू लागला. एका म्हातार्याला जागा नव्हती. प्रतापने आपला कोट जरा आवरून त्याला जागा दिली. तो आधी बसेना. परंतु प्रतापचे सर्वांजळचे प्रेमळ निरहंकारी वर्तन पाहून म्हातारा बसला. तो म्हातारा त्या एका शेतकरणीजवळ बोलत होता.
‘खरेच, माझा नवरा चांगला आहे. मी माझी मुलगी घेऊन त्याला भेटायला आले होते. परत माघारी चालले. किती प्रेमाने त्याने वागवले. सारे शहर दाखवले. तो नाही पीत दारू, नाही बिडीचे व्यसन, नाही खात सुपारी. या जगात अशी माणसे फार थोडी. माझे नशीब थोर म्हणून असा नवरा मला मिळाला.’ ती बाई बोलत होती.
तिची मुलगी तिकडे सूर्यफुलाच्या बिया सोलून खात होती. आई आपल्या बाबंविषयी बोलत आहे असे पाहून तिने सर्वांकडे पाहिले.
तेथे एक कामगार होता. तो म्हणाला,
‘मी पितो दारू. काय करायचे? मरेमरेतो काम असते. कधी रात्रपाळी, कधी दिवसपाळी. परंतु मी बायकोला मारीतबिरीत नाही. विचारा हिला.’
‘खरेच दादांनो, चांगला वागतो माझा धनी. मीच त्याला कधी बोलते. परंतु सारे ऐकून घेतो. कोणाच्या संगतीने लागले व्यसन. नाही सुटत. काय करतील? परंतु जपून पितात. पोराबाळांचा विचार ठेवतात.’ ती म्हणाली.
‘आणि बाप्पा तुम्ही कोठले?’ प्रतापने त्या म्हातार्याला विचारले.
‘पन्नास वर्षे या शहरात काम करतो आहे. आता मुले येथे काम करतात. मी आता माझ्या गावी चाललो. थोडा विसावा घेईन म्हणतो. शहरांत भगभग. शेवटचे दिवस आपल्या गावी जावे.’