परंतु ती का दोषी नाही?’
‘ती संपूर्णत: निर्दोषी आहे. ज्यूरीतील लोक अधिक काळजीपूर्वक वागते तर सजा होती ना.’
‘वरती न्यायाधीशांचे महामंडळ आहे.’
‘त्यांनी अर्ज निकालांत काढला.’
‘मग अर्ज करण्यांत काही अर्थ नव्हता. न्यायाधीश उगीच नाही अर्ज फेटाळणार. आता राजाकडे अर्ज करा.’
‘केला आहे. परंतु तेथेही यशाची शक्यता नाही. कारण राजा मंत्रिमंडळाला विचारणार. ते न्यायाधिशांना विचारणार. शेवटी नकार येणार. आणि निरपराधी स्त्रीला शिक्षा होणार!’
‘तुमची चुकीची समजूत आहे. मंत्री अस्सल कागदपत्र मागवून घेतील. काही चूक असेल तर न्यायदानात दुरूस्ती करतील. लक्षात ठेवा की अपराध्यांनाच सजा होत असते.’
‘माझे मत तर उलट आहे. कायद्याने ज्यांना सजा होते, अशांतील बरेचसे निरपराधी असतात.’
‘कोणत्या अर्थाने?’
‘स्वच्छार्थाने, स्पष्टार्थाने. या रूपाने का विष दिले होते? त्या दुसर्या एका शेतकर्यावर असाच खुनाचा खोटा खटला आहे. त्या मालकानेच घराला आग लावली. घराचा विमा काढलेला आणि आरोप त्या मायलेकांवर. का? तर त्या मातेच्या सुनेवर त्या मालकाची पापी दृष्टी! परंतु शिक्षा त्या मायलेकरांना! किती उदाहरणे!’
‘निर्दोष संस्था जगात कोठून आणायची? चुका होत नसतील असे नाही.’
‘समाज ज्याला वाईट म्हणतो असे काही एक न केलेल्यांनाही शिक्षा होत असतात.’
‘प्रताप, असे नाही हो होत. चोराला आपण चोरी करतो ही गोष्ट का माहीत नसते?’
‘नसते माहीत. चोरी करू नये त्याला सांगतात. परंतु कारखान्याचा मालक त्याच्या श्रमाचा मोबदला म्हणून दोन दिडक्या देतो नि हजारो रूपयांचा माल बळकावतो. तो का चोर नव्हे? नाना प्रकारचे कर घेणारे सरकार का चोर नव्हे?’
‘तू का अराजकवादी आहेस? सरकारच नको की काय?’
‘मी कोणत्या मताचा मला माहीत नाही. वस्तुस्थिती काय ती मी सांगत आहे. सरकार लुबाडीत आहे, कारखानदार लुबाडीत आहेत, जमीनदार लुबाडीत आहेत. जमीन वास्तविक सर्वांच्या मालकीची. परंतु शेतकर्याजवळून लुबाडून घेतलेल्या जमिनीवर तो गवत कापून नेतो, कधी एखादी फांदी तोडतो तर तुम्ही त्याला चोर म्हणता, हातकडया घालता. त्या शेतकर्याला माहीत असते की, खरे म्हणजे तुम्ही सारे चोर असता आणि स्वत:च्या कुटुंबासाठी तुम्ही त्याचे जे लुबाडलेत त्यातला काही भाग नेणे म्हणजे आपले कर्तव्य आहे हे तो जाणतो.’
‘मला तुमचे म्हणणे समजत नाही. समजले तरी ते मला पटणार नाही. जमीन कोणाच्या तरी मालकीची असणारच. आज तुम्ही समान वाटतील तरी उद्या पुन्हा जो अधिक उद्योगी नि कर्तृत्ववान आहे त्याच्यापाशी ती पुन्हा सारी येणार.’
‘परंतु जमीन ही देण्याघेण्याची वस्तूच असता कामा नये. ती कोणाच्याही मालकीची असता कामा नये.’
‘परंतु मालकी हक्क तर मनुष्याचा जन्मजात हक्क आहे. त्याच्याशिवाय मनुष्याला उद्योग करायला प्रेरणा तरी कशी राहील! मालकी हक्क नष्ट कराल तर पुन्हा रानटी अवस्थेत मानवाला जावे लागेल!’